Mahadev Jankar| Sanjay Jadhav Sarkarnama
मराठवाडा

Parbhani Lok Sabha : परभणीत महादेव जानकरांसाठी 40 वर्षांनंतर 'तो'योग जुळून येणार ? शेकाप ते रासप प्रवास...

Mahadev Jankar News : जानकरांनी मावळते खासदार संजय जाधव यांची प्रचारा दरम्यान चांगलीच दमछाक केली. जातीयवाद केल्याचा आरोप त्यांच्यावर झाला.

Jagdish Pansare

Parbhani Political News : लोकसभेच्या परभणी मतदारसंघातील 1962 ते 2019 पर्यंत झालेल्या निवडणुकांचा वेगळा इतिहास राहिला आहे. शेकापच्या शेषराव देशमुख यांनी 1977 मध्ये मिळवलेल्या विजयाचा अपवाद वगळला तर या मतदारसंघात आठ वेळा शिवसेना Shivsena तर सात वेळा काँग्रेस पक्षाने विजय मिळवलेला आहे. 2024 च्या लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने चाळीस वर्षानंतर पुन्हा एक योगायोग जुळून येण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

1977 ते 1980 या काळात परभणीच्या मतदारांनी प्रस्थापित काँग्रेस Congress पक्षाला नाकारत शेतकरी कामगार पक्षाचे शेषराव देशमुख यांना खासदार म्हणून दिल्लीत पाठवले होते. तर 2024 मध्ये प्रस्थापित पक्षाऐवजी महायुतीने राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष महादेव जानकर यांना परभणीतून उमेदवारी दिली आहे. जानकर यांची लढत महाविकास आघाडी शिवसेनेचे दोन वेळा खासदार म्हणून निवडून आलेल्या संजय जाधव Sanjay Jadhav यांच्याशी झाली.

बाहेरचा विरुद्ध स्थानिक आणि त्यानंतर मराठा विरुद्ध ओबीसी असे स्वरुप या निवडणुकीला आले. बाहेरचा उमेदवार म्हणून टीका झाली पण जानकरांनी मावळते खासदार संजय जाधव यांची प्रचारा दरम्यान चांगलीच दमछाक केली. जातीयवाद केल्याचा आरोप त्यांच्यावर झाला, पण महायुतीतल्या भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी या तीन पक्षाच्या स्थानिक व राज्य पातळीवरच्या नेत्यांनी जानकरांसाठी किल्ला लढवला.

मराठा विरुद्ध ओबीसी संघर्षात कोण बाजी मारणार? हे चार जूनच्या मतमोजणीनंतर स्पष्ट होईल. लाखांच्या मताधिक्याने निवडून येण्याचे दावे जानकर-जाधव या दोघांकडूनही केले जात आहेत. या मतदारसंघाचा इतिहास पाहिला तर आतापर्यंत काँग्रेस, काँग्रेस (आय) आणि शिवसेना या दोन प्रमुख पक्षाचे वर्चस्व इथे राहिले आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

40 वर्षापुर्वी एकदा शेतकरी कामगार पक्षाने या ठिकाणी विजय मिळवला होता. त्यानंतर आता पहिल्यांदा प्रस्थापित पक्षांनी रासपसाठी हा मतदारसंघ सोडला. महादवे जानकर विजयी झाले तर हा एक योगायोग ठरणार आहे. महादेव जानकर यांचा स्वतःचा राजकीय पक्ष असला तरी परभणीतून उमेदवारी आणि संघटनात्मक बळ त्यांना भाजप-शिवसेना-राष्ट्रवादी व इतर महायुतीच्या मित्र पक्षांकडून मिळाले आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यापासून राज्यातील देवेंद्र फडणवीस, भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, अजित पवार, पंकजा मुंडे, धनंजय मुंडे अशा नेत्यांनी जानकरांच्या विजयासाठी सभा घेतल्या. त्यामुळे ते रासपचे उमेदवार असले तरी निवडून आल्यावर महायुतीचे खासदार म्हणून ओळखले जातील. निवडणूक आयोगाने जानकरांना शिट्टी चिन्ह बहाल केले होते. त्यामुळे शेकापच्या विजयानंतर परभणीत चाळीस वर्षांनी रासपची शिट्टी वाजते का? हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

(Edited By Roshan More)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT