Jalna News: सहाव्यांदा जालना लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवत असताना स्वतःचा प्रचार सांभाळत केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारासाठीही फिरत आहेत. लोकसभेच्या परभणी मतदारसंघाचे (Parbhani Lok Sabha Constituency 2024) महायुतीचे उमेदवार महादेव जानकर (Mahadev Jankar) यांच्या प्रचारासाठी दानवे यांनी काल सभा घेतली. या वेळी डोक्याला उपरणे, डोळ्यावर काळा चष्मा आणि बैलगाडी चालवतानाचा त्यांचा लूक सध्या चांगलाच चर्चेत आहे.
पण याच परभणीच्या सभेत त्यांनी महायुतीच्या जानकरांची असलेली हवा मतदान होईपर्यंत टिकवून ठेवण्यासाठी आणि त्यांचे टायर पंक्चर होऊ नये, यासाठी आपल्या गावरान भाषेत सल्ला दिला. हवा, टायर आणि पंक्चर याचा परस्परांशी असलेला संबंध सांगताना दानवे यांनी भन्नाट उदाहरण देत उपस्थितांना चांगलेच चार्ज केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या परभणीत झालेल्या सभेमुळे सध्या मतदारसंघात मोदींची हवा असल्याचा उल्लेख केला.
दानवे म्हणाले, मोदीजी यांची सभा नुकतीच होऊन गेली. निवडणुकांचा सर्व खेळ हा हवेवर अवलंबून असतो. निवडणुकांमध्ये ज्याची हवा त्याचा विजय हे गणित ठरलेले असते . मात्र ही हवा टिकवून ठेवण्याचे काम मोठे अवघड असते. ज्याप्रमाणे गाडीच्या टायरामध्ये हवा असते, ती जर टिकवून ठेवायची असेल तर टायरमधील हवेची नियमित तपासणी करावी लागते. हवा टिकत नसेल, कमी होत असेल तर टायर काढून ट्यूबमध्ये छोटे-मोठे पंक्चर आहे का? ते बघावे लागते.
ते पाहायचे असेल तर टायर पाण्यात बुडवावे लागेल, किती ठिकाणी बुडबुडे येत आहेत, किती प्रमाण आहे हे बारकाईने पाहून नंतर त्यावर रबर टेप लावून जोडावे लागते. त्यानंतर मग हवा भरल्यानंतर ती टायरमध्ये टिकून राहते आणि आपला पुढचा प्रवास यशस्वी होतो. राजकारणातील हवेचे असेच असते, ती टिकवून ठेवायची असेल तर कुठे चोर पंक्चर, बुडबुडे असतील तर ते शोधून त्याचा बंदोबस्त करावा लागतो.
परभणीत महायुतीच्या जानकरांचे टायर पंक्चर होणार नाही, मोदीची हवा टिकवून ठेवायची असेल तर याची जबाबदारी कार्यकर्ते म्हणून तुमच्यावर आहे. हवा टिकवून ठेवणारी एक परिपूर्ण यंत्रणा म्हणजे तुम्ही सगळे आहात म्हणून ती फक्त योग्यरीत्या वापरून महायुतीचे टायर पंक्चर होणार नाही, याकडे तुम्हाला लक्ष द्यावे लागेल. ज्या ठिकाणी छोटे-मोठे पंक्चर आहे, ते शोधा, ते जोडा आणि निवडणुकांपर्यंत हवा टिकवून ठेवा, म्हणजे तुमची गाडी सुसाट सुटेल, असे आवाहन रावसाहेब दानवे यांनी उपस्थितांना केले. दानवेंचा हा सल्ला आणि त्यासाठी दिलेले भन्नाट उदाहरण याला उपस्थितांनी भरभरून प्रतिसाद दिला.
Edited by: Mangesh Mahale
R.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.