Manoj Jarange and Mahadev Jankar
Manoj Jarange and Mahadev Jankar Sarkarnama
मराठवाडा

Parbhani Lok Sabha Constituency: अहो आश्चर्यम! जरांगे पाटील यांच्या गावतूनच महादेव जानकरांना लीड

Mayur Ratnaparkhe

Mahadev Jankar Antarwali Sarati Lead : मराठा आरक्षणाची मागणी करत संपुर्ण राज्यात मोठे आंदोलन उभे करणारे मनोज जरांगे पाटील सध्या चांगलेच चर्चेत आले आहेत. लोकसभा निवडणुकीच्या काल लागलेल्या निकालात जरांगे फॅक्टरने भल्याभल्यांचा निकाल लावला. आठ पैकी छत्रपती संभाजीनगरची जागा सोडली तर सातही मतदारसंघातील सत्ताधारी महायुतीचे पानीपत झाले.

जरांगे(Manoj Jarange) पाटील यांच्या आंदोलनामुळे राज्यात मराठा विरुद्ध ओबीसी संघर्ष निर्माण झाल्याचा आरोप केला जातो. लोकसभा निवडणुकीत याचे पडसाद राज्याच्या अनेक भागात उमटल्याचे दिसून आले. मराठवाड्यातील जालना, परभणी, बीड, लातूर, हिंगोली, नांदेड, धाराशिव या मतदारसंघात मराठा विरुद्ध ओबीसी असा वाद प्रकर्षाने जाणवला.

या सगळ्यात आश्चर्यकारक गोष्ट म्हणजे परभणीत राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष व महायुतीचे उमेदवार महादेव जानकर यांच्यामुळे जातीयवाद वाढला, असा आरोप शिवसेना ठाकरे गटाचे उमेदवार संजय जाधव यांनी केला होता. त्याच जानकरांना चक्क मनोज जरांगे पाटील यांच्या मराठा आरक्षण आंदोलनाचे केंद्र असलेल्या अंतरवाली सराटी गावातून मताधिक्य मिळाल्याचे समोर आले आहे.

अंतरवाली सराटी हे गाव परभणी लोकसभा मतदारसंघात येते. काल मतमोजणी झाल्यानंतर अंतरवाली सराटीतील गावकऱ्यांनी कोणाच्या पदरात मतांचे दान टाकले याची उत्सूकता लागली होती. अंतरवाली सराटीमध्ये एकूण 1460 एवढं मतदान झालं होतं. यापैकी विद्यमान खासदार संजय जाधव(Sanjay Jadhav) यांना 531 एवढी मते मिळाली आहेत. तर महायुतीचे उमेदवार महादेव जानकर यांना 629 एवढी मतं मिळाली आहेत.

त्यामुळे जरांगे यांच्या आंदोलन स्थळी ओबीसी उमेदवार असणाऱ्या महादेव जानकरांना 98 मतांची आघाडी मिळाली. अर्थात जानकरांना इथून लीड मिळाली असली तरी त्यांचा महाविकास आघाडीच्या संजय जाधव यांनी दीड लाखांच्या फरकाने दारूण पराभव केला. जानकर यांना निवडून आणण्यासाठी भाजपने आपली सगळी शक्ती पणाला लावली होती.

स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी परभणीत येऊन जानकरांसाठी सभा घेतली. राज्यातील भाजपचे नेते देवेंद्र फडणवीस, भाजपच्या राष्ट्रीय सरचिटणीस पंकजा मुंडे, मंत्री, धनंजय मुंडे, अजित पवार अशा सगळ्याच नेत्यांनी प्रचार केला होता. मात्र एवढे करूनही परभणीत झालेल्या मराठा विरुद्ध ओबीसी संघर्षात शिवसेना ठाकरे गटाच्या संजय जाधव यांनी बाजी मारली.

मराठा समाजाच्या एकजुटीने आपला विजय झाला, अशी जाहीर कबुली जाधव यांनी मतदानानंतर दिली होती. दरम्यान, जाधव यांनी मनोज जरांगे पाटील यांची भेटही घेतली होती. कालच्या मतमोजणीनंतर अंतरवाली सराटीतून कोणाला किती मतदान झाले? याची आकडेवारी समोर आली तेव्हा जानकरांना या गावातून मताधिक्य मिळाल्याचे समोर आली आणि याची एकच चर्चा सुरू झाली.

(Edited by - Mayur Ratnaparkhe)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT