Loksabha Election 2024 : महायुतीचे जागावाटप अद्याप बाकी आहे. परभणी लोकसभा मतदारसंघासाठी भारतीय जनता पक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस व राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष महादेव जानकर यांच्यामध्ये रस्सीखेच चालू आहे. या पार्श्वभूमीवर महादेव जानकर यांनी मंगळवारी प्रज्ञाताई गोपीनाथराव मुंडे यांची भेट घेऊन आशीर्वाद घेतले व निवडणुकीच्या प्रचारार्थ परभणीकडे रवाना होत असल्याचे एका पोस्टद्वारे सांगितले.
राष्ट्रीय समाज पक्षाचे महादेव जानकर यांनी मागील दोन महिन्यांपासून परभणीवर लक्ष केंद्रित केले आहे. परभणी जिल्ह्यातील गंगाखेड विधानसभा मतदारसंघातील विजयी उमेदवार डॉ. रत्नाकर गुट्टे हे राष्ट्रीय समाज पक्षाचे असल्याने जानकर यांनी परभणी लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्याचा निर्णय जाहीर केला.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
महायुतीमधील नेत्यांनी मनधरणी केल्यानंतर जानकर यांच्या वाट्याला एक जागा येणार हे निश्चित झाले आणि ती जागा परभणी लोकसभा मतदारसंघ असण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर महादेव जानकर यांनी मुंबई येथे प्रज्ञाताई मुंडे यांच्या घरी जाऊन त्यांची भेट घेतली. विजयी व्हा, असा आशीर्वाद घेत जानकर निवडणुकीच्या प्रचारार्थ परभणीकडे रवाना झाले आहेत. त्यांनी स्वतः ही माहिती सोशल मीडियाच्या माध्यमातून दिलीे.
भारतीय जनता पक्षाचे दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांच्याशी महादेव जानकर यांचा विशेष स्नेह होता. जानकर यांनी अनेक भाषणांमधून आपण गोपीनाथ मुंडे यांचे मानसपुत्र असल्याचे सांगितले आहे. राष्ट्रीय समाज पक्षाच्या माध्यमातून राज्यातील ओबीसी मतदारांमध्ये महादेव जानकर यांनी पक्ष विस्तार केला आहे.
आरक्षणाच्या प्रश्नावर राज्यातील विविध ठिकाणी आयोजित ओबीसी एल्गार मेळाव्यात जानकर यांनी ओबीसी प्रवर्गा विषयी आक्रमक भूमिका मांडलेली आहे. लोकसभेच्या निवडणूक रिंगणात जानकर यांना त्यांच्या भूमिकेचा लाभ होण्याची शक्यता आहे.
परभणी लोकसभा मतदारसंघात भारतीय जनता पक्षाने जोरदार तयारी केलेली आहे. बूथ स्तरावरील कार्यकर्त्यांपासून संघटनात्मक कामाचा आढावा गेल्या अनेक बैठकांमधून घेतलेला आहे. तसेच गाव चलो या लोक अभियानाच्या निमित्तानेही पक्षाच्या जिल्ह्यातील नेत्यांनी ग्रामीण भागात संपर्क केलेला आहे. त्यामुळे महायुतीच्या उमेदवाराचे निवडणूक चिन्ह कमळ हेच असावे, अशी मागणी भाजप नेत्यांनी केली आहे.
परंतु महादेव जानकर हे राष्ट्रीय समाज पक्षाचे संस्थापक अध्यक्ष असल्याने ते राष्ट्रीय समाज पक्षाच्या चिन्हावर निवडणुकीच्या मैदानात उतरण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. जानकर यांच्या फेसबुक पोस्टमुळे परभणी लोकसभा मतदारसंघात महायुतीचे उमेदवार महादेव जानकर हेच असतील, अशी चर्चा राजकीय वर्तुळात आहे.
(Edited by - Mayur Ratnaparkhe)
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.