Parbhani News : लोकसभा निवडणुकीच्या रणसंग्रामास सुरुवात झाली असली तरी उमेदवार जाहीर झाले नसल्याने इच्छुकांची धाकधूक वाढली आहे. महाविकास आघाडी आणि महायुती असे दोन्ही ठिकाणी चाचपणी करणाऱ्या राष्ट्रीय समाज पक्षाचे महादेव जानकर यांनी महायुतीत असल्याचे स्पष्ट केले. त्यामुळे परभणी लोकसभा मतदारसंघ रासपकडे जाण्याची जोरदार चर्चा आहे. त्यातच राष्ट्रवादीच्या जागावाटप संदर्भात अजित पवार यांनी पत्रकार परिषद घेतली. यात रायगडमधून प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांची उमेदवारीही जाहीर केली.
परभणी लोकसभा मतदारसंघासाठी भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये रस्सीखेच चालू असताना जानकर यांच्या महायुतीमधील समावेशाने चित्र बदलले आहे. जानकर यांनी परभणी आणि माढा लोकसभा मतदारसंघांतून स्वतंत्रपणे निवडणूक लढवण्याचे घोषित केल्यानंतर महायुतीच्या नेत्याकडून त्यांची मनधरणी करण्यात आली व जानकर यांच्या पक्षाला एक जागा देण्याचेही निश्चित केल्याचे सांगण्यात आले.
त्यामुळे जानकर हे परभणी लोकसभा मतदारसंघातूनच निवडणूक लढवणार असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत, तर राष्ट्रवादी काँग्रेसचे संभाव्य उमेदवार राजेश विटेकर हे आशावादी आहेत. जिल्ह्यातील जातीय समीकरणे आणि विद्यमान खासदार संजय जाधव यांच्याशी लढत असल्याने महायुतीकडून उमेदवार देताना या मुद्द्यांचा विचार केला जाणार आहे.
महायुतीच्या जागावाटपात उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांना सन्मानपूर्वक जागा मिळतील आणि परभणीचा त्यात समावेश असेल, असा विश्वास विटेकर यांना आहे. भारतीय जनता पक्षाकडून लोकसभा निवडणूक प्रमुख माजी आमदार रामप्रसाद बोर्डीकर, जिंतूर विधानसभा मतदारसंघाच्या आमदार मेघना साकोरे- बोर्डीकर व युवा मोर्चा प्रदेशाध्यक्ष राहुल लोणीकर यांची नावे इच्छुकांच्या यादीत आहेत. रामप्रसाद बोर्डीकर व राहुल लोणीकर यांनी स्वतंत्रपणे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांची भेट घेऊन उमेदवारीसाठी आग्रह धरला आहे.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
भारतीय जनता पक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस आणि राष्ट्रीय समाज पक्ष या तिन्ही पक्षाच्या जिल्ह्यातील नेत्यांनी उमेदवारी आम्हालाच मिळेल, असा दावा केला आहे. त्यामुळे सर्वांचे लक्ष आता पक्षाकडून अधिकृतपणे उमेदवारी जाहीर होण्याकडे लागले आहे. राज्यातील आरक्षणाच्या मुद्द्यावर ओबीसी प्रवर्गाची बाजू आक्रमक पद्धतीने मांडणाऱ्या महादेव जानकर (Mahadev Jankar) यांना मतदारसंघातील ओबीसी मतदारांचा पाठिंबा मिळू शकतो.
तसेच उमेदवारापेक्षा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासाठी मतदान करणाऱ्या मतदारांचीही मते त्यांच्या पारड्यात पडू शकतात. मात्र, ओबीसी नेते ही जशी त्यांची जमेची बाजू आहे तसेच ती कमकुवत बाजूसुद्धा ठरू शकते. कारण ओबीसी नेते अशी प्रतिमा असल्याने ओबीसी मतदारांची मते मिळाली तरी मराठा समाजातील मतदार याच मुद्द्यावर जानकर यांना नाकारण्याची शक्यता आहे. तसेच संजय जाधव आणि महादेव जानकर यांच्यात लढत झाली तर स्थानिक विरुद्ध बाहेरचा या मुद्द्यावर निवडणूक प्रचार केंद्रित केला जाऊ शकतो.
(Edited By Deepak Kulkarni)
R
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.