Sanjay Jadhav, Uddhav thackeray  Sarkarnama
मराठवाडा

Parbhani Loksabha Constituency : परभणीत प्रचार शिगेला, ठाकरे गटाच्या जाधवांवर गाणे...

Political News : महायुतीचे महादेव जानकरविरुद्ध महाविकास आघाडी ठाकरे गटाचे संजय जाधव यांच्यात परभणीत काँटे की टक्कर होणार आहे. दोघांनी आपापल्या पद्धतीने प्रचार सुरू केला आहे.

Jagdish Pansare

Parbhani News : महायुतीविरुद्ध महाविकास आघाडी असा थेट सामना होणाऱ्या परभणी लोकसभा मतदारसंघातील प्रचार शिगेला पोहाेचला आहे. महायुतीचे महादेव जानकरविरुद्ध महाविकास आघाडी ठाकरे गटाचे संजय जाधव यांच्यात परभणीत काँटे की टक्कर होणार आहे. दोघांनी आपापल्या पद्धतीने प्रचार सुरू केला आहे. प्रत्यक्ष भेटीवर दोन्ही उमेदवारांचा भर असला तरी समाज माध्यमावरून जानकर-जाधवांचे समर्थक प्रचाराला लागल्याचे चित्र आहे.

शिवसेना (Shivsena) ठाकरे गटाचे विद्यमान खासदार संजय जाधव (Sanjay jadhav) यांना परभणीतून तिसऱ्यांदा उमेदवारी मिळाली आहे, तर महायुतीने राष्ट्रवादीच्या कोट्यातून परभणीची जागा राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष महादेव जानकर (Mahadev Jankar) यांना मैदानात उतरवले आहे. संजय जाधव यांच्या प्रचारासाठी सुप्रसिद्ध गायक चंदन कांबळे यांच्या आवाजात खास गाणे तयार करण्यात आले आहे. सध्या हे प्रचार गीत परभणी मतदारसंघात सगळीकडे वाजवले जात आहे. (Parbhani Loksabha Constituency)

संजय जाधव यांचा स्वभाव, धार्मिक वृत्ती आणि गेली दहा वर्षे खासदार म्हणून त्यांनी मतदारसंघात केलेल्या विकासकामांचे गुणगाण या गाण्यातून करण्यात आले आहे. साऱ्या जणाचा, मना मनाचा ज्यांनी केला विकास, खासदार खास, अहो फक्त बंडू बाॅस.. हॅटट्रिक आपलीच होणार, आता हॅटट्रिक आपली होणार, असा दावा या गीतातून केला जात आहे. शिवसेनेचा बालेकिल्ला म्हणून ओळखल्या जाणाऱ्या परभणी मतदारसंघाची ही निवडणूक अधिक रंगतदार झाली आहे, ती महादेव जानकर यांच्या उमेदवारीमुळे.

सुरुवातीला त्यांच्या उमेदवारीवरून स्थानिक विरुद्ध बाहेरचा, उपरा असा प्रचार केला जात होता. परंतु महायुतीच्या नेत्यांनी जानकरांची उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतरच्या सभेत हे सगळे मुद्दे खोडून काढत मोठे शक्तिप्रदर्शन केले होते. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार, पंकजा मुंडे ही नेते मंडळी परभणीत उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी आली होती.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

या वेळी पंकजा मुंडे यांनी जानकरांवर बाहेरचा, उपरा म्हणून टीका करणाऱ्यांना उत्तर दिले होते. ओबीसी विरुद्ध मराठा असे स्वरूप परभणीच्या निवडणुकीला आले आहे. ठाकरे गटाच्या संजय जाधव यांना सुरुवातीला सोपी वाटणारी ही निवडणूक आता जोरदार लढतीच्या दिशेने जाताना दिसते आहे.

प्रचारात दोघांनी आघाडी घेतली असून, उमेदवारी अर्ज मागे घेण्याची शेवटची तारीख असल्याने सायंकाळी निवडणुकीचे चित्र स्पष्ट होईल. दोन्ही बाजूने काही पदाधिकाऱ्यांनी उमेदवारी अर्ज दाखल करत बंडखोरी केली होती. ते आज माघार घेतात का? हेही महत्त्वाचे ठरणार आहे.

(Edited By : Sachin Wagmare)

R

SCROLL FOR NEXT