Loksabha Election 2024 News : लोकसभा निवडणुकीसाठी शिवसेना उबाठा गटाने विद्यमान खासदार संजय जाधव यांच्या निष्ठेला न्याय देत पुन्हा एकदा उमेदवारी दिली आहे. दोन वेळा जिंकण्याचा अनुभव गाठीशी असणाऱ्या जाधव यांना तिसऱ्यांदा मैदानात उतरत असताना ही निवडणूक सर्वार्थाने वेगळी असणार आहे.
त्यांची हॅटट्रिकची वाट बिकट असून, पक्षात पडलेली फूट, युती असताना भाजपची होणारी मदत जी आता होणार नाही आणि मराठा-ओबीसी आरक्षणाचा मुद्दा त्यांच्या विजयाच्या मार्गात अडथळा ठरण्याची शक्यता आहे.
लोकसभा निवडणुकीला सामोरे जाताना परभणीतील राजकीय समीकरणे मुळापासून बदलली आहेत. 2019च्या लोकसभा निवडणुकीमध्ये वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवाराने संजय जाधव यांच्या विजयाला हातभार लावला होता.
लाखापेक्षा जास्त मते घेतलेल्या आलमगीर खान यांना दलित-मुस्लिम मतदारांची साथ मिळाली होती. या वेळी वंचित बहुजन आघाडी महाविकास आघाडीसोबत असेल, अशी चिन्हे असतानाच चर्चा फिस्कटली आणि वंचितने स्वतंत्रपणे निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
वंचित बहुजन आघाडी महाविकास आघाडीसोबत असती तर संजय जाधव यांना त्याचा निश्चितच फायदा झाला असता. महाविकास आघाडीतील घटक पक्ष असलेल्या काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष यांचा दलित- मुस्लिम मते हा पारंपरिक मतदार आहे. वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवाराची मते जाधव यांच्यासाठी अडथळा ठरण्याची शक्यता आहे.
शिवसेनेतील फुटीनंतर परभणी जिल्ह्यात त्याचा फारसा परिणाम जाणवला नसला तरी खासदार सुरेश जाधव, माजी आमदार हरिभाऊ लहाने, माणिकराव आंबेगावकर, भास्कर लंगोटे यांच्यासारखे शिवसेनेतील जुने स्थानिक नेते आज शिंदे गटात आहेत.
विशेषतः परभणी जिल्ह्यातील मतदारांमध्ये लोकप्रिय असलेला धनुष्यबाण हे पक्षचिन्ह शिंदे गटाकडे आहे. त्यामुळे जाधव हे पहिल्यांदाच धनुष्यबाणाशिवाय निवडणुकीला सामोरे जात आहेत. संजय जाधव यांनी आजपर्यंत आक्रमक हिंदुत्वाची प्रतिमा जपली आहे.
मात्र, बदललेल्या राजकीय समीकरणांमुळे पुरोगामी विचाराच्या काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या पारंपरिक मतदारांचा विचार करून त्यांना आपलेसे करण्यासाठी वेगळी भूमिका घेताना जाधव यांची कसरत होणार आहे.
राज्यातील आरक्षणाच्या मुद्द्यावरून मराठा आंदोलक जरांगे पाटील यांनी प्रत्येक लोकसभा मतदारसंघात उमेदवार देण्याचे जाहीर केले आहे. या उमेदवाराला मिळणारी मतेसुद्धा जाधव यांच्यासाठी अडचणीची ठरणार आहेत.
तसेच महायुतीकडून रासपचे अध्यक्ष महादेव जानकर यांची उमेदवारी जवळपास निश्चित असल्याने ओबीसी मतदार त्यांच्या बाजूने उभे राहण्याची शक्यता आहे. अशा स्थितीत ओबीसी मतदारांना आपलेसे करण्यासाठी जाधव यांना झगडावे लागणार आहे.
जिल्ह्यातील पाथरी विधानसभा मतदारसंघाचे काँग्रेस आमदार सुरेश वरपूडकर (Suresh Warpudkar) यांच्याशी जाधव यांचे स्नेहपूर्ण संबंध आहेत. तसेच महाविकास आघाडीमुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार राज्यसभा सदस्य फौजिया खान, जिंतूर विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार विजय भांबळे (Vijay Bhambale) यांचे सहाय जाधव यांच्यासाठी महत्त्वाचे ठरणार आहे. गंगाखेड विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार सीताराम घनदाट यांचाही पाठिंबा जाधव यांना मिळू शकतो.
जाधव यांच्यासाठी या काही जमेच्या बाजू असल्या तरी भाजपसोबत आता युती नसल्यामुळे बोर्डीकरांची त्यांना मिळणारी मदत आता होणार नाही, पक्ष फुटल्यामुळे शिवसेना शिंदे गटाकडून होणारा विरोध, अन् परभणीत वर्चस्व असलेल्या राष्ट्रवादी अजित पवार (Ajit Pawar) गटाचे आव्हान त्यांना असणार आहे. महायुतीकडून कोण उमेदवार मैदानात असेल हे अजून स्पष्ट नसले तरी संजय जाधव (Sanjay Jadhav) यांना या वेळी अनेक अडथळ्यांची शर्यत पार पाडावी लागणार आहे.
(Edited by - Mayur Ratnaparkhe)
R
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.