Mahadev Jankar - Ram Patil Ratolikar
Mahadev Jankar - Ram Patil Ratolikar Sarkarnama
मराठवाडा

Mahadev Jankar : "...म्हणून परभणीत जानकरांचा पराभव!"; भाजप आमदारानेच दिली कबुली!

Chaitanya Machale

Parbhani News : निवडणुकीत बाहेरचा उमेदवार दिल्यानेच परभणी लोकसभा मतदारसंघात महायुतीच्या उमेदवाराचा पराभव झाल्याची कबुली महायुती सहभागी असलेल्या भाजपच्या पक्ष निरीक्षकांनी दिली आहे. भाजपचे पक्ष निरीक्षक आमदार राम पाटील रातोळीकर यांनीच कार्यकर्त्यांशी बोलताना ही कबुली दिली. परभणीमध्ये बाहेरचा उमेदवार दिल्यानेच तसेच इतर चार पाच कारणांमुळे या मतदारसंघात पराभव झाल्याचे रातोळीकर म्हणाले.

नुकत्याच झालेल्या लोकसभेच्या निवडणुकीत महाराष्ट्रात महायुतीच्या उमेदवारांना पराभवाला सामोरे जावे लागले आहे. परभणी लोकसभा मतदारसंघातून राष्ट्रीय समाज पक्षाचे (रासप) अध्यक्ष महादेव जानकर (Mahadev Jankar) यांनी महायुतीच्या पाठींब्यावर निवडणूक लढविली होती. रासपच्या चिन्हावर जानकर या निवडणुकीला सामोरे गेले होते. मात्र त्यांना पराभव स्वीकारावा लागला. शिवसेना ठाकरे गटाचे उमेदवार संजय जाधव यांनी जानकर यांचा पराभव केला.

महाराष्ट्रातील ज्या मतदारसंघात महायुतीच्या उमेदवारांना पराभवाचा धक्का बसला त्या मतदारसंघातील पराभवाची कारणमीमांसा करण्यासाठी भाजपने माहिती गोळा करण्यास सुरूवात केली आहे. यासाठी प्रत्येक पराभूत मतदारासंघात पक्ष निरीक्षक नेमण्यात आले असून त्यांच्याकडे याची जबाबदारी देण्यात आली आहे. परभणी मतदारसंघाने आमदार राम पाटील रातोळकर यांना निरीक्षक म्हणून जबाबदारी दिली आहे. त्यासाठी रातोळकर हे कार्यकर्त्यांशी संवाद साधून पराभवाची कारणे जाणून घेत आहेत. परभणीमध्ये महायुतीने बाहेरचा उमेदवार निवडणुकीसाठी उभा केल्यानेच आमचा पराभव झाल्याची कबुली त्यांनी दिली.

भाजप, एकनाथ शिंदे शिवसेना आणि अजित पवार (Ajit Pawar) यांची राष्ट्रवादी काँग्रेस या महायुतीच्या जागा वाटपामध्ये परभणी लोकसभा मतदारसंघ अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वाट्याला आला होता. रासपच्या महादेव जानकर यांनी महायुतीला पाठींबा जाहीर करत निवडणूक लढविण्याची तयारी दाखविल्याने परभणीची जागा महायुतीकडून जानकर यांना सोडण्यात आली होती.

या मतदारसंघातून महाविकास आघाडीने शिवसेना ठाकरे गटाचे उमेदवार संजय जाधव यांना संधी दिली होती. जाधव यांनी महायुतीचे उमेदवार जानकर यांच्यासह वंचितचे उमेदवार पंजाबराव डख यांचा पराभव केला. या मतदारसंघात 34 उमेदवारांनी निवडणूक लढविली होती. त्यापैकी वंचितचे पंजाबराव डखांसह अन्य 31 उमेदवारांचे डिपॉझिट जप्त झाले आहे.

या निवडणुकीत स्थानिक विरुद्ध बाहेरचा उमेदवार असा प्रचार झाला. महायुतीकडून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह अन्य मित्र पक्षाच्या नेत्यांनी प्रचारासाठी आपली फौज उभी केली होती. मात्र मतदारांनी स्थानिक उमेदवाराच्या बाजुनेच कौल दिल्याचे निरिक्षण भाजप पदाधिकारी, कार्यकर्त्यांबरोबर झालेल्या चिंतन बैठकीत नोंदविण्यात आले. परभणीमध्ये बाहेरचा उमेदवार देण्यात तसेच इतर चार पाच कारणामुळे पराभव झाल्याची कबुलीच आमदार राम पाटील रातोळीकर यांनी पत्रकार परिषदेत दिली.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT