Parbhani Mayor Iqbal Sayed addressing media, urging critics to focus on development work instead of caste or religion, and outlining his vision for inclusive governance in the city. Sarkarnama
मराठवाडा

Parbhani Mayor : "जातीपातीवर नको, कामावर बोला" : ठाकरेंचे परभणीचे महापौर इक्बाल सय्यद यांनी 'मुस्लीम' म्हणून टीका करणाऱ्यांना सुनावले!

Mayor Iqbal Sayed : परभणीचे महापौर इक्बाल सय्यद यांनी जात-धर्माच्या राजकारणाला नकार देत शहर विकासावर भर देण्याची भूमिका स्पष्ट केली असून सर्वपक्षीय सहकार्याने काम करण्याचा विश्वास व्यक्त केला आहे.

Jagdish Pansare

Parbhani Mayor News : राजकारणात मी जात-पात करायला आलेलो नाही. शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याशी भेट झाली तेव्हाही त्यांनी मला हेच सांगीतले. टीका करणाऱ्यांना ती करू द्या, त्यांना उत्तर देण्यात वेळ घालवू नका. जातीपातीच्या पलीकडे जाऊन परभणी शहराच्या जनतेला अपेक्षित काम करा, असे त्यांनी मला सांगीतले आहे. मी ही त्याच वाटेवर चालणार आहे. विरोधकांनाही माझे आवाहन आहे, त्यांनी जातीपातीवर नको तर कामावर बोलावे, असे स्पष्ट मत परभणीचे महापौर इक्बाल सय्यद यांनी व्यक्त केले.

राजकारणात काही चांगले काम करायचे यासाठी आपण आलो आहोत. या शहराचे अनेक प्रश्न आहेत, ते सोडवण्याची संधी महापौराच्या रुपाने मला मिळाली आहे. त्यामुळे हिंदु-मुस्लिम या जातीपातीच्या राजकारणात मला पडायचे नाही, अशा शब्दात इक्बाल सय्यद यांनी आपल्याला परभणीकरांसाठी काय करायचे? याबद्दल भूमिका मांडली.

परभणी महापालिकेत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे इक्बाल सय्यद हे महापौर पदावर विराजमान झाल्यापासून त्यांची चर्चा राज्यभरात सुरू आहे. भाजप, शिवसेना-राष्ट्रवादी हे महायुतीतील पक्ष उद्धव ठाकरे यांच्या पक्षावर अक्षरशः तुटून पडले आहेत. मुंबईत मराठीच महापौर पाहिजे, असा आग्रह धरणाऱ्या उद्धव ठाकरे यांना परभणीत मुस्लीम महापौर कसा चालतो? मतांसाठी लाचारी, हिंदुत्व सोडले, जनाब उद्धव ठाकरेंची सेना असे म्हणत उद्धव ठाकरे यांच्या पक्षावर विरोधक तुटून पडले आहेत.

या पार्श्वभूमीवर ज्या महापौर इक्बाल सय्यद यांच्या निवडीवरून हा सगळा गोंधळ सुरू आहे, त्यांना काय वाटते? याकडेही सगळ्यांचे लक्ष होते. परंतु आपल्याला जातीपातीच्या राजकारणात अडकून पडायचे नाही. तर शहरासाठी आवश्यक असलेली पाणीपुरवठा योजना, अंतर्गत ड्रेनेज लाईन, वाहुतक कोडींचा प्रश्न, शहरात असलेले धुळीचे साम्राज्य यातून परभणीवासियांना कसा दिलासा देता येईल, यासाठी आपण प्रयत्न करणार आहोत.

मी महापौर हा संपूर्ण शहराचा, प्रत्येक जातीपातीच्या लोकांचा आहे. सगळ्या राजकीय पक्षांना सोबत घेऊन मला माझ्या कार्यकाळात परभणी शहराचे चित्र बदलायचे आहे. यासाठी जिल्ह्याच्या पालकमंत्री मेघना बोर्डीकर, राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचेही सहकार्य लागणार आहे. माझा पक्ष किंवा जात पाहून माझ्या विकासकामात ही मंडळी आडकाठी आणणार नाही. शेवटी पालकमंत्री काय किंवा राज्याचे मुख्यमंत्री काय? हे कोणत्या एका पक्षाचे नसतात तर ते जिल्ह्याचे राज्याचे असतात. त्यामुळे मला त्यांचे सहकार्य लाभेल, असा विश्वासही नवनिर्वाचित महापौरांनी व्यक्त केला.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT