Mumbai News : परभणीत उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचा महापौर विजयी झाला. मात्र, ठाकरेंच्या शिवसेनेकडून मुस्लिम नगरसेवक सय्यद इकबाल सय्यद खाजा यांना महापौरपदाची संधी देण्यात आली. याठिकाणी ठाकरे सेना व काँग्रेसची निवडणूकीच्या पूर्वीपासून युती आहे. मात्र उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेने महापौर पदावर मुस्लिम चेहऱ्याला संधी देताच भाजपसह सत्ताधाऱ्यांकडून टीका केली जात आहे. त्यातच आता उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची पहिली प्रतिक्रिया आली आहे. त्यांनी या निवडीवरुन उद्धव ठाकरेंवर टीका केली आहे.
परभणी महानगरपालिकेच्या महापौर आणि उपमहापौरपदाची निवडणूक गुरुवारी पार पडली. त्यामध्ये महाविकास आघाडीला मोठे यश मिळाले. महापौरपदावर सय्यद इकबाल सय्यद खाजा यांनी बाजी मारली, तर उपमहापौरपदी काँग्रेसचे (Congress) गणेश देशमुख यांची निवड झाली. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनीही बाळासाहेबांचे विचार सोडल्याचे सांगत टोला लगावला.
उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्यावर नाव न घेता टीका करताना एकनाथ शिंदे म्हणाले 2019 मध्ये त्यांनी बाळासाहेब ठाकरेंचे विचार सोडल्यामुळे आम्हाला वेगळं जावे लागले होते. बाळासाहेबांचे विचार घेऊन आम्ही पुढे जात आहोत. मात्र, परभणीमध्ये यांचा खरा चेहरा समोर आला आहे, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली.
परभणीत महाविकास आघाडीकडून महापौर निवडणुकीपूर्वीच सत्तासमीकरण स्पष्ट झाले होते. उद्धव ठाकरे यांची शिवसेना आणि काँग्रेस यांच्यातील समन्वयानुसार महापौरपद शिवसेनेकडे, तर उपमहापौरपद काँग्रेसकडे देण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्यानुसार शिवसेनेकडून सय्यद इकबाल यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले होते, तर काँग्रेसने उपमहापौर पदासाठी गणेश देशमुख यांचे नाव अधिकृत केले होते.
महापौर निवडीसाठी शिवसेनेने आपल्या नगरसेवकांना व्हीप देखील बजावला होता. महापौरपदासाठी आज झालेल्या निवडणुकीत हात उंचावून मतदान घेण्यात आले. या मतदानात शिवसेनेचे उमेदवार सय्यद इकबाल सय्यद खाजा यांना 39 मते मिळाली, तर भाजपच्या उमेदवार तिरुमला मोकिंद खिल्लारे यांना 26 मते मिळाली.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.