BJP corporators during a crucial meeting in Parbhani Municipal Corporation amid discussions and differences over the party’s group leader selection ahead of mayoral elections. Sarkarnama
मराठवाडा

Parbhani MahaPalika : महापालिकेत अंतर्गत नाराजीमुळे भाजपमधील गटबाजी चव्हाट्यावर; गटनेता ठरेना, नगरसेवकांमध्ये मतभेदांची चर्चा!

BJP Group Leader Parbhani : परभणी महापालिकेत भाजपच्या गटनेतेपदावरून मतभेद उफाळले असून, प्रदेश कार्यालयाच्या मंजुरीनंतर 2 फेब्रुवारीला अधिकृत प्रस्ताव दाखल होऊन संभ्रम दूर होण्याची शक्यता आहे.

Jagdish Pansare

Parbhani BJP News : परभणी महापालिकेत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आणि काँग्रेसच्या आघाडीने बहुमतासह सत्ता मिळविली आहे. या पक्षाकडून महापौर पदासाठी उमेदवारी अर्जही घेण्यात आला आहे. तर दुसरीकडे भाजपाचा गटनेता कोण असणार? यावर अद्याप एकमत होऊ शकलेले नाही. गटनेता कोणाला करायचे? यावरून नगसेवकांमध्ये मतभेद असल्याचे समोर आले आहे. आता प्रदेश कार्यालयाच्या मंजूरीनंतर उद्या भाजपाचा गट नेता ठरणार आहे.

महापालिकेतील गटनेतेपदाच्या निवडीवरून राजकीय हालचालींना वेग आला असून, विशेषतः भाजपमध्ये सुरू असलेल्या अंतर्गत मतभेदांमुळे या प्रक्रियेची चर्चा रंगली आहे. महापौरपदाच्या निवडीची तारीख जवळ येत असताना सर्वच पक्षांकडून आपापल्या गटनेत्यांची निवड पूर्ण करण्यात येत आहे. याआधी काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने आपापले गटनेते अधिकृतरीत्या जाहीर केले आहेत.

शिवसेनकडून दिलीप ठाकूर, राष्ट्रवादी काँग्रेसकडून विजयराव जामकर तर काँग्रेसकडून गुलमीर खान पठाण यांची निवड झाली आहे. मात्र भाजपमध्ये गटनेतेपदावरून मतभेद असल्याचे चित्र होते. भाजपचे जिल्हाध्यक्ष शिवाजी भरोसे यांनी यापूर्वी तिरुमल्ला मोकिंद खिल्लारे यांची पक्षाच्या मनपा गटनेतेपदी निवड झाल्याची घोषणा केली होती. मात्र या घोषणेनंतर भाजपाच्या काही नगरसेवकांनी या निवडीला विरोध दर्शविल्याने भाजपचा अधिकृत गटनेता नेमका कोण, हा प्रश्न अनुत्तरित राहिला होता. या अंतर्गत नाराजीमुळे भाजपमधील गटबाजी पुन्हा एकदा चव्हाट्यावर आल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली.

दरम्यान, या वादावर तोडगा काढण्यासाठी भाजपतर्फे 22 जानेवारी रोजी महत्त्वाची बैठक घेण्यात आली. या बैठकीत उपस्थित नगरसेवकांत सविस्तर चर्चा झाल्यानंतर तिरुमल्ला मोकिंद खिल्लारे यांची एकमताने गटनेतेपदी निवड करण्यात आल्याचे सांगण्यात येते. या बैठकीचा ठराव पक्षाच्या प्रदेश कार्यालयाकडे मंजुरीसाठी पाठविण्यात आला होता. भाजप प्रदेश कार्यालयाकडून या प्रस्तावाला होकार मिळाल्याची माहिती असून, त्यानुसार सोमवारी विभागीय आयुक्त कार्यालयात भाजपाने गटनेतेपदाचा अधिकृत प्रस्ताव दाखल करण्यात येणार आहे.

त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या संभ्रमावर आता शिक्कामोर्तब होण्याची शक्यता वर्तवली आहे. महापौरपदाच्या निवडीच्या पार्श्वभूमीवर भाजपामध्ये निर्माण झालेला हा अंतर्गत वाद पक्षासाठी अडचणीचा ठरू शकतो, अशीही चर्चा आहे. मात्र प्रदेश पातळीवरून मिळालेल्या मंजूरीनंतर भाजप नेतृत्व एकसंघ असल्याचा संदेश देण्याचा प्रयत्न केला जात आहे. आता दोन फेब्रुवारी रोजी प्रस्ताव दाखल झाल्यानंतरच भाजपाचा अधिकृत गटनेता कोण? याबाबतचे चित्र पूर्णपणे स्पष्ट होणार आहे.

दरम्यान, भाजपमध्ये कोणताही संभ्रम नाही. 22 जानेवारी रोजी झालेल्या बैठकीत तिरुमल्ला मोकिंद खिल्लारे यांची एकमताने गटनेतेपदी निवड करण्यात आली आहे. प्रदेश कार्यालयाची मंजुरीही मिळाली आहे. 2 फेब्रुवारी रोजी अधिकृत प्रस्ताव दाखल केला जाईल. पक्ष एकसंघ असून पुढील प्रक्रियेसाठी आम्ही पूर्णपणे सज्ज आहोत, असे भाजपचे जिल्हाध्यक्ष शिवाजी भरोसे यांनी सांगीतले.

मंत्री बावनकुळे आज जिल्ह्यात

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर राज्यात राजकीय हालचालींना वेग आला आहे. या घटनेमुळे सध्या अनेक वरिष्ठ नेते शोकसभा व सल्लामसलतीत व्यस्त असल्याचे चित्र आहे. याच पार्श्वभूमीवर पालकमंत्री मेघना बोर्डीकर या मुंबई येथे असून, त्या अद्याप जिल्ह्यात परतल्या नाहीत. भाजपचे ज्येष्ठ नेते सुरेश वरपुडकर यांनीही या घटनेनंतर फारशा सार्वजनिक भेटीगाठी घेतल्या नसल्याची माहिती आहे. या परिस्थितीचा परिणाम भाजपच्या अंतर्गत हालचालींवरही झाला असून, नगरसेवकांची नियोजित बैठक अद्याप होऊ शकलेली नाही.

त्यामुळे गटनेतेपदासह महापालिकेतील पुढील राजकीय भूमिका याबाबत स्पष्टता येण्यास विलंब होत आहे. दरम्यान, येत्या रविवारी राज्याचे महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे हे जिल्हा दौऱ्यावर येणार आहेत. त्यांच्या भेटीनंतर भाजपमधील अंतर्गत चर्चा, नगरसेवकांची बैठक आणि महापालिकेतील सध्याच्या राजकीय स्थितीवर अधिक स्पष्टता येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT