

Parbhani municipal corporation election : परभणी महापालिकेचा निवडणूक निकाल शुक्रवारी (ता.17) जाहीर झाल्यानंतर आता महापौर पदाचे आरक्षण आणि या पदावर कोणाची वर्णी लागणार? याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष सर्वाधिक जागा जिंकत परभणी महापालिकेत मोठा पक्ष ठरला आहे.
काँग्रेससोबत आघाडी करत निवडणुका लढल्यानंतर या दोन्ही पक्षांना बहुमत मिळाले. सर्वात मोठा पक्ष असल्यामुळे शिवसेनेचा (Shivsena) महापौर पदावर दावा असला तरी काँग्रेसच्या संमतीशिवाय त्यांना या पदावर दावा सांगता येणार नाही. तरीही इच्छुकांनी महापौर पदासाठी पक्षाकडे लॉबिंग सुरू केल्याचे चित्र आहे.
महापालिका निवडणुकांचे निकाल जाहीर होताच बहुमताच्या जवळपास पोचलेल्या शिवसेनेच्या (यूबीटी) काही उमेदवारांनी महापौरपद आम्हालाच मिळेल, असा दावा केला आहे. परंतु, या निवडणुकीत आघाडी केलेल्या काँग्रेसला सोबत घेतल्याशिवाय सत्तेचा दावा ठोकता येणार नाही. त्यामुळे काँग्रेसच्या मर्जीचादेखील विचार उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला करावा लागणार आहे.
परभणी महापालिका निवडणुकीच्या इतिहासात शिवसेनेला प्रथमच मोठे यश मिळाले. जिल्ह्यावर, तालुक्यावर सत्ता असतानाही स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत नेत्यांच्या दुर्लक्षामुळे नेत्रदीपक यश कधीच मिळाले नव्हते
महापालिकेच्या पहिल्या निवडणुकीत आठ व दुसऱ्या निवडणुकीत शिवसेनेचे सहा सदस्य निवडून आले होते. तर या निवडणुकांत अनेक प्रभागांत शिवसेनेचे उमेदवार दुसऱ्या क्रमांकावर होते, तर काहींचा थोडक्यात पराभव झाला होता. परंतु, शिवसेनाफुटीनंतर समीकरणे बदलली. शिवसेनेने राष्ट्रवादी, काँग्रेससोबत राज्यात सत्ता स्थापन केली. त्यामुळे जिल्ह्यातही या तिन्ही पक्षांचे नेते जवळ आले. कटूता कमी झाली.
गत लोकसभा, विधानसभा निवडणुकांतही त्याचे परिणाम दिसून आले. शिवसेनेला कधीही मतदान न करणाऱ्या मुस्लिम मतदारांनी मशाल चिन्हावर भरघोस मतदान केले व शिवसेनेचे उमेदवार जिंकूनही आले.
शिवसेनेत अनेक मातब्बर मुस्लिम नेत्यांनी प्रवेश केला होता. त्यात माजी उपमहापौर माजुलाला, समाजसेवक शेख कादर यांचा प्रामुख्याने उल्लेख करावा लागेल. त्यामुळे महापालिका निवडणुकीतही हा नवीन जोडलेला मतदार, त्यांचे काही नेते सोबत असल्याची खात्री झाल्यानंतर तर स्थानिक पातळीवर पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याशी एकनिष्ठ राहिलेले शिवसेनेचे खासदार संजय जाधव व आमदार डॉ. राहुल पाटील या शिलेदारांनी निवडणूक अत्यंत प्रतिष्ठेची केली. कोणत्याही परिस्थितीत पालिकेवर भगवा फडकावयाचाच, या उद्देशाने आणि एकट्याच्या बळावर सत्तेचा मार्ग गाठू शकणार नाही हे लक्षात आल्यावर त्यांनी काँग्रेसशी आघाडी करण्याचा निर्णय घेतला.
बड्या नेत्यांनी काँग्रेस सोडल्याने गलीतगात्र झालेल्या या पक्षालाही तेच हवे होते. अनेक प्रभागांत या दोन्ही पक्षांत मैत्रीपूर्ण लढती झाल्या, तरी काही प्रभागांत मात्र आघाडीच्या उमेदवारांना चांगले यश मिळाले. कोणताही एक पक्ष बहुमत मिळवू शकला नाही, परंतु आघाडीने मात्र बहुमत प्राप्त केले. ठाकरे सेनेने 25, तर काँग्रेसने 12 जागा जिंकल्या. त्यामुळे ठाकरे सेनेला महापालिकेवर सत्ता स्थापन करायची असेल, तर काँग्रेसला विश्वासात घेऊनच महापौरपदासाठी जे काही आरक्षण सुटेल, त्या व्यक्तीची निवड करावी लागेल.
मनपाचे निकाल जाहीर होताच प्रभाग क्रमांक आठमधील ठाकरे सेनेच्या विजयी उमेदवारांच्या समर्थकांनी महापौरपदावर दावा ठोकण्यास सुरवात करून दबाव निर्माण केल्याचे बोलले जात आहे. अद्याप महापौरपदाचे आरक्षण सुटलेले नाही, तरीही विजयी उमेदवारांच्या वाढत्या दबावामुळे शिवसेनेच्या नेत्यांपुढे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. त्यामुळे हे नेते गटनेतेपदाची उमेदवारी कुणावर सोपवितात? हे पुढे दिसून येणार आहे. यासाठीही अनेक अनुभवी, माजी नगरसेवक रांगेत आहेत.
राज्यात मनपालिकेच्या निवडणुका झाल्या. निकाल लागले तरी महापौरपदाचे आरक्षण जाहीर झालेले नाही. यापूर्वी महापौरपद सर्वसाधारण, इतर मागासप्रवर्ग महिला, सर्वसाधारण महिला व अनुसूचित जाती महिला संवर्गाची आरक्षणे सुटली होती. पुढील आरक्षण इतर मागास प्रवर्ग, सर्वसाधारण किंवा अनुसूचित जाती सर्वसाधारण संवर्गासाठी सुटण्याची शक्यता वर्तविली जात आहे.
ठाकरे सेनेकडे महापौरपदाचे अनेक प्रबळ दावेदार आहेत. सर्वसाधारण प्रवर्गासाठी सुटले, तर सय्यद समी सय्यद साहेबजान यांच्यासह शाम खोबे, दिलीप ठाकूर, अनुसूचित जातीसाठी सुटले तर प्रतिभा अतुल सरोदे, प्रा.डॉ. राजेश रणखांबे, मिलिंद घागरमाळे, इतर मागास प्रभागासाठी सुटले तर व्यंकट डहाळे, सबिहा अफरीन अन्सारी हे प्रबळ दावेदार समजले जातात.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.