Shivsena-UBT News : भाजपची सत्ता, पालकमंत्री मेघना बोर्डीकर यांची ताकद, माजी मंत्री सुरेश वरपूडकर यांचा महापालिका निवडणुक जिंकण्याचा अनुभव गाठीशी असताना परभणी महापालिकेत मशाल पेटली. खासदार संजय जाधव उर्फ बंडू बाॅस, आमदार राहुल पाटील यांनी मतभेद बाजूला सारत एकत्रित केलेल्या प्रयत्नांना यश मिळाले आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष हा सर्वात मोठा पक्ष ठरला. आता सत्तेसाठी त्यांना काँग्रेसच्या हाताची गरज भासणार आहे.
मराठवाड्यातील पाच पैकी परभणी आणि लातूर या दोन महापालिकांमध्ये काँग्रेस आघाडीला यश मिळाले आहे. लातूरमध्ये काँग्रेस-वंचित बहुजन आघाडीने बहुमतासह सत्ता मिळवली. तर परभणीत सत्तेसाठी शिवसेना आणि काँग्रेस पक्षाला एकत्र यावे लागणार आहे. दोन्ही पक्ष आघाडीत लढले असल्यामुळे विजयाचे श्रेय ही त्यांनाच जाते. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने 25 जागा जिंकल्या, तर काँग्रेसने 12 ठिकाणी बाजी मारली आहे.
शिवेसना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष-काँग्रेस आघाडीने स्पष्ट बहुमत मिळवले असून त्यांनी भाजप, शिवसेना आणि दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या युतीला रोखले आहे. भाजप-शिवसेनेला युती न केल्याचा फटका या निवडणुकीत बसला असून त्यांना केवळ 12 जागांवर समाधान मानावे लागले. शिंदेंच्या शिवसेनेला मात्र इथे खातेही उघडता आलेले नाही. राष्ट्रवादी काँग्रेसने 11 जागा जिंकून इभ्रत राखली.
महापालिकेची निवडणूक सर्वच पक्षांनी प्रतिष्ठेची केली होती. त्यात शिवेसना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष व काँग्रेसला आघाडी केल्याचा लाभ या निवडणुकीत झाल्याचे स्पष्ट झाले आहे. शहरातील काही प्रभागात आघाडीतही मैत्रीपूर्ण लढती झाल्या. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने 47 जागा लढवून 25 जिंकल्या. तर तर काँग्रेसने 28 जागा लढवून 12 जागा जिंकल्या. या आघाडीचा सत्तेचा मार्ग सुकर झाला आहे.
महापालिकेत स्वबळावर लढण्याचा ओव्हर कान्फीडंस शिवसेना आणि भाजप या दोन्ही पक्षांना नडला. भाजपने सत्तेचा दावा केला होता. परंतु 37 उमेदवार देणाऱ्या भाजपला केवळ 12 जागा जिंकत्या आल्या. तर 35 उमेदवार देणाऱ्या शिवसेनेला या निवडणुकीत भोपळाही फोडता आला नाही. या निवडणूकीत दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसने आघाडी केली होती. अजित पवारांच्या राष्ट्रवादीने 57 ठिकाणी उमेदवार दिले होते. त्यापैकी केवळ 11 निवडून आले. तर शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे सहा उमेदवार मैदानात असताना त्यांना खातेही उघडता आले नाही.
या निवडणूकीत एमआयएम, वंचित बहुजन आघाडी, यशवंत सेनेसह जन सुराज्य शक्तीने अनेक ठिकाणी उमेदवार दिले होते. त्यापैकी जनसुराज्य आघाडीने तीन जागी तर यशवंतसेनेला एका ठिकाणी यश मिळाले. तर एका ठिकाणी अपक्ष उमेदवार विजयी झाला आहे.
महानगरपालिका निवडणूकीत बहुमत प्राप्त केलेल्या उबाठा व काँग्रेस सत्तेसाठी दावेदारी ठोकणार आहे. आघाडीचे एकूण 37 उमेदवार निवडून आले आहेत. भाजप सत्तेचा दावा करण्याची शक्यता नाही. परंतु अन्य पक्षाला सोबत घेऊन आपले संख्याबळ वाढवण्याचा ते प्रयत्न करू शकतात असे बोलले जाते. राष्ट्रवादी, जनसुराज्य, अपक्ष व यशवंत सेना एकत्र आले तरी त्यांचे संख्याबळ 28 पर्यंतच पोचते.
ऐन निवडणुकीच्या काही महिने अगोदर काँग्रेसचे माजी मंत्री सुरेश वरपूडकर यांनी समर्थकांसह भाजपमध्ये प्रवेश केल्याने या निवडणुकीत पक्षाला लाभ होईल अशी भाजपला आशा होती. पालकमंत्री मेघना बोर्डीकर, वरपूडकर यांच्या नेतृत्त्वात भाजपने हि निवडणूक प्रतिष्ठेची केली होती. भाजपने महापालिकेत दोन आकडी संख्याबळ गाठण्यात यश मिळवले असले तरी सत्ता मात्र मिळू शकली नाही. त्यामुळे या दोन्ही नेत्यांकडून अपेक्षाभंग झाला आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.