Parbhani News : ऑपरेशन टायगर राबवून शिवसेनेचे मुख्य नेते उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांच्या पक्षाचे सहा खासदार फोडले. या ऑपरेशननंतर राज्यात ठाकरेंचे 14 आमदार लवकरच पक्ष सोडणार, मुंबईसह राज्यातील विविध महापालिका, नगरपालिकेतील नगरसेवकही ठाकरेंची साथ सोडणार, असा दावा स्थानिक शिवसेना नेत्यांकडून केला जात आहे.
ऑपरेशन टायगरचे शिकार झालेले परभणीचे खासदार संजय उर्फ बंडू जाधव यांच्या प्रयत्नातून महापालिकेवर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आणि काँग्रेस महाविकास आघाडीची सत्ता आली होती. सय्यद इकबाल या मुस्लिम चेहऱ्याला महापौर करत संजय जाधव यांनी मोठी खेळी केली होती. यावरून उद्धव ठाकरे यांच्या पक्षावर चोहोबाजूंनी टीकाही झाली. मात्र, खासदार संजय जाधव यांनी आता शिवसेनेचा धनुष्यबाण हाती घेतल्यानंतर परभणी महापालिकेची सत्ताही उद्धव ठाकरे यांच्या हातून जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून परभणी महापालिकेसाठी 19 कोटी रुपयांचा निधी आणत खासदार जाधव यांनी एक नवा डाव टाकला आहे. परभणी महापालिकेसाठी आलेला हा 19 कोटी रुपयांचा निधी खासदार संजय जाधव समर्थक शिवसेना नगरसेवकांच्या प्रभागांमध्येच खर्च केला जावा, अशा स्पष्ट सूचना यादीसह संबंधितांना देण्यात आल्याचा दावा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते विवेक नावंदर यांनी एका स्थानिक वृत्तवाहिनीला बोलताना केला आहे.
महापालिकेसाठी आलेला निधी अमुक एका प्रभागातच खर्च करा, असं सांगत यादीसह पाठवण्यात आल्याचा प्रकार आम्ही पहिल्यांदाच पाहत आहोत, अशा शब्दांत नावंदर यांनी आश्चर्य व्यक्त केले. ऑपरेशन टायगरनंतर परभणी महापालिकेच्या सत्तेसाठी ऑपरेशन नगरसेवक राबवण्याचा तर हा प्रयत्न नाही ना? अशी शंका नावंदर यांनी व्यक्त केली.
विकासकामांच्या नावाखाली परभणी महानगरपालिकेसाठी जाहीर करण्यात आलेल्या विकास निधीच्या पार्श्वभूमीवर राजकीय वर्तुळात विविध प्रतिक्रिया उमटत आहेत. विकास निधीचा वापर खऱ्या अर्थाने जनतेच्या कामांसाठी होत आहे की त्यामागे राजकीय रणनीती आहे? हे येणाऱ्या काळात स्पष्ट होईल.
खासदार संजय जाधव हे सध्या पंढरपूरच्या वारीमध्ये आहेत. त्यांच्या अनुपस्थितीत परभणी जिल्हा बँकेची निवडणूकही नुकतीच पार पडली. परभणी-हिंगोली विधान परिषदेचे आमदार सईद खान यांना जिल्हा बँकेवर संचालक होण्यासाठी जामकर यांच्याशी झुंजावे लागले. खासदार संजय जाधव परभणीत असते तर आपला विजय मोठ्या मताधिक्याने झाला असता, असा दावा सईद खान यांनी विजयानंतर केला होता. सहा विद्यमान आणि चार माजी आमदार आपल्या विरोधात होते, असा दावा खान यांनी केला होता.
खासदार संजय जाधव यांच्या शिवसेना प्रवेशानंतर जिल्ह्यातील सर्वात महत्त्वाच्या अशा स्थानिक स्वराज्य संस्था म्हणून ओळखल्या जाणाऱ्या महापालिकेत सत्ता बदल घडवण्यासाठी शिवसेना मोठी चाल खेळत असल्याची चर्चा या निमित्ताने परभणी जिल्ह्यात सुरू आहे.