Parbhani Political News  Sarkarnama
मराठवाडा

Parbhani Political News : बावनकुळेंनी रासपचा आमदारच गळाला लावला, थेट उमेदवारी जाहीर

सरकारनामा ब्युरो

Marathwada : भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांचा परभणी दौरा सध्या चांगलाच चर्चेत आहे. या दौऱ्यात त्यांनी गंगाखेडचे रासपचे विद्यमान आमदार रत्नाकर गुट्टे यांनाच गळ घातला. (Parbhani Political News) एकीकडे रासपचे अध्यक्ष आमदार महादेव जानकर हे देशभरातील सगळ्या लोकसभा मतदारसंघात जनस्वराज यात्रा काढत आहेत. तर दुसरीकडे त्यांच्या पक्षाचा आमदाराच भाजपने पळवल्याची चर्चा या निमित्ताने सुरू झाली आहे.

नुकत्याच झालेल्या जिल्हाध्यक्ष, शहराध्यक्ष निवडीमध्ये परभणीची जबाबदारी संतोष मुरकुटे यांच्याकडे सोपवण्यात आली होती. त्यांच्या निवडीबद्दल रत्नाकर गुट्टे समर्थकांनी नाराजी व्यक्त करत ते जिकडे तिकडे कधीच गुलाल उधळला जात नाही, अशी टीका पत्रकार परिषद घेऊन केली होती.मुरकुटे हे देखील गंगाखेड विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्यास इच्छूक आहे. याआधी त्यांनी अपक्ष म्हणून निवडणूक लढवली होती. (BJP) त्यामुळे भाजपने रत्नाकर गुट्टे (Ratnakar Gutte) यांना मात देण्यासाठीच ही खेळी केल्याची चर्चा सुरू झाली होती.

तसेच गंगाखेड आणि जिल्ह्यामध्ये भाजप आणि रासपच्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांमध्ये कुरबुरी वाढल्या होत्या. मात्र काल परभणी जिल्हा दौऱ्यावर असलेल्या बावनकुळे यांनी या वादावर तोडगा काढत थेट आमदार रत्नाकर गुट्टे यांनाच पक्षात आणून उमेदवारी देणार असल्याचे जाहीर करून टाकले. (Parbhani) माझी गुट्टे यांच्याशी सविस्तर चर्चा झाली आहे. तेच भाजपचे उमेदवार असतील, त्यामुळे आमचे जिल्हाध्यक्ष मुरकुटे आणि त्यांच्यात वाद आहेत, या चर्चांना काहीही अर्थ नाही.

उलट गुट्टे यांना भाजपकडून उमेदवारी दिल्यानंतर मुरकुटे हेच त्यांचे निवडणूक प्रमुख असणार आहेत. तेच त्यांच काम करतील, असेही बावनकुळे यांनी स्पष्ट केले. आधी संतोष मुरकुटे यांना जिल्हाध्यक्ष करत भाजपने गुट्टे यांना थेट इशारा दिला. भाजपने टाकलेल्या जाळ्यात गुट्टे अलगद अडकले आणि आता उमेदवारीसाठी ते भाजपमध्ये जाणार असल्याचे देखील बावनकुळे यांच्या भूमिकेनंतर स्पष्ट झाले आहे.

त्यामुळे येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत गंगाखेडमधील राजकारण चांगलेच तापणार असे दिसते. विधानसभा लढवण्यास इच्छूक असलेल्या नवनिर्वाचित जिल्हाध्यक्ष संतोष मुरकुटे यांना भाजपने आता काय आश्वासन दिले, ते नेमकी काय भूमिका घेतात? हे पाहणे देखील महत्वाचे ठरणार आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT