Parbhani politics News : ऐन दिवाळीत परभणी जिल्ह्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. खासदार संजय जाधव आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आमदार डॉ. राहुल पाटील यांच्यात आरोप प्रत्यारोपाचे फटाके फुटत आहेत. राहुल पाटील यांच्या साखर कारखान्यावर स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या पदाधिकारी कार्यकर्त्यांनी ऊसाला 31 रुपये भाव मिळावा तसेच मागील वर्षीच्या भावातील शंभर रुपयांचा फरक देण्यात यावा या मागणीसाठी आंदोलन केले होते.
दरम्यान आंदोलन करणाऱ्या एका शेतकऱ्याला कारखान्यावर मारहाण झाल्याचा आरोप खासदार संजय जाधव यांनी केला. यावर आमदार राहुल पाटील यांनी खुलासा करत संजय जाधव हे कारखान्यात राजकारण करत आहेत असा आरोप केला. आपण स्वतः एखादा उद्योग उभारू शकले नाहीत, आणि आम्ही साखर उद्योगाच्या माध्यमातून जिल्ह्यात व्यवस्थित काम सुरू असताना हे तुमच्या डोळ्यात खुपत आहे का? कारखान्यावर कुठल्याही शेतकऱ्याला मारहाण झालेली नाही असा दावा करत पाटील यांनी खासदार जाधव यांचा आरोप फेटाळला.
"शेतकऱ्यांची मागणी 3100 ऊसाला दर मिळावा अशी होती, त्याप्रमाणे शंभर रुपये वाढवून देण्याची घोषणा मी केलेली आहे. याशिवाय गेल्या वर्षीच्या फरकातील शंभर रुपये देखील आम्ही ऊस उत्पादक शेतकऱ्यांना देणार आहोत. साखर कारखाना व्यवस्थित सुरू राहू नये, तो बंद पडावा असा प्रयत्न काही मंडळी करत आहेत. परंतु या साखर कारखान्याच्या पाठीशी मी खंबीरपणे उभा आहे, त्यामुळे विरोधकांनी कितीही प्रयत्न केला, खोटेनाटे आरोप केले तरी त्याचा काहीही परिणाम होणार नाही". असे पाटील यांनी स्पष्ट केले.
साखर कारखाना व्यवस्थित चालवण्याची माझी जबाबदारी आहे, आम्ही कितीही अडचणीत असलो तरी शेतकऱ्यांना ऊस उत्पादकांना जो भाव देण्याची जाहीर केले तो देणारच, यात कोणी राजकारण आणण्याचा प्रयत्न करू नये, असे आवाहनही राहुल पाटील यांनी केले.
दहा दहा हजार कोटीचे मालक असलेल्या साखर कारखानदारांनी किमान शेतकऱ्यांना तरी सोडावे, असा टोला खासदार संजय जाधव यांनी आमदार राहुल पाटील यांना लगावला. कारखान्यावर शेतकऱ्याला बेदम मारहाण झाल्याचा दावा करतानाच ते प्रकरण तिथल्या तिथे दाबण्यात आले असा आरोपही जाधव यांनी केला. माध्यमांनी हे का दाखवले नाही? असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला.
ऊस उत्पादकांना 3300 भाव देणार असे लेखी आश्वासन देण्यात आले होते, मग 3100ं रुपयांवर त्यांची बोळवण का करण्यात आली? असा सवाल करत तुम्ही सगळीकडे डल्ला मारताय, किमान शेतकऱ्यांना तरी सोडा, असा टोलाही संजय जाधव यांनी लगावला.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.