Parbhani News : राज्य सरकार आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा महत्वाकांक्षी प्रकल्प म्हणून ओळखल्या जाणाऱ्या शक्तीपीठ महामार्गाला महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये शेतकऱ्यांचा विरोध होत आहे. मराठवाड्यातील परभणी जिल्ह्यात या महामार्गासाठी जमिनी देण्यास विरोध करत शेतकर्यांनी दोन दिवसांपूर्वी आंदोलन छेडले होते. या आंदोलकांवर पोलीसांनी बळाचा वापर करत काठ्या चालवल्याने शेतकर्यांमध्ये प्रचंड रोष आहे.
या पार्श्वभूमीवर आज परभणी येथील शिंगणापूर फाटा येथे रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. खासदार संजय जाधव यांच्या नेतृत्वात शेकडो शेतकरी रस्त्यावर उतरल्याने परिस्थिती गंभीर बनली होती. शक्तीपीठ महामार्गाच्या नावाखाली शेतकर्यांच्या जमीन हडपण्याचा हा प्रकार कदापि सहन केला जाणार नाही, असा इशारा खासदार जाधव यांनी यावेळी दिला.
दरम्यान शक्तीपीठ महामार्गाला परभणी जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा होणारा कडाडून विरोध पाहता पालकमंत्री मेघना बोर्डीकर यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा करून भूसंपादनाच्या मोजणीला तात्पुरती स्थगिती मिळवली आहे. आजपासून विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू झाले आहे. शेतकर्यांचे हे आंदोलन राज्यात उग्ररूप धारण करू शकते याचा अंदाज आल्यामुळेच तात्पुरती का होईना परंतु सरकारने परभणी जिल्ह्यातील जमीन मोजणीला स्थगिती दिल्याचे बोलले जाते.
नागपूर ते गोवा या महत्वाकांक्षी शक्ति पीठ प्रकल्पात सुपीक जमिनी बाधित होत असल्याने शेतकर्यांचा प्रचंड विरोध होत आहे. मराठवाड्यातील परभणी, नांदेड शहरातील शेतकरी या विरोधात रस्त्यावर उतरले असून बागायती क्षेत्र उध्वस्त झाले, शेती गेली तर शेतकरी खाणार काय? असा प्रश्न आंदोलक उपस्थित करत आहेत.
रत्नगिरी-नागपूर असा समांतर राष्ट्रीय महामार्ग असताना शक्ति पीठ जोडण्यासाठी नवीन महामार्ग तयार करण्याचा घाट कशासाठी घातला जात आहे? केवळ कंत्राटदारांच्या भल्यासाठी हा महामार्ग होत असून त्याला आमचा विरोध असल्याचे खासदार संजय जाधव यांनी आंदोलकांच्या साक्षीने ठणकावून सांगितले. जाधव यांनी यावेळी पालकमंत्री मेघना बोर्डीकर यांच्यावरही टीका केली.
कोणत्याही गोष्टीचे श्रेय घेण्याची पालकमंत्र्यांना हौस असल्याचे जाधव म्हणाले. मुख्यमंत्र्यांनी शक्ति पीठ महामार्ग मोजणीला तात्पुरती स्थगिती दिली आहे. त्याचे श्रेयही आता त्याच घेत आहेत याला, काय म्हणावे? असा चिमटा जाधव यांनी पालकमंत्र्यांना काढला. आंदोलन दरम्यान निरपराध महिलांना मारहाण करण्यात आली यावर मात्र पालकमंत्री काहीच बोलत नाहीत, असे जाधव म्हणाले.
जमीन मोजणीला विरोध करणाऱ्या आंदोलकांना अटक करायची, त्यांना गावबंदीच्या नोटिसा द्यायच्या आणि पोलिसांचा मोठा फौज फाटा तैनात करून शेतकऱ्यांना, महिलांना मारहाण करायची हा प्रकार लोकशाहीला धरून आहे का? शेतकरी आता रस्त्यावर उतरला आहे आणि हा लढा शेवटपर्यंत चालणार, असा इशाराही खासदार जाधव यांनी यावेळी दिला.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.