Parbhani Shivsena News Sarkarnama
मराठवाडा

Parbhani Mahayuti News : परभणीत महायुतीतील कुरबुरी; ठाकरे गटाच्या जाधवांसाठी ठरणार 'प्लसपॉइंट'

Prasad Shivaji Joshi

Parbhani News : लोकसभा निवडणुका जवळ येऊन ठेपल्याने सर्वच पक्षांनी तयारी सुरु केली असली तरी भारतीय जनता पक्ष सर्वात पुढे आहे. निवडणुक प्रमुख व समन्वयक यांची नियुक्ती करून विधानसभानिहाय बूथ कार्यकर्त्यांच्या आढावा बैठका घेत भाजपने आतापासूनच प्रचारात आघाडी घेतली आहे. शिवसेना-भाजप युती असताना परभणी लोकसभा मतदारसंघ शिवसेनेकडे तर कॉंग्रेस-राष्ट्रवादी कॉंग्रेस आघाडीच्या जागावाटपात राष्ट्रवादी कॉंग्रेसकडे होता.

राज्यातील सत्ता समीकरणे बदलली आणि शिवसेना, राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये फूट पडली. विद्यमान खासदार संजय जाधव शिवसेना (उबाठा) गटाकडे असल्याने महाविकास आघाडीच्या जागावाटपात परभणी लोकसभा मतदारसंघ शिवसेना (उबाठा) गटाकडे असणार ही स्पष्ट आहे. तर दुसरीकडे महायुतीच्या जागावाटपात भाजप आणि राष्ट्रवादी कॉंग्रेस (अजित पवार) गटामध्ये रस्सीखेच सुरु आहे.

महायुतीमधील १५ घटक पक्षांमध्ये समन्वय साधण्यासाठी महायुतीने राज्यभरात जिल्हास्तरीय मेळावे घेतले. परभणीत झालेल्या महायुतीच्या मेळाव्यात समन्वयापेक्षा नेत्यांमधील विसंवादच समोर आला. राष्ट्रीय समाज पक्षाचे नेते गंगाखेड विधानसभा मतदारसंघाचे आमदार रत्नाकर गुट्टे व भाजपचे जिल्हाध्यक्ष संतोष मुरकुटे यांच्यातील राजकीय वैमनस्य जाहीरपणे जनतेसमोर आले. दोघांनीही जाहीरपणे परस्परांवर आरोप केले.

भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी गुट्टे हेच आमचे उमेदवार असतील असे जाहीर केले होते. त्यामुळे महायुतीच्या मेळाव्यात गुट्टे उपस्थित असतील, अशी अपेक्षा असताना ते अनुपस्थित होते. संतोष मुरकुटे यांच्याशी असलेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर त्यांनी महायुतीच्या मेळाव्यास उपस्थित राहण्याचे टाळल्याचे बोलले जाते.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

अशाच पद्धतीने राष्ट्रवादी कॉंग्रेस (अजित पवार) चे जिल्हाध्यक्ष तथा आमदार बाबाजानी दुर्राणी व मुख्यमंत्र्यांचे विश्वासू म्हणून ओळखले जाणारे शिवसेना अल्पसंख्याक आघाडीचे प्रदेशाध्यक्ष सईद खान (Saied Khan) यांच्यातही विसंवाद आहे. त्यामुळे सईद खान यांना मेळाव्यापासून दूर ठेवल्याचे सांगितले जाते. महायुतीच्या नेत्यांमधील विसंवाद हा महायुतीच्या उमेदवारासाठी धोक्याची घंटा आहे.

महाविकास आघाडीला निवडणूक सोपी जाणार

परभणी लोकसभा मतदारसंघ मुळातच शिवसेनेचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो. त्यामुळे उद्धव ठाकरे यांच्याविषयी असलेली सहानुभूती तसेच महाविकास आघाडीमुळे दलित- मुस्लीम मते या बाजू महाविकास आघाडीचे उमेदवार शिवसेना (उबाठा) उपनेते खासदार संजय जाधव (Sanjy Jadhav ) यांच्यासाठी जमेच्या आहेत. तर दुसरीकडे महायुतीच्या नेत्यांमध्ये असलेला विसंवाद हाही त्यांच्या पथ्यावर पडू शकतो. महायुतीच्या नेत्यांच्या आपापसातील मतभेदांमुळे महाविकास आघाडीच्या उमेदवाराचा विजय सोपा होऊ शकतो.

Edited by: Sachin Waghmare

SCROLL FOR NEXT