Candidates campaign across Parbhani district as fractured alliances and multi-cornered contests dominate the Zilla Parishad elections, reducing chances of any party securing absolute majority. Sarkarnama
मराठवाडा

Parbhani ZP Election : 'परभणी झेडपी'वर एकहाती सत्ता आणणे सगळ्याच पक्षांसाठी ठरणार दिवास्वप्न!

Parbhani BJP NCP ZP Battle : परभणी जिल्हा परिषद निवडणुकीत तुटक युती, बहुकोनी लढती आणि अपक्षांचा प्रभाव वाढल्याने कोणत्याही पक्षाला एकहाती सत्ता मिळणे अशक्यप्राय ठरत आहे.

सरकारनामा ब्यूरो

शिवाजी वाघमारे

Marathwada ZP Election News : परभणी महापालिकेत शिवसेना उद्धव बाळसाहेब ठाकरे पक्ष आणि काँग्रेस आघाडीने सत्ता काबीज केल्यानंतर आता सगळ्याच राजकीय पक्षांचा कस जिल्हा परिषदेत लागणार आहे. युती-आघाडीचे प्रयत्न फसल्यानंतर आता स्वबळावर लढणाऱ्या कुठल्याच पक्षाला झेडपीवर एकहाती सत्ता आणणे अवघड असणार आहे. वस्तुस्थिती पाहिल्यास एकाही राजकीय पक्षाला सर्व 54 गटांत उमेदवार उभे करता आलेले नाही.

महायुती-आघाडी तर सोयीनुसार झाल्याचे चित्र आहे. त्यामुळे ‘त्या’ पक्षांचे जिल्हा परिषदेवर एकहाती सत्तेचे स्वप्न दिवास्वप्नच ठरण्याची दाट शक्यता आहे. जिल्ह्यात जिल्हा परिषदेचे तब्बल 54 गट असून प्रत्येक तालुक्याची राजकीय समीकरणे वेगळी आहेत. भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष व शिवसेना या प्रमुख पक्षांसह अन्य छोट्या-मोठ्या पक्षांचे उमेदवार रिंगणात आहेत. परंतु खरी लढत मात्र भाजप व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातच होण्याची शक्यता आहे.

राज्यातील सत्तेत युती म्हणून हे पक्ष एकत्र असले, तरी स्थानिक पातळीवर मात्र या दोन पक्षांसह तिसऱ्या शिवसेनेतदेखील काट्याची टक्कर होणार हे स्पष्ट आहे. जिल्हा परिषदेच्या 54 गटांत उमेदवार देण्याचे पक्षांचे मनसुबे उधळले गेले आहेत. त्यामध्ये भाजपने सर्वाधिक 49 उमेदवार दिले. त्या खालोखाल राष्ट्रवादी काँग्रेसने 42 उमेदवार उभे केले. शिवसेनेला 25, ठाकरेसेनेला 23, तर काँग्रेसला 21 ठिकाणी उमेदवारही देता आले नाही.

छोट्या-मोठ्या पक्षांसह अपक्ष 86 उमेदवार रिंगणात आहेत. काही ठिकाणी पक्षांनी उमेदवार पुरस्कृत केले आहेत. महायुती, महाविकास आघाडी होणार असल्याचे बोलले जाते होते, परंतु अपवाद वगळता महायुती व महाविकास आघाडीचा फज्जा उडाला आहे. अनेक ठिकाणी सोयीनुसार काही पक्षांनी उमेदवार दिले. काहींनी दिलेच नाहीत. कुठे एखाद्याला पाडण्यासाठी उमेदवार दिला नाही, तर कुठे एखाद्याला विजयी करण्यासाठी उमेदवार दिला नाही. ही सोयीनुसार या पक्षांची खेळी ठरली आहे. त्यासाठी मात्र विविध पक्षातील नेतेमंडळींनी एकत्र येऊन डाव साधल्याचे चित्र विविध गटांत आहे. काही ठिकाणी मैत्रीपूर्ण लढतीदेखील होत आहेत.

तालुकानिहाय चित्र वेगळे

जिल्ह्यात प्रत्येक तालुक्यातील लढतीचे चित्र वेगळे आहे. परभणी तालुक्यातील दहापैकी दोन गटांतच दुरंगी लढतीची शक्यता आहे. उर्वरीत आठ गटात तिरंगी, चौरंगी व पंचरंगी लढती आहेत. जिंतूर तालुक्यातील दहापैकी दहा गटांत भाजप-राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार आमने-सामने असले, तरी काही गटांत दुरंगी, काहींमध्ये तिरंगी लढती होतील. गंगाखेड तालुक्यातील सातपैकी कोद्रीत थेट लढत, तर अन्य सहा गटांत तिरंगी लढतीचे चित्र आहे.

पूर्णेत भाजप-ठाकरेसेनेत लढत

पूर्णा तालुक्यातील सहा गटांत भाजप, राष्ट्रवादी व ठाकरे सेना आमने-सामने असून, बहुतांश ठिकाणी तिरंगी लढती आहेत. पाथरी तालुक्यातील पाचपैकी तीन गटांत चौरंगी, तर दोन गटांत तिरंगी लढतीचे चित्र आहे. सेलू तालुक्यातील पाचपैकी दोन गटांत दुरंगी, तर तीन गटांत तिरंगी लढती आहेत. मानवतमध्ये चारही गटांत तिरंगी, सोनपेठला तीन गटांत दुरंगी, पालममध्ये चार गटांत दुरंगी लढती आहेत.

पाथरीत शिवसेनेचे उमेदवार

विशेष म्हणजे भाजपने सर्वच तालुक्यातील बहुतांश गटात उमेदवार दिले आहेत. फक्त पाथरी तालुक्यात पाचपैकी एकाच गटात उमेदवार दिला, तर शिवसेनेचे पाचही गटांत उमेदवार आहेत. शिवसेनेचेदेखील सर्वाधिक सहा उमेदवार परभणी तालुक्यात आहेत. त्यामुळे जिल्ह्यात सर्वत्र भाजपचा सामना अनेक ठिकाणी राष्ट्रवादीशी (NCP), काही ठिकाणी ठाकरेसेनेशी, तर काही ठिकाणी काँग्रेसशी होण्याची शक्यता आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT