Parbhani ZP Election Result News : 2 आठवड्यापुर्वी झालेल्या महानगरपालिका निवडणुकीत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आणि काँग्रेस आघाडीने भाजपच्या सत्तेचे स्वप्न धुळीस मिळवले. त्यानंतर लगेच लागलेल्या झेडपी निवडणुकीत देशातील नंबर एकचा पक्ष असलेल्या भाजपाला उमेदवार मिळणे अवघड झाले. अशावेळी रासपचे गंगाखेडचे आमदार रत्नाकर गुट्टे यांची मदत घेण्याचा निर्णय वरिष्ठ पातळीवर झाला. पालकमंत्री मेघना बोर्डीकर यांना तशा सूचना दिल्या गेल्या.
उमेदवार गुट्टेंचे आणि चिन्ह भाजपचे असा हा करार होता. रत्नाकर गुट्टे यांच्याशी भाजपची गट्टी जमली अन् या समीकरणामुळे झेडपीच्या सत्तेचा प्रवास मित्रपक्ष शिवसेनेच्या सोबतीने सुकर झाला. या समीकरणामुळे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आणि काँग्रेस व इतर पक्षांचा डाव मात्र पुरता फसला. मेघना बोर्डीकर- रत्नाकर गुट्टे जोडीने परभणी महापालिकेतील अपयश झेडपीत मात्र धुवून टाकले असेच म्हणावे लागेल.
महानगरपालिका आणि जिल्हा परिषद निवडणूक स्वबळावर जिंकण्याच्या उद्देशाने भाजपने माजी मंत्री सुरेश वरपूडकर यांचा पक्षप्रवेश करून घेतला होता. परंतु वरपूडकर यांचा परभणी जिल्ह्यातील करिष्मा पहिल्यासारखा राहिला नाही हे महानगरपालिकेनंतर जिल्हा परिषदेतही दिसून आले. बहुदा भाजपाला याचा अंदाज आला असावा म्हणूनच पालकमंत्री मेघना बोर्डीकर यांना भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी गंगाखेडचे आमदार रत्नाकर गुट्टे यांच्याशी हातमिळवणी करण्याचा सल्ला दिला होता.
त्यानुसार उमेदवारांची निवड आणि जागावाटप यातून भाजपला सर्वाधिक 24 जागा परभणी जिल्हा परिषदेत जिंकता आल्या आहेत. पार्टी विथ डिफरन्सचे बिरूद मिरवणाऱ्या भाजपने सुरेश वरपूडकर यांच्या घरातील व्यक्तींना जिल्हा परिषदेची उमेदवारी दिली होती. याशिवाय शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आणि काँग्रेसकडून आणखी 2 जण असे एकूण 5 उमेदवार एकाच कुटुंबातील मैदानात उतरले होते. या घराणेशाहीला परभणीच्या मतदारांनी घरचा रस्ता दाखवत 5 पैकी 4 उमेदवारांना घरी बसवले.
दुसरीकडे भाजपने आपल्या बी फार्मवर रत्नाकर गुट्टे यांच्या समर्थकांना कमळ चिन्हावर निवडणूक लढवण्यास भाग पाडले आणि 54 पैकी 24 जागा जिंकत सर्वात मोठा पक्ष ठरण्याचा मान मिळवला. भाजप नेतृत्वाच्या रत्नाकर गुट्टे यांच्यासमोर सरेंडर होण्याच्या निर्णयामुळे पालकमंत्री मेघना बोर्डीकर यांच्यावर शिवसेनेचे खासदार व इतर विरोधक अक्षरशः तुटून पडले होते. परंतु भाजप आणि मेघना बोर्डीकर यांचा हा निर्णय किती योग्य होता हे निकालानंतर स्पष्ट झाले आहे.
महानगरपालिका निवडणुकीत काँग्रेसची आघाडी करत सत्ता मिळवणाऱ्या खासदार संजय जाधव यांना जिल्हा परिषद निवडणुकीत मात्र आघाडी करूनही फारसे यश मिळवता आलेले नाही. याउलट राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार राजेश विटेकर यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादीने 15 जागा जिंकल्या तर राज्याच्या सत्तेत भाजपसोबत असलेल्या शिंदेला पाच जागांवर समाधान मानावे लागले.
काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष माजी आमदार बाबाजानी दुर्राणी, जिल्ह्याचे खासदार संजय जाधव, एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे जिल्ह्यातील नेते सईद खान, भाजपचे सुरेश वरपूडकर या नेत्यांना जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत आपले वर्चस्व दाखवता आले नाही. वंचित बहुजन आघाडी व इतर पक्षांनाही मतदारांनी फारसा थारा दिला नाही. परभणी जिल्ह्यात काँग्रेसला 3 तर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला 6 जागांवर यश मिळाले आहे. अपक्ष एका ठिकाणी निवडून आला तर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाला परभणीत खातेही उघडता आलेली नाही.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.