Vaidyanath Sugar Factory-Pankaja-Gopinath Munde News Sarkarnama
मराठवाडा

Vaidyanath sugar factory : गोपीनाथ मुंडेंनी स्थापन केलेला वैद्यनाथ कारखाना पंकजा मुंडेंनी विकला!

Vaidyanath Sugar Factory Sale : ऊस उत्पादकांच्या शेअर्स, ठेवींचे काय? साडेसात हजार संस्थापक सभासदांना विश्वासात न घेता फक्त 132 कोटी रुपयांना ओमकार ग्रुपला विकण्यात आल्याचा आरोप.

Jagdish Pansare

  1. गोपीनाथ मुंडे यांनी स्थापन केलेला ऐतिहासिक परळी वैद्यनाथ साखर कारखाना अखेर विक्रीस गेला असून, या निर्णयामुळे शेतकरी आणि ऊस उत्पादकांमध्ये तीव्र नाराजी निर्माण झाली आहे.

  2. शेतकऱ्यांचा आरोप आहे की, हा कारखाना त्यांच्या हिताविरुद्ध विकण्यात आला असून, त्यांची थकबाकीही प्रलंबित आहे.

  3. या विक्रीमुळे मुंडे कुटुंबाच्या राजकीय वारशावरही प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून, स्थानिक पातळीवर आंदोलनाची चिन्हे दिसू लागली आहेत.

Beed Political News : बीड जिल्ह्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांना सोयीचे व्हावे, त्यांचा ऊस बाहेरच्या जिल्ह्यात किंवा राज्यात न्यावा लागू नये या उद्दात हेतूने दिवंगत गोपीनाथ मुंडे यांनी पांगरी येथे वैद्यनाथ सहकारी साखर कारखाना स्थापन केला. साडेसात हजाराहून अधिक संस्थापक सभासद असलेला हा कारखाना बँकेचे कर्ज, थकबाकी या कारणांमुळे विकण्यात आला आहे. विशेष म्हणजे गोपीनाथ मुंडे यांच्या राजकीय वारस असलेल्या मंत्री पंकजा मुंडे यांच्या अध्यक्षपदाच्या काळातच तो विक्री होत असल्याबद्दल आश्चर्य आणि संताप व्यक्त होत आहे.

शेतकऱ्यांच्या हितासाठीच कारखाना खासगी ग्रुपला विक्री करण्याचा निर्णय घेण्यात आल्याचा दावा पंकजा मुंडे (Pankaja Munde) व कारखान्याच्या संचालक मंडळाकडून केला जात आहे. दिवाळीपुर्वी म्हणजेच गाळप हंगाम सुरू होण्याआधाची वैद्यनाथ कारखान्याची विक्री होऊन तो खासगी उद्योगाला हंस्तातरित केला जाणार असल्याने ऊस उत्पादक शेतकरी, संघटना आक्रमक झाल्या असून क्रांतीकारी संघटनेने कारखाना विक्री निर्णयाच्या विरोधात कोर्टात धाव घेण्याचा इशारा दिला आहे. एवढेच नाही तर गोपीनाथ मुंडे यांच्या समाधीस्थळावर दिवाळीनंतर उपोषण सुरू करणार असल्याचे सांगीतले आहे.

क्रांतिकारी शेतकरी संघटनेचे पदाधिकारी कुलदीप करपे यांनी वैद्यनाथ सहकारी साखर कारखाना (Sugar Factory) विक्रीवर सवाल उपस्थित केले आहेत. ऊस उत्पादकांच्या शेअर्स, ठेवींचे काय? साडेसात हजार संस्थापक सभासदांना विश्वासात न घेता फक्त 132 कोटी रुपयांना ओमकार ग्रुपला विकण्यात आल्याचा आरोप त्यांनी केला. हा व्यवहार करून संचालक मंडळाने बँकांची कर्ज बुडवण्यासाठी करण्यात आला असून या संपूर्ण प्रकरणाची चौकशी केली जावी, अशी मागणी केली जात आहे.

परळी तालुक्यातील पांगरी येथील वैद्यनाथ सहकारी साखर कारखाना विक्री केल्याची माहिती समोर आल्यानंतर बीड जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे. गोपीनाथ मुंडे यांनी स्थापन केलेल्या या प्रतिष्ठित सहकारी साखर कारखान्याची विक्री झाल्याचा दावा कायदाविषयक सल्लागार परमेश्वर गीते यांनी केला आहे. ही विक्री थांबवावी, अशी मागणी त्यांनी बीडच्या जिल्हाधिकाऱ्यांकडे केला आहे.

आर्थिक अडचण, कारखान्याची यंत्र सामुग्रीची चोरी अशा अनेक प्रकारांमुळे वैद्यनाथ कारखाना चर्चेत होता. संचालक मंडळाच्या निवडणुकीत मंत्री पंकजा मुंडे, आमदार धनंजय मुंडे या बहिण भावाने हातमिळवणी केल्यानंतर कारखान्याला 'अच्छे दिन' येतील असे वाटत होते. मात्र दिवसेंदिवस वैद्यनाथची अवस्था बिकट होत गेली. यापुर्वी पंकजा मुंडे यांच्या अध्यक्षपदाच्या काळात शेतकऱ्यांचे हित डोळ्यासमोर ठेवून हा कारखाना भाडेतत्वावर चालवण्याचा निर्णय घेण्यात आला होता. मात्र आतो तो विकण्यात आल्याचा आरोप केला जातोय.

यापूर्वीही पंकजा मुंडे यांच्या ताब्यात असलेल्या पनगेश्वर साखर कारखान्याची विक्री झाली होती. त्यामुळे गोपीनाथ मुंडे यांनी उभा केलेल्या वैद्यनाथ साखर कारखान्याच्याही भवितव्यावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. कायदे विषयक सल्लागार परमेश्वर गीते यांनी युनियन बँक ऑफ इंडिया मार्फत वैद्यनाथ कारखाना ओमकार साखर कारखाना प्रायव्हेट लिमिटेडला विक्री करण्यात आल्याचे म्हटले आहे. 14 ऑगस्ट 2025 रोजी खरेदीखत नोंदवण्यात आलेले आहे.

खरेदीखत ऑफलाइन नोंदवल्यामुळे त्या कारखान्याचे योग्य मूल्यांकन करण्यात आलेले नाही. 131 कोटी 98 लाख रुपयांच्या कवडीमोल रकमेत कारखाना विक्री करण्यात आलेला आहे. हा कारखाना विक्री करण्याचा निर्णय शेतकऱ्यांच्या हिताच्या विरोधातील आहे. शेतकरी आणि सभासदांचे भांडवल बुडाल्याचे यातून दिसत असल्याचा आरोप करतानाच शासनाने हस्तक्षेप करून खरेदी खत व्यवहार रद्द करावा. तसेच शासनाकडून कारखान्याला मदत मिळावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.

FAQs

1. परळी वैद्यनाथ साखर कारखाना कोणत्या नेत्याने स्थापन केला होता?
हा कारखाना भाजप नेते दिवंगत गोपीनाथ मुंडे यांनी स्थापन केला होता.

2. कारखाना विक्री का करण्यात आली?
आर्थिक अडचणी आणि प्रलंबित कर्जामुळे कारखाना विक्रीचा निर्णय घेतल्याचे सूत्र सांगतात.

3. या विक्रीला शेतकऱ्यांचा विरोध का आहे?
शेतकऱ्यांचे म्हणणे आहे की त्यांचे ऊस बिल आणि देणी बाकी आहेत, तरीही कारखाना विकण्यात आला.

4. या प्रकरणात मुंडे कुटुंबाची प्रतिक्रिया काय आहे?
अधिकृत प्रतिक्रिया अद्याप आलेली नसली तरी विक्रीनंतर संतापाचे सूर उमटले आहेत.

5. पुढे काय होऊ शकते?
शेतकरी संघटना आणि स्थानिक कार्यकर्ते आंदोलनाच्या तयारीत असून, सरकारकडून विक्री व्यवहार रद्द करण्याची मागणी केली जाऊ शकते.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT