pawanraje nimbalkar murder case sarkarnama
मराठवाडा

Pawanraje Nimbalkar : तारीख ठरली! तब्बल 20 वर्षानंतर पवनराजे निंबाळकरांच्या हत्या प्रकरणाचा लागणार निकाल

Maharashtra Politics : धाराशिवचे विद्यमान खासदार ओमराजे निंबाळकर यांचे वडील दिवंगत पवनराजे निंबाळकर व त्यांच्या गाडी चालकांची हत्या झाली होती. आता या घटनेला वीस वर्ष झाली आहेत.

Jagdish Pansare

  1. पवनराजे निंबाळकर हत्याकांडाचा निकाल 14 मे रोजी लागणार आहे.

  2. या प्रकरणात पद्मसिंह पाटील यांच्यासह 9 जणांवर आरोप आहेत.

  3. तब्बल 20 वर्षांनंतर या गाजलेल्या प्रकरणाचा निकाल लागणार आहे.

Dharashiv Politics : धाराशिवचे विद्यमान खासदार ओमराजे निंबाळकर यांचे वडील दिवंगत पवनराजे निंबाळकर व त्यांच्या गाडी चालकांची हत्या होऊन वीस वर्ष झाली आहेत. या हत्याकांडाचा निकाल येत्या 14 मे रोजी लागणार आहे. राज्यभर गाजलेल्या या प्रकरणात राज्याचे माजी गृहमंत्री पद्मसिंह पाटील यांच्यासह 9 जणांवर आरोप आहेत. मुंबईतील अतिरिक्त सत्र न्यायाधीश तथा विशेष न्यायाधीश एस आर नावंदर यांच्या कोर्टात या प्रकरणाची सुनावणी सुरू आहे.

दरम्यान सोमवारी (ता. 20 एप्रिल) झालेल्या सुनावणीला डॉ पद्मसिंह पाटील यांच्यासह सात आरोपी हजर होते. गेल्या अनेक वर्षापासून राज्याच्या राजकारणात या प्रकरणाची चर्चा आहे. कट रचून 25 लाखांची सुपारी देऊन पवनराजे निंबाळकर आणि त्यांच्या चालकाची गोळ्या घालून हत्या करण्यात आल्याचा आरोप या सर्व आरोपींवर आहे. या प्रकरणात पारसमल जैन बादला हा माफीचा साक्षीदार असून त्याचा जबाब निकालात महत्त्वाचा ठरणार आहे.

या हत्या प्रकरणाची व्याप्ती आणि त्यात पद्मसिंह पाटील यांचे नाव आल्याने या संपूर्ण हत्याकांडाचा तपास हा पोलीस, सीआयडी, सीबीआय या तीन तपास यंत्रणांकडून करण्यात आला होता. समाजसेवक अण्णा हजारे यांच्यासह 128 साक्षीदार या प्रकरणात तपासण्यात आले आहेत. अनेक महिने कट रचल्यानंतर पवनराजे यांच्या हत्येसाठी 25 लाखांची सुपारी देण्यात आली होती, असा दावा सीबीआयने आपल्या तपासात केला आहे.

4 जुलै 2011 पासून तब्बल चौदा वर्षापासून या प्रकरणाची सुनावणी सुरू आहे. यात आरोपी असलेल्या डॉ. पद्मसिंह पाटील यांच्या वतीने तब्बल साडेबाराशे पानाचे लेखी म्हणणे मांडण्यात आले आहे. यात पवनराजे निंबाळकर यांच्या कुटुंबावरच गंभीर आरोप करण्यात आले आहेत. 3 जून 2006 रोजी पवनराजे निंबाळकर यांची कळंबोली येथे हत्या करण्यात आली होती. त्यानंतर तीन वर्षांनी म्हणजे 6 जून 2009 रोजी डॉ. पद्मसिंह पाटील यांना ते खासदार असताना सीबीआयने अटक केली होती.

पवनराजे यांची हत्या केल्यानंतर दोन शूटरर्सनी चालक समद काझी यांचीही गोळी घालून हत्या केली होती. या हल्ल्यात दोघाचांही जागेवरच मृत्यू झाला होता. राजकीय कारकीर्द आणि अस्तित्वाला धोका निर्माण झाल्याने माजी गृहमंत्री डॉ. पद्मसिंह पाटील व इतरांनी मिळून पवनराजे यांच्या हत्येचा कट रचला आणि त्यासाठी 25 लाखांची सुपारी दिल्याचा ठपका सीबीआयने दोषारोपपत्रात ठेवला आहे.

FAQs :

1. निंबाळकर हत्याकांडाचा निकाल कधी लागणार आहे?
14 मे रोजी निकाल लागणार आहे.

2. या प्रकरणात कोणावर आरोप आहेत?
पद्मसिंह पाटील यांच्यासह 9 जणांवर आरोप आहेत.

3. हे प्रकरण किती वर्षांपासून सुरू आहे?
हे प्रकरण सुमारे 20 वर्षांपासून सुरू आहे.

4. सुनावणी कुठे सुरू आहे?
मुंबईतील विशेष न्यायालयात सुनावणी सुरू आहे.

5. या प्रकरणाचे महत्त्व काय आहे?
हे राज्यभर गाजलेले आणि उच्चप्रोफाइल प्रकरण आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT