AIMIM News : छत्रपती संभाजीनगरमध्ये उघडकीस आलेल्या आदर्श सहकारी पतसंस्थेतील तीनशे कोटींच्या घोटाळ्यात अद्यापही ठेवीदारांना पैसे परत मिळण्याची प्रक्रिया सुरू झालेली नाही. (Adarsh Scam News) शहरात झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीवर खासदार इम्तियाज जलील यांच्या नेतृत्वाखाली आदर्शच्या ठेवीदारांचा मोर्चा काढण्यात आला होता. या वेळी महिनाभरात ठेवीदारांचे पैसे परत देण्याची कारवाई सुरू केली जाईल, असे आश्वासन सहकारमंत्री दिलीप वळसे पाटील, मंत्री गिरीश महाजन यांनी ठेवीदारांना दिले होते.
त्यानंतर काही काळ पतसंस्थेच्या अध्यक्ष, संचालक व बड्या कर्जदारांच्या मालमत्ता जप्त करण्याच्या कारवाईला वेग आला होता. (Aimim) मात्र, त्यानंतर पुढे पुन्हा प्रक्रिया थंडावली. या पार्श्वभूमीवर खासदार इम्तियाज जलील यांनी नुकतीच मंत्री गिरीश महाजन (Girish Mahajan) यांची मुंबईत भेट घेऊन चर्चा केली. या वेळी झालेल्या बैठकीत ठेवीदारांना लवकर पैसे परत करण्याची विनंती केली. जेणेकरून तेदेखील दिवाळी साजरी करू शकतील.
या प्रक्रियेला गती देण्याचे आश्वासन गिरीश महाजन यांनी इम्तियाज (Imtiaz Jaleel) यांना दिले. सहनिबंधक कार्यालयाने आदर्शच्या काही संचालक व बड्या थकबाकी असलेल्या १९ कर्जदारांच्या संपत्ती जप्त करून त्यांची विक्री करण्याचा निर्णय घेतला होता. जिल्हाधिकाऱ्यांनी या प्रस्तावाला मंजुरी देऊन तो शासनाकडे पाठवलाही होती. या जप्त मालमत्तेच्या विक्रीतून दोन कोटी रुपये मिळणार होते. ज्यातून ठेवीदारांना त्यांचे पैसे परत करण्यात येणार होते.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
परंतु बड्या थकबाकीदार कर्जदारांच्या मालमत्ता खरेदीसाठी प्रतिसाद मिळाला नसल्याचे बोलले जाते. या पार्श्वभूमीवर इम्तियाज यांनी मुंबईत गिरीश महाजन यांची भेट घेतली. दिवाळी दोन आठवड्यांवर आहे, तेव्हा ठेवीदारांना लवकरात लवकर पैसे देण्याची प्रक्रिया पार पाडावी, जेणेकरून त्यांनाही दिवाळी साजरी करता येईल, अशी मागणी इम्तियाज यांनी केली आहे.
तीनशे कोटींहून अधिकच्या आदर्श पतसंस्था घोटाळ्यात हजारो ठेवीदारांचे पैसे अडकले आहेत. अनेक ठेवीदारांच्या या धक्क्याने मृत्यू झाला आहे, तर काहींनी आत्महत्या केल्या आहेत. या पतसंस्थेत ४० हजारांहून अधिक ठेवीदारांच्या ठेवी अडकल्या आहेत. संचालक मंडळ बरखास्त केल्यानंतर सहकार विभागाने ठेवीदारांच्या ठेवी परत मिळवून देण्यासाठी कारवाई सुरू केली आहे.
Edited By : Jagdish Pansare
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.