Ashok Chavan  Sarkarnama
मराठवाडा

Ashok Chavan News: जनतेचा मोदींच्या नाही, तर काँग्रेसच्या गॅरंटीवर विश्वास; अशोक चव्हाणांचा दावा

Laxmikant Mule

Nanded News: नुकत्याच झालेल्या पाचपैकी तीन राज्यांत भाजपने बहुमतासह सत्ता मिळवली. छत्तीसगड, मध्य प्रदेश, राजस्थान राज्यांमध्ये भाजपने `मोदींच्या गॅरंटी`वर मते मागितली. मतदारांनीही त्यावर विश्वास ठेवला आणि या तीनही राज्यांचा कारभार भाजपच्या हाती सोपवला. तीन राज्यांतील या विजयानंतर भाजपचा आत्मविश्वास भलताच वाढला आहे.

काँग्रेस मात्र मोदींची गॅरंटी मानायला तयार नाही. देशातील जनतेचा विश्वास हा मोदींच्या गॅरंटीवर नाही, तर काँग्रेसच्या गॅरंटीवर असल्याचा दावा माजी मुख्यमंत्री काँग्रेसनेते अशोक चव्हाण यांनी केला आहे. नांदेडमध्ये माध्यमांशी बोलताना त्यांनी मोदी गॅरंटीवर टीका केली. वाढती महागाई, बेरोजगारी यामुळे जनता त्रस्त झाली आहे. जनतेचा विश्वास काँग्रेसच्या गॅरंटीवर आहे. येणाऱ्या लोकसभा व विधानसभा निवडणुकीत परिवर्तन अटळ आहे, असा दावाही चव्हाण यांनी केला.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

एवढेच नाही, तर हिंगोली, नांदेड या दोन्ही लोकसभेच्या जागा निवडून येतील, असा विश्वास व्यक्त करत त्यांनी हिंगोलीची जागा काँग्रेसलाच मिळणार असल्याचे संकेतही दिले. आगामी लोकसभा निवडणुकीच्या दृष्टीने महाविकास आघाडीने जोरदार तयारी सुरू केली आहे.

एकीकडे नांदेडचे विद्यमान खासदार प्रताप पाटील चिखलीकर अशोक चव्हाण भाजपमध्ये येणार असल्याचा दावा करत आहे, तर दुसरीकडे चव्हाण मात्र आगामी लोकसभा निवडणुकीच्या प्रचारातून भाजपच्या नेत्यांवर हल्ला चढवत आहेत.

आगामी लोकसभा निवडणुकीत महायुती व महाविकास आघाडीच्या जागावाटपात काही जागांची अदलाबदल होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. यात सुरुवातीपासून हिंगोलीच्या जागेसाठी आग्रही असणाऱ्या अशोक चव्हाण यांनी या मतदारसंघातून काँग्रेसच विजयी होणार, असा दावा केला.

त्यांच्या या दाव्यामुळे ठाकरे गटाने हिंगोलीची जागा काँग्रेसला सोडली की काय? अशी चर्चाही सुरू झाली आहे. नांदेडची जागा काँग्रेसच लढवणार हेही चव्हाण यांच्या विधानाने स्पष्ट झाले आहे. नांदेड शहरातील काँग्रेस पक्ष कार्यालयात झालेल्या एका कार्यक्रमात अशोक चव्हाण यांनी हिंगोली येथील सामाजिक कार्यकर्ते शेख नईम शेख लालसाब यांनी समर्थकांसह काँग्रेसमध्ये प्रवेश केला.

काँग्रेस पदाधिकारी, कार्यकत्यांनी ताकदीने लढल्यास हिंगोली व नांदेडच्या लोकसभा जागेसह विधानसभा निवडणुकीतसुद्धा आपला विजय निश्चित असल्याचा दावा चव्हाण यांनी यावेळी केला. देशात मोदींची गॅरंटी नाही, तर काँग्रेसच्या गॅरंटीवर जनतेचा विश्वास असल्याचा पुनरुच्चारही चव्हाण यांनी केला. यावेळी हिंगोली काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष दिलीप देशमुख यांच्यासह हिंगोली व नांदेड येथील पदाधिकारी उपस्थित होते.

(Edited By Ganesh Thombare)

R...

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT