Marathwada Political News : बीड जिल्ह्याच्या राजकारणात 20-25 वर्ष आपला दबदबा कायम ठेवणारे माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर सध्या शांत आहेत. राजकीय पक्षात त्यांचा सक्रीय सहभाग दिसून येत नाही. स्थानिक स्वराज्य संस्था तसेच 2019 च्या विधानसभा निवडणुकीत पुतण्याकडून झालेला पराभव. त्यानंतर शिवसेनेत प्रवेश करण्याचा फसलेला निर्णय यातून जयदत्त क्षीरसागर अद्यापही सावरले नसल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे. आधी कुटुंबातूनच राजकीय आव्हान मिळाले. पुतण्याकडून पराभव स्वीकारावा लागला. तर, काही महिन्यांपूर्वी सोबत असलेला दुसरा पुतण्याही राजकीय साथ सोडून अजित पवार गटासोबत गेला. त्यामुळे जयदत्त क्षीरसागर मोठा निर्णय घेणार असल्याची कुजबूज आहे.
जयदत्त क्षीरसागर यांनी नुकतीच केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डाॅ. भागवत कराड यांची सदिच्छा भेट घेतली. ही भेट सदिच्छा होती की राजकीय, हे येत्या काही दिवसात स्पष्ट होईल. विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांचे चिरंजीव धर्मराज व रश्मी यांच्या विवाह सोहळ्याला जयदत्त क्षीरसागर यांनी हजेरी लावली. तत्पुर्वी क्षीरसागर यांनी कराड यांच्या निवासस्थानी भेट देऊन त्यांच्याशी चर्चा केली.
कराड यांनीही क्षीरसागर यांचे स्वागत केले तसेच पुष्पगुच्छ, शाल, श्रीफळ देत यथोचित सत्कार केला. या दोन नेत्यांमध्ये बराचवेळ चर्चा झाली. जयदत्त क्षीरसागर सध्या नव्या राजकीय पक्षाच्या शोधात आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस आणि काहीकाळ शिवसेनेत घालवल्यानंतर क्षीरसागर आता तटस्थ आहेत. आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर क्षीरसागर यांनी कराडांची भेट घेतल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजप नेत्या पंकजा मुंडे यांच्याशी क्षीरसागर यांचे संबंध आणि संवादही आहे.
कराड यांच्या भेटीनंतर जयदत्त क्षीरसागर कोणता मोठा राजकीय निर्णय घेतात? याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे. दरम्यान, काही महिन्यापुर्वी बीड येथे अजित पवार यांच्या उपस्थितीत झालेल्या एका जाहीर कार्यक्रमात जयदत्त क्षीरसागर यांचे पुतणे योगेश क्षीरसागर यांनी राष्ट्रवादीत (अजित पवार गट) प्रवेश केला होता. या प्रवेशाला जयदत्त क्षीरसागर यांचाही पाठिंबा असल्याच्या चर्चा त्यावेळी जिल्ह्यात रंगल्या होत्या. परंतु या निर्णयाशी आपला काहीही संबंध नसल्याचे क्षीरसागर यांनी स्पष्ट केले होते. शिवाय सध्या माझा कुठलाही राजकीय निर्णय नाही, असेही स्पष्ट केले होते.
गेल्या 50 वर्षात बीड जिल्ह्यातील जनतेने आणि माझ्या जीवलग कार्यकर्त्यांनी माझ्या राजकीय व सार्वजनिक प्रवासात प्रेम आणि पाठबळ दिलेले आहे. अशा जीवाभावाच्या लोकांना विश्वासात घेतल्या शिवाय मी कोणताही राजकीय निर्णय घेणार नाही. विकासासाठी व जनहितासाठी सतत पाठपुरावा आणि संघर्ष चालू राहील. सध्या सुरु असणाऱ्या चर्चेत किंवा राजकीय निर्णयात माझा कसलाही सहभाग नाही. भविष्यात योग्य वेळी सर्वांना विश्वासात घेऊन योग्य राजकीय निर्णय घेतला जाईल.
माझ्या राजकीय स्वार्थासाठी मी कुठलेही निर्णय कधीही घेतलेले नाही. जनतेचा कौल जो असेल तोच माझा निर्णय असेल, असे क्षीरसागर यांनी म्हटले होते. त्यानंतर पाच महिन्यांनी क्षीरसागर यांनी छत्रपती संभाजीनगर येथे केंद्रीय अर्थ राज्यमंत्री भागवत कराड यांची त्यांच्या निवासस्थानी जाऊन भेट घेतली. या भेटीनंतर त्यांची राजकीय निर्णय घेण्याची योग्य वेळ हीच तर नाही ना ? असे प्रश्न उपस्थितीत होत आहेत.
(Edited By Roshan More)