Sharad Pawar Rally News Sarkarnama
मराठवाडा

Sharad Pawar Rally : पाचोडमध्ये शरद पवारांचे भुमरेंना धडकी भरवणारे स्वागत..

NCP News : अजूनही पैठण तालुक्यात राष्ट्रवादी मजबूत असल्याचे चित्र आजच्या स्वागतावरून दिसले.

सरकारनामा ब्युरो

Marathwada News : राष्ट्रवादीचे अध्यक्ष खासदार शरद पवार दोन दिवसांपासून मराठवाडा दौऱ्यावर आहेत. (Sharad Pawar Rally) काल शहरातील विविध कार्यक्रमांना हजेरी लावत त्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत पवारांनी राज्य आणि देशपातळीवरच्या राजकारणावर आपली परखड मते मांडली. आज पवारांची बीडमध्ये सभा होत आहे. बीडला रवाना होतांना जिल्ह्याचे पालकमंत्री तथा राज्याचे रोजगार हमी योजना व फलोत्पादन मंत्री संदीपान भुमरे यांच्या पाचोड गावात शरद पवारांचे जंगी स्वागत झाले.

पवारांच्या (Sharad Pawar) गाड्यांचा ताफा पाचोडमधूनच जाणार असल्याने राष्ट्रवादीच्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी मुख्य रस्त्यावर मोठी गर्दी केली होती. सकाळी पवारांचा ताफा पाचोडमध्ये दाखल होताच फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली. ` महाराष्ट्राचा बुलंद आवाज, शरद पवार, शरद पवार`, अशा घोषणांनी पाचोड दणाणून गेले होते.

राष्ट्रवादीचा (NCP) एक मोठा गट अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली शिंदे-फडणवीस सरकारमध्ये सामील झाल्यानंतर पक्षाची ताकद क्षीण झाली असे वाटत असतांना ज्या उत्साहात आणि हजारोंच्या संख्येने पवारांचे स्वागत पाचोडमध्ये झाले, ते चित्र मंत्री संदीपान भुमरे यांना निश्चितच धडकी भरवणारे होते. (Paithan) महाविकास आघाडीत असतांना अजित पवार यांनी पैठणला मेळावा घेत भुमरे यांच्यावर टीका केली होती.

पैठण तालुक्यात झालेला विकास हा काॅंग्रेस-राष्ट्रवादीच्या काळात झाला होता, मग तुम्ही तीस वर्षात काय केले? लोकांना दारू प्यायला लावता का? असा सवाल करत भुमरे यांच्याविरुद्ध दंड थोपटले होते. पण त्यानंतर काही महिन्यातच अजित पवार समर्थक आमदारांसह सत्तेत जाऊन बसले. त्यामुळे भुमरे यांना तालुक्यात आता विरोधकच उरला नाही, अशी चर्चा सुरू झाली होती. परंतु ठाकरे गटाच्या जोडीला शरद पवारांची राष्ट्रवादीही मैदानात उतरली आहे.

अजूनही पैठण तालुक्यात राष्ट्रवादी मजबूत असल्याचे चित्र आजच्या स्वागतावरून दिसले. पाचोड हे भुमरे यांचे मुळ गाव. या गावातल्या ग्रामपंचायतीपासूनच भुमरे यांनी आपल्या राजकाराणाला सुरूवात केली. पाचवेळा आमदार म्हणून निवडून आलेले भुमरे महाविकास आघाडी आणि आता शिंदे-फडणवीस सरकारमध्ये देखील कॅबिनेट मंत्री आहेत. शरद पवारांचा करिश्मा पक्ष फुटल्यानंतर कमी होण्याऐवजी वाढतच असल्याचे त्यांच्या स्वागतावरून दिसून आले आहे.

Edited By : Jagdish Pansare

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT