प्रकल्प पूर्ण झाल्यावर उद॒घाटन करण्याची प्रथा आहे. पण, अहमदनगर-बीड-परळी हा लोहमार्ग प्रकल्प अपूर्ण असताना यातील आष्टी ते अंमळनेर या एका टप्प्याच्या उद्घाटनाचा घाट घालण्यात आला आहे. याचे उद्घाटन खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी करणार आहेत. अपूर्ण प्रकल्पाच्या उद॒घाटनांची नवाच पायंडा या निमित्ताने पडणार आहे.
हा 45 वर्षे जुना प्रकल्प असून कधी पूर्ण होणार, याची विचारणा प्रतीक्षा नगर आणि बीड जिल्हावासीय करत आहेत. या मार्गासाठी अनेक वर्षांपासून आंदोलने झाली आहेत, कोर्टकचेऱ्या झाल्या आहेत, तरीही प्रकल्पाला वेग मिळत नाही, हे विशेष.
अहमदनगर-बीड-परळी रेल्वे (Ahmednagar-Beed-Parli Railway Project) हा 45 वर्षांपासून रखडलेला प्रकल्प आहे. हा प्रकल्प वेगाने मार्गा लागावा यासाठी अनेक सामाजिक कार्यकर्ते, संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी वेळोवेळी आंदोलने केली.
आंदोलनामुळे कार्यकर्त्यांवर कोर्टकचेऱ्यांत खेटे मारावे लागत आहेत. त्यानंतरही आजही हा प्रकल्प अपूर्ण आहे. या अपूर्ण प्रकल्पातील एका टप्प्याचे पंतप्रधान मोदी उद्घाटन करणार आहेत.
हा रेल्वेमार्ग 261 किलोमीटरचा असून सुरुवातील त्याचा खर्च 200 कोटींचा होता. पण प्रकल्प 45 वर्षे रखडल्याने आता त्याचा खर्च साडेचार हजार कोटींवर गेला आहे. तत्कालीन मुख्यमंत्री विलासराव देशमुख (Vilasrao Deshmukh) यांनी या रेल्वे प्रकल्पाचा निम्मा खर्च राज्य सरकार आणि निम्मा खर्च केंद्र सरकार करेल, असा धोरणात्मक निर्णय घेतला होता. एखाद्या रेल्वेमार्गासाठी राज्य सरकारने निम्मा खर्च करण्याचा देशातला हा पहिला निर्णय होता.
2014 च्या लोकसभा पोटनिवडणुकीच्या (Loksabha Election) प्रचारसभेत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी (Narendra Modi) हा रेल्वेमार्ग पूर्ण करण्याचे आश्वासन दिले होते. तर, 2019 सालच्या लोकसभा निवडणुकीचा अर्ज भरण्यासाठी रेल्वेत बसून येऊन, असे आश्वासन स्थानिक भाजप (BJP) नेत्यांनी दिले होते.
261 किलोमीटरपैकी अहमदनगर ते नारायणडोह (12 किलोमीटर) आणि अहमदनगर ते सोलापूरवाडी (35 किलोमीटर) हे काम पूर्ण झाले आहे. या मार्गावरील चाचणीही झाली. याचे उद्घाटन यापूर्वीच झाले होते. गेल्या वर्षी नगर ते आष्टी (60 किलोमीटर) अंतराची चाचणीही पूर्ण झाली. एकूणच आतापर्यंत अहमदनगर ते विघनवाडी (66 किलोमीटर) काम पूर्ण होऊन या मार्गावर हायस्पीड रेल्वेची चाचणीही झाली.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
आता अहमदगनर ते अंमळनेर रेल्वे सुरू होण्याचा मार्ग मोकळा झाला असला तरी यापूर्वी अहमदनगर ते आष्टी सुरू झालेली रेल्वे बंद झाली आहे. आता या मार्गाचे बुधवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी ऑनलाईन पद्धतीने उद्घाटन करणार आहेत.
एकून 261 किलोमीटरपैकी 200 किलोमीटरचे काम अपूर्ण आहे. अहमदनगरहून बीड आणि बीडहून परळीपर्यंत रेल्वे कधी धावणार याचा कुठलाही पत्ता नाही. तरीही एकेका टप्प्याचे उद्घाटन आणि लोकार्पणाचा सपाटा भाजपकडून लावला जात आहे. त्यातही 'बीडकरांचे स्वप्न पूर्ण', अशा घोषणा देत रेल्वेचे स्वप्न पाहणाऱ्या जिल्हावासीयांच्या जखमांवर भाजपकडून मीठ चोळले जात आहे.
प्रकल्प पूर्ण झाला तर त्याच्या उद॒घाटनाचा सोहळा कौतुकाचा असू शकतो. पण, अपूर्ण प्रकल्पाचा टप्प्याटप्प्याने उद्घाटन करून भाजप लोकसभा निवडणुकीसाठी आपली रेल्वे सुसाट पळवत आहे, एवढे खरे!
(Edited by Avinash Chandane)
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.