Georai municipal election : राजकारण नात्यागोत्याचं अन् संघर्षाच असे चित्र नहेमीच पहायला मिळते. महाराष्ट्राच्या राजकारणातील घराणेशाही आणि नात्याच्या नेत्यांमधील टोकाचे वाद याची असंख्य उदाहरणं आहेत.
याच पठडीत बसणारे दोन राजकीय घराणे म्हणजे बीड जिल्ह्यातील गेवराईचे पंडित आणि पवार कुटुंब. एकमेकांचे नातेवाईक असलेल्या या घराण्यांमध्ये राजकारणामुळेच आता विस्तवही जात नाही. नगरपालिका निवडणुकीचे मतदान सुरू असतानाच जो प्रकार गेवराईत घडला हे त्याचे ताजे उदाहरण ठरते.
काही काळ नात्या - गोत्यांमुळी थंडावलेले पंडितांचे राजकीय युद्ध मागच्या 12वर्षांपासून पुन्हा सुरु आहे. आता नगरपालिका निवडणुकीत (Election) पंडितांच्या घरातील कोणी उमेदवार नसला, तरी पंडित-पवार पुन्हा आमने सामने आहेत. आज नगर पालिका मतदानाच्या दिवशीच पंडित-पवारांमध्ये संघर्ष भडकला. वाहनांची तोडफोड, दगडफेक आणि एकमेकांच्या अंगावर धावून जाण्याच्या प्रकाराने सकाळी गेवराईत तणाव होता.
याची सुरुवात अगोदर आतेभाऊ-मामेभाऊ पृथ्वीराज पंडित व शिवराज पवार यांच्या भांडणाने झाली. या भांडणानंतर माजी आमदार अमरसिंह पंडित (Amarsinh Pandit) यांचे स्वीय्य सहाय्यक अमृत डावकर यांच्यासोबत बाळराजे पवार यांनी अरेरवारी केली. अमृत डावकर देखील पंडितांच्या नात्यातले म्हणजे पवारांचेही नातेवाईकच आहेत. त्यांच्यासोबत अनुचित प्रकार घडल्याने जयसिंग पंडित व त्यांचे पुत्र पृथ्वीराज पंडित चांगलेच संतापले.
दोघेही बापलेक हातात हात घालून थेट मेहुणे माजी आमदार लक्ष्मण पवार यांच्या घरावर धडकले. यावेळी जयसिंग पंडित व लक्ष्मण पवार हे दोघेही मेहुणे एकमेकांवर धावून गेले. या ठिकाणीही वाहनांची तोडफोड झाली. पोलिस अधीक्षक नवनीत काँवत ताफ्यासह गेवराईत पोचल्यानंतर हा तणाव निवळला. त्यानंतर मतदान शांततेत पार पडले.
बीड जिल्ह्यातील बीडसह गेवराई, माजलगाव, परळी, अंबाजोगाई आणि धारुर नगर पालिकांच्या निवडणुकीसाठी आज मतदान होत आहे. गेवराईत रंगतदार निवडणुक होत आहे. येथे भाजपकडून माजी आमदार लक्ष्मण पवार यांच्या भावजय व बाळराजे पवार यांच्या पत्नी गिता पवार तर राष्ट्रवादी काँग्रेसकडून शितल दाभाडे रिंगणात आहेत. या ठिकाणी पंडित व पवारांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. 18 वर्षांची पवारांची पालिकेवरील सत्ता उलथवण्यासाठी पंडितांची फौज मैदानात उतरली आहे.
दरम्यान, माजी आमदार लक्ष्मण पवार व बाळराजे पवार यांच्या भगीनी वृषाली या माजी आमदार अमरसिंह पंडित व आमदार विजयसिंह पंडित यांचे बंधू जयसिंग पंडित यांच्या पत्नी आहेत. त्यामुळे पवार - पंडितांचे नाते मेहुण्यांचे आहे. मात्र, आज हे दोन्ही मेहुणे एकमेकांच्या अंगावर धावून गेल्याचे पहायला मिळाले. या प्रकारानंतर अमरसिंह पंडित, आमदार विजयसिंह पंडित यांनीही संतप्त प्रतिक्रिया दिल्या. आम्ही बांगड्या भरलेल्या नाहीत, असा इशारा विजयसिंह यांनी दिला होता.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.