Bjp : छत्रपती संभाजीनगर कृषी उत्पन्न बाजार समिती (Chhatrapati Sambhajinagar APMC News ) निवडणुकीत भाजप-शिंदे गटाने १८ पैकी ११ जागा जिंकत सत्ता राखली. पण आता सभापती निवडीवरून भाजपमध्ये जोरदार स्पर्धा सुरू झाल्यामुळे दगाफटका होतो की काय? अशी चिंता नेत्यांना सतावत आहे. सभापती कोणाला करायचे हे आमदार हरिभाऊ बागडे हे ठरवणार आहेत. २२ मे रोजी सभापती, उपसभापती पदाची निवड होणार आहे.
मात्र सभापती होण्यासाठी पक्षातील आणि ऐनवेळी सोबत आलेल्यापैकी अनेक इच्छूक असल्याने बागडेंची (Haribhau Bagde) डोकेदुखी वाढली आहे. यातूनच दगाफटका होण्याची शक्यता लक्षात घेवून भाजप-शिंदे गटाने सावधगिरीने पावले टाकायला सुरुवात केली आहे. तर युतीत राहून सभापतीपद मिळणार नसेल तर (Mahavikas Aghadi) महाविकास आघाडीशी हातमिळवणी करण्याची तयारी देखील काही संचालकांनी सुरू केल्याची चर्चा आहे.
संचालक मंडळाच्या निवडीनंतर आता सभापती निवडकीडे सर्वांचे लक्ष लागले आहे. अभिजित देशमुख यांच्या एन्ट्रीमुळे (Bjp) भाजपमधील इच्छुकांचे स्वप्न भंगण्याची शक्यता आहे. त्यामुळे आपल्याला सभापतीपद मिळाले नाही, तर बाहेरून आलेल्या देशमुखांचा खेळ बिघडवण्याचे प्रयत्न काहीजणांकडून केले जावू शकतात. भाजप-शिंदे युतीच्या विजयात किंगमेकर ठरलेले माजी सभापती राधाकिसन पठाडे पुन्हा सभापती होण्यास इच्छूक आहेत.
शिवाय ते बागडेंचे खंदे समर्थक असल्याने ते आशावादी देखील आहेत. पण त्यांना पक्षाचे तालुकाध्यक्ष श्रीराम शेळके आणि बाजार समितीचे माजी संचालक गणेश दहिहंडे यांची स्पर्धा आहे. या शिवाय अभिजित देशमुख यांचा मोठा अडसर असल्याने पठाडे काय भूमिका घेतात हे देखील पहावे लागणार आहे. च्याही सभापती पदासाठी हालाचाली सुरु झाल्या आहेत. यात शेळके, दहिहिंडे आणि अभिजित देशमुख यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला जात आहे.
मात्र कोणीही अद्याप नकार दिलेला नसल्यामुळे गुप्त पध्दतीने हालाचाली सुरु केल्याची कुजबुज सर्वत्र सुरु आहे. राधाकिसन पठाडे यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप झाल्यामुळे ते बॅकफूटवर आहेत. ही संधी साधत शेळके आणि दहिहंडे यांनी आपली दावेदारी लावून धरली आहे. परंतु पठाडे यांच्यावरील भ्रष्टाचार प्रकरणातच शेळके आणि दहिहंडे यांचीही नावे असल्यामुळे याचा थेट फायदा अभिजित देशमुख यांना होण्याची शक्यता आहे.
देशमुख हे राष्ट्रवादीतून केवळ संचालक होण्यासाठी युतीच्या पॅनलमध्ये सामील झाले होते. त्यामुळे बाहेरून आलेल्या व्यक्तीला थेट सभापती केले तर पक्षातील निष्ठावंत नाराज होतील याची चिंता बागडेंना सतावत आहे. त्यामुळे आता यातून मार्ग कसा काढायचा ? यावर मंथन सुरू आहे. तर दुसरीकडे या परिस्थीत आपले काही जमते का? यासाठी महाविकास आघाडी देखील युतीच्या संचालकांच्या संपर्कात असल्याची चर्चा आहे.
दरम्यान, सभापती पदासाठी इच्छुक असलेल्या व सर्वाधिक मताने विजयी झालेल्या अभिजित देशमुख यांना भाजपमध्ये प्रवेश करण्याची गळ घातली जात आहे. त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला तर मात्र सभापतीपदासाठी त्यांच्या नावावर शिक्कामोर्तब होवू शकते. तुर्तास तरी देशमुख यांनी भाजपमध्ये प्रवेश करण्यास नकार दिल्याचे सांगितले जाते.
काॅंग्रेस वचपा काढण्याच्या तयारीत..
काँग्रेसच्या ताब्यात असलेली बाजार समिती भाजपने संचालक फोडून आपल्या ताब्यात घेतली होती. अडिच वर्षे बाजार समितीचा कारभार भाजपने चालवला, त्यानंतर आता पुन्हा विजय मिळवला. मात्र निवडणूक होवून दोन आठवडे उलटले तरीही सभापतीपदाचा उमेदवार भाजपने घोषित केला नाही. पक्षातील या परिस्थितीचा फायदा उचलत अडीच वर्षापुर्वी भाजपने दिलेला दगा लक्षात ठेवत काॅंग्रेसकडून वचपा काढण्याची तयारी सुरू आहे.
भाजपने नाकारले तर अभिजित देशमुख यांच्या नावाला पंसती दर्शवत काँग्रेसचे चार व व्यापारी आणि हमाल-मापाडीचे तीन संचालक सोबत घेवून भाजपचा करेक्ट कार्यक्रम करण्याच्या तयारीत आहे. १८ पैकी ८ ते नऊ संचालक फुटण्याची शक्यताही वर्तवली जात असून असे झाले तर तो युतीला मोठा धक्का असेल.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.