Prakash Ambedkar Dharashiv Sabha : 'महाराष्ट्रातील सत्ता 159 कुटुंबात अडकली आहे. नात्यागोत्याच्या गोतावळ्यात अडकलेली ही सत्ता सर्वसामान्य माणसांच्या हाती द्या. त्यासाठी आरक्षणवादी राजकीय पक्षांना बळ द्यायला हवे.' असं विधान वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष अॅड. प्रकाश आंबेडकर म्हणाले आहेत.
तसेच, 'उद्याला आपली सत्ता नक्की येणार आहे. मात्र त्यावेळी जे ओबीसीबाह्य घटक आहेत. त्यांचे दुःखही आपण समजून घ्यायला हवे. जो सर्वाधिक ओबीसी उमेदवारांना संधी देईल, तोच आपला पक्ष. त्यामुळे सत्तेच्या राजकारणात आरक्षणवादी पक्षाला मतदान करा.' असे आवाहनही त्यांनी केले.
धाराशिव शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात बुधवारी रात्री ओबीसींच्या महाएल्गार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर माजी आमदार प्रकाश शेडगे, टी. पी.मुंडे यांच्या सह आदी मान्यवर उपस्थित होते.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
याप्रसंगी पुढे बोलताना प्रकाश आंबेडकर म्हणाले, 'मराठा आणि ओबीसी समाजात आरक्षणावरून भांडण जुंपलं आहे. आमचे ताट वेगळे, तुमचे ताट वेगळे हे राजकीय दृष्टिकोनातून मान्य झाले आहे. मान्य झालेले हे राजकारण टिकविण्याचे काम करावे लागेल. लोकसभा निवडणुकीत जो पक्ष सर्वाधिक ओबीसी उमेदवार देईल, तोच आपला. सभागृहात बारा ते पंधरा ओबीसी खासदार गेले नाही, तर आरक्षण टिकविणे कठीण होवून बसेल. मग भुजबळांसारखे(Chhagan Bhujbal) कितीही माणसे लढायला तयार झाली तरी ठेंगाच मिळेल.'
तसेच 'साधारणपणे 1990 पासून आपण सतत बोलत आहोत. भाजप, राष्ट्रवादी, शिवसेना, काँग्रेस या पक्षांना आजवर ते समजून घेता आले नाही. धनगर, माळी, अलुतेदार बलुतेदार समूहातून खासदार पुढे येत नसतील तर आरक्षण कसे वाचेल?' असा सवालही आंबेडकर यांनी यावेळी उपस्थित केला.
'सभागृहात निवडून गेलेला प्रतिनिधी आरक्षणवादी नसेल तर आरक्षण टिकणार नाही. आंधळेपणाने कोणावरही विश्वास ठेवू नका. नाटकी व्यक्ती आणि संघटनांपासून सावध रहा. 48 लोकसभा जागांपैकी तीन आदिवासींसाठी राखीव आहेत. चार अनुसूचित जातीसाठी राखीव आहेत. उर्वरित 41 पैकी 12 ते 15 उमेदवार ओबीसी प्रवर्गातून जो पक्ष देईल, त्यालाच आपला पक्ष समजा.'
'जो आरक्षणवादी तोच आपला उमेदवार. आरक्षण वाचविण्यासाठी आपण रस्त्यावर येवून बसलो आहोत. उद्या निवडणूक काळात अनेक प्रलोभने दिली जातील. त्याला बळी पडला तर आरक्षण सोडा. संविधानही शिल्लक राहणार नाही.', अशा शब्दात प्रकाश आंबेडकर(Prakash Ambedkar) यांनी उपस्थित नागरिकांना आवाहन केले.
'जातीप्रथा उलथवून टाकण्याची सुरुवात फुले दाम्पत्याने केली. फुलेंना जावून आज इतकी वर्षे झाली. तरीही त्यांची हेटाळणी केली जाते. गुलामी गाढून टाकण्याचे काम फुलेंनी केले आणि त्यावर संविधानाच्या माध्यमातून बाबासाहेबांनी स्टॅम्प मारला. त्यामुळेच इथली छुपी व्यवस्था शाहू-फुले-आंबेडकरांचे सतत विडंबन करीत आहेत. हे ध्यानात घ्या आणि 18 अलुतेदार आणि बारा बलुतेदारांना जो पक्ष उमेदवारी देईल, त्या आरक्षणवादी पक्षालाच मतदान करा.', अशा शब्दांत त्यांनी उपस्थितांना आवाहन केले.
(Edited by - Mayur Ratnaparkhe)
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.