Prasad Lad Meet Manoj Jarange Sarkarnama
मराठवाडा

Prasad Lad Meet Manoj Jarange: प्रसाद लाड यांच्या तोंडावरच मनोज जरांगेंकडून शिवसेना अन् राष्ट्रवादीच्या मंत्र्यांचे कौतुक!

Manoj Jarange Patil News: मनोज जरांगे यांनी प्रसाद लाड यांच्या उपस्थितीत शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या मंत्र्यांचे कौतुक केल्याने राज्याच्या राजकारणात नव्या चर्चांना उधाण आले आहे.

Jagdish Pansare

Maratha Reservation News : "तुमचे मंत्री फुगीर आहेत, त्यांचे पीएच फोन घेतात आणि आम्हाला काय काम आहे, ते सांगा म्हणतात. या उलट एकनाथ शिंदे प्रोटोकॉल बाजूला ठेवून काम करतात, त्यांचे मंत्री संजय शिरसाट, उदय सामंत, शंभूराज देसाई हे एखादे समाजाच्या पोराचे काम सांगीतले की त्याचा तुकडाच पाडतात. राष्ट्रवादीचे मंत्रीही आमची कामे करतात, असे थेट भाजपाचे आमदार प्रसाद लाड यांच्या तोंडावरच मनोज जरांगे पाटील यांनी सांगीतले.

जे मंत्री काम करतात त्यांचे गुणगाण आम्ही गायचे नाहीत का? या उलट तुमचे मंत्री तोऱ्यात वावरतात. काही मंत्री आहेत जे काम करतात त्यात चंद्रशेखर बावनकुळे, आता आता चंद्रकांत पाटील आणि काही कामे राधाकृष्ण विखे पाटील यांनीही केली. पण बहुतांश तुमचे मंत्री हे मराठा समाजाचे कामच तरत नाहीत, असा जाहीर आरोपच मनोज जरांगे पाटील यांनी केला.

मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी प्रलंबित मागण्यांसाठी 30 मे पासून अंतरवालीत पुन्हा उपोषण करणार असल्याची घोषणा नुकतीच केली. त्यानंतर भाजपाकडून आमदार प्रसाद लाड यांनी त्यांना चर्चेचे आवाहन केले. मी मराठा समाजाचाच आहे, तुमच्याशी चर्चा करायला येतो, आपण तुमचे सगळे प्रश्न मार्गी लावू असे सांगत भेटीची वेळ मागीतली होती.

सरकारकडून टाळाटाळ

आज अंतरवाली सराटीमध्ये मनोज जरांगे पाटील व आमदार प्रसाद लाड यांच्यात प्रदीर्घ चर्चा झाली. सुमारे दीड तास मनोज जरांगे पाटील यांनी मराठा समाजाच्या मागण्या, सरकारकडून केली जाणारी चालढकल, मराठा आंदोलकांवरील कायम असलेले गुन्हे, समाजासाठी बलिदान देणाऱ्या कुटुंबियांना ना निधी ना नोकरी, हैदराबाद गॅझेटनूसार नोंदी तरी कुणबी प्रमाण पत्रांचे वाटप नाही, सातारा, औंध, मुंबई गॅझेट स्वीकारण्यास सरकारकडून टाळाटाळ, नोंदी सापडलेल्यांना दिलेल्या प्रमाण पत्रांना व्हिलिडीटी न देणे आदी विषयांवर लाड यांना जाब विचारला.

त्यांना आमचा समाज डोक्यावर घेणार नाही का?

हा जाब विचारत असतानाच मनोज जरांगे पाटील यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, त्यांच्या शिवसेनेचे मंत्री, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या मंत्र्‍यांचे तोंडभरून कौतुकही केले. स्वतः उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे प्रोटोकॉल बाजूला ठेवून मराठा समाजाच्या पोरांची कामं करतात. करू, पाहू, बोलतो हे शब्दच त्यांच्याकडे नाहीत. काम सांगीतले की फोन लावून ते काम फत्ते करतात. त्यांनीच समाजाच्या 58 लाख नोंदी शोधल्या, मग त्यांना श्रेय द्यायचे नाही का? त्यांच्या पक्षाचे मंत्री उदय सामंत, संजय शिरसाट, शंभूराज देसाई यांनीही सांगीतल्या बरोबर समाजाची कामे केलीत. मग त्यांना आमचा समाज डोक्यावर घेणार नाही का?

सत्तेचा एवढा माज चांगला नाही...

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे काही मंत्री देखील समाजाच्या कामासाठी लगेच धावून येतात. तुमचेही सगळेच वाईट आहेत, असे आम्ही म्हणत नाहीत. पण तुमचे काही मंत्री मुजोर आहेत, फोनच घेत नाही, त्यांचे पीएच फोन घेतात आणि काय काम आहे ते आम्हाला सांगा म्हणतात. सत्तेचा एवढा माज चांगला नाही. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हैदराबाद गॅझेट लागू केले, आम्ही त्याबद्दल त्यांच अजूनही नाव घेतो. पण मग 58 लाख नोंदी सापडलेल्यांना प्रमाणपत्र का देत नाहीत? हा आमचा सवाल असल्याचे जरांगे म्हणाले.

अनेकांच्या भुवया उंचावल्या

काही दिवसांपूर्वी उद्योग मंत्री उदय सामंत यांनी अंतरवाली सराटीत जाऊन मनोज जरांगे यांची भेट घेतली होती. त्यानंतर दोन आठवड्यातच मनोज जरांगे पाटील यांनी 30 मे पासून पुन्हा उपोषणाची घोषणा केली. याचा थेट संबंध शिवसेनेशी जोडला गेला होता. आमदार प्रसाद लाड यांनीच या संदर्भात प्रश्न उपस्थितीत केले होते. तेच प्रसाद लाड आज अंतरवालीत जरांगे पाटील यांच्या भेटीला गेले होते. मनोज जरांगे पाटील यांनी त्यांच्यासमोर भाजपाचे मुख्यमंत्री आणि तुमचे सरकार कसे मराठा समाजाच्या विरोधात वागत आहेत, याचा पाढाच वाचला. लाड यांच्यासमोरच जरांगे पाटील यांनी शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या मंत्र्यांचे कौतुक केल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT