

अंगणवाडी सेविकांसाठीची ४५ वर्षांची पदोन्नती अट रद्द.
Bombay High Court चा महत्त्वाचा निर्णय.
हजारो सेविकांना पदोन्नतीचा मार्ग मोकळा.
वयावरून पात्रता ठरवू शकत नाही, न्यायालयाचे निरीक्षण.
लवकर पदोन्नती प्रक्रिया सुरू करण्याची मागणी.
Anganwadi Worker Promotion: राज्यातील अंगणवाडी सेविकांसाठी दिलासादायक निर्णय देताना मुंबई उच्च न्यायालयाच्या (Bombay High Court) नागपूर खंडपीठाने पर्यवेक्षिका पदासाठी असलेली ४५ वर्षांची कमाल वयोमर्यादा रद्द केली आहे. या निर्णयामुळे अनेक वर्षे काम करूनही केवळ वयामुळे पदोन्नतीपासून दूर राहिलेल्या हजारो सेविकांना आता संधी मिळणार आहे.
महिला व बालविकास विभागाने २०२१ मध्ये काढलेल्या नियमांनुसार, ४५ वर्षांपेक्षा जास्त वयाच्या अंगणवाडी सेविकांना पर्यवेक्षिका पदासाठी पात्र मानले जात नव्हते. या नियमामुळे अनेक अनुभवी सेविकांमध्ये नाराजी होती. याबाबत काही सेविकांनी न्यायालयात धाव घेतली होती.
अंगणवाडी सेविका ६५ वर्षांपर्यंत काम करू शकतात, मग ४५ वर्षांनंतर त्यांना पदोन्नतीपासून वंचित ठेवणे योग्य नाही. केवळ वयाच्या आधारावर एखाद्याची क्षमता ठरवता येत नाही, असेही न्यायालयाने म्हटले आहे.
यापूर्वीच्या नियमांनुसार १० वर्षांची सेवा पूर्ण केलेल्या सेविकांना पर्यवेक्षिका पदावर जाण्याची संधी होती आणि त्यासाठी वयोमर्यादा ५५ वर्षे होती. मात्र, नंतर ती कमी करून ४५ वर्षे करण्यात आली होती. त्यामुळे अनेक सेविका पदोन्नतीपासून वंचित राहिल्या.
सरकारने न्यायालयात असा दावा केला की, जास्त वयात पदोन्नती मिळाल्यास सेवाकाल कमी उरतो. मात्र, न्यायालयाने हा मुद्दा मान्य केला नाही. हा नियम समानतेच्या अधिकाराविरोधात असल्याचे न्यायालयाने नमूद केले. या निर्णयानंतर अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या संघटनांनी आनंद व्यक्त केला असून, सरकारने लवकरात लवकर पदोन्नती प्रक्रिया सुरू करावी, अशी मागणी केली आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.