Mla Prashant Bamb News, Aurangabad
Mla Prashant Bamb News, Aurangabad Sarkarnama
मराठवाडा

Prashant Bamb News : गंगापूर कारखाना गेला, आता विधानसभेला करेक्ट कार्यक्रम ?

सरकारनामा ब्युरो

Marathwada Politics : भाजपचे आमदार प्रशांत बंब यांनी गंगापूर सहकारी साखर कारखान्याच्या (Sugar Factory) निवडणुकीत पॅनलचा दारूण पराभव झाल्यानंतर उद्विग्न प्रतिक्रिया दिली. त्यांची देहबोली आणि भाषा यावरून हा पराभव त्यांच्या जिव्हारी लागल्याचे स्पष्ट दिसत होते. कारखान्याच्या निवडणुकीत ठाकरे गटाच्या शिवशाही पॅनल विरुद्ध बंब यांच्या पॅनलची थेट लढत झाली असली तरी महाविकास आघाडीच्या एकत्रित प्रयत्नामुळेच बंब यांच्या ताब्यातून हा कारखाना हिसकावता आला हे आता स्पष्ट झाले आहे.

भाजपचे आमदार प्रशांत बंब (Prashant Bamb) हे आक्रमक लोकप्रतिनिधी म्हणून ओळखले जातात. विधानसभेत त्यांनी विविध विषय घेवून त्यांची केलेली अभ्यासपुर्ण मांडणी, आरोप, पुरावे यामुळे कधीकधी त्यांनी स्वपक्षाच्या आमदारांची देखील गोची केल्याचे समोर आले होते. (Mahavikas Aghadi) अगदी राज्यात देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली भाजपची सत्ता असतांना त्याच मंत्रीमंडळातील सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील यांच्याच विभागावर बंब यांनी भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप करत खळबळ उडवून दिली होती.

एवढेच नाही, तर मतदारसंघाबाहेर इतर पक्षाच्या आमदारांच्या मतदारसंघातील रस्त्याच्या कामातील गैरव्यवहार चव्हाट्यावर आणत त्यांनी अनेकांना अंगावर घेतले होते. भाजपचे खासदार प्रताप पाटील चिखलीकर आणि त्यांच्यातील वाद देखील याच रस्ते कामाच्या गैरप्रकारातून उद्भवला होता. राज्यातील सत्तांतरानंतर झालेल्या पहिल्यात पावसाळी अधिवेशनात बंब यांनी शिक्षकांच्या मुख्यालयी न राहण्याचा मुद्दा उपस्थितीत करत दणका दिला होता.

शिक्षकांच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह निर्माण करत शिक्षक आणि पदवीधर हे मतदारसंघच रद्द करा, अशी मागणी देखील बंब यांनी केली होती. एकंदरित बंब यांनी एखादा मुद्दा हाती घेतला की त्याचा पिच्छा ते सोडत नाहीत अशी त्यांची कार्यपद्धती. गंगापूर कारखान्याच्या विषयात देखील त्यांनी पश्चिम महाराष्ट्रातील विशेषतः राष्ट्रवादीच्या नेत्यांशी पंगा घेतला. बंद असलेला कारखाना जेव्हा राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जंयत पाटील यांच्या राजाराम फुड्स प्रा.लि.ला देण्याचा निर्णय झाला, तेव्हा तो हाणून पाडण्याचे प्रयत्न बंब यांनी केले होते.

कोट्यावधींचा कारखाना कवडीमोल भावात घशात घालण्याचा हा प्रयत्न असल्याचे सांगत बंब यांनी विधानसभेत देखील या विरोधात आवाज उठवला होता. त्यामुळे जिल्ह्यात व गंगापूर-खुल्ताबा या मतदारसंघात बंब यांना घेरण्याची तयारी राष्ट्रवादीने सुरू केली होती. राज्यातील सत्तातंरानंतर या मोहिमेला महाविकास आघाडी म्हणून वेग आला. गंगापूर सहकारी साखर कारखान्यात शिवसेनेचे शिवशाही पॅनल दिसत असले तरी त्यामागे ताकद ही महाविकास आघाडीची होती, त्यामुळेच बंब यांच्या पॅनलचा पराभव करणे शक्य झाले, अशी चर्चा आहे.

आपल्या पराभवात शिवसेनेपेक्षा राष्ट्रवादीच्या स्थानिक नेत्यांचाच अधिक हात होता, हे लक्षात आल्यानंतर बंब यांनी पराभवावर प्रतिक्रिया देतांना थेट राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचे नाव घेवूनच टीका केली. बारामतीचे काका आणि त्यांच्या अनुयायांनी दिलेल्या भूलथापा आणि अमिषाला शेतकरी सभासद बळी पडले असा, आरोप बंब यांनी केला.

मराठवाडा पदवीधरचे आमदार सतीश चव्हाण यांना गंगापूर-खुल्ताबाद मतदारसंघातून निवडणूक लढवायची आहे. यासाठी चव्हाण यांनी या मतदारसंघात दौरे आणि हस्तक्षेप वाढवला आहे. त्यामुळे बंब यांचे बलस्थान असलेला कारखाना आधी महाविकास आघाडीने एकत्रित प्रयत्न करून हिसकावून घेतला. आता २०२४ च्या विधानसभेत बंब यांचा करेक्ट कार्यक्रम करण्याचे राष्ट्रवादीचे लक्ष्य असणार आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT