Pratap Patil Chikhalikar, Ashok Chavan Sarkarnama
मराठवाडा

Pratap Patil Chikhalikar : प्रताप पाटील चिखलीकर 25 वर्षांनी अशोक चव्हाणांच्या घरी

Nanded BJP News : चिखलीकर व अशोक चव्हाण हे नांदेडमध्ये एकमेकांविरोधात लढले, पण चव्हाण यांच्या भाजप प्रवेशानंतर आता या दोघांमध्ये दिलजमाई झाली आहे.

Laxmikant Mule

Nanded Political News : होळी हा सण एकमेकांमधील वैर विसरून मित्रत्वाचा हात पुढे करण्यासाठीचा उत्सव म्हणून ओळखला जातो. विशेषत: राजकारणात होळीचे महत्त्व अधिकच असते. अनेक वर्षे एकाच पक्षात काम करणारे नेते जेव्हा विरोधात उभे ठाकतात तेव्हा मात्र त्यांच्यातील कटुता कमालीची वाढलेली असते. त्याचबरोबर राजकारणामध्ये कोणी कोणाचा कायम शत्रू किंवा मित्र नसतो असेही म्हटलं जातं. नांदेड जिल्ह्याच्या राजकारणाने हा अनुभव नुकताच घेतला.

प्रताप पाटील चिखलीकर व अशोक चव्हाण हे गेल्या अनेक वर्षांपासून विरोधात लढले, पण चव्हाण यांच्या भाजप प्रवेशानंतर आता या दोघांमध्ये दिलजमाई झाली आहे. त्यामुळे होळीचे औचित्य साधून चिखलीकर तब्बल 25 वर्षांनंतर अशोक चव्हाण यांच्या घराची पायरी चढल्याचे दिसून आले.

राज्याचे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण (Ashok Chavan) यांनी 40 वर्षांहून अधिक काळ काँग्रेसमध्ये घालवल्यानंतर दीड महिन्यापूर्वी भारतीय जनता पक्षात प्रवेश केला. परिणामी प्रताप पाटील चिखलीकर यांच्या विरोधात ते जिल्ह्यात राजकारण करत होते, त्यांच्याच मांडीला मांडी लावून बसण्याची वेळ चव्हाणांवर आली. भाजप प्रवेशानंतर अशोक चव्हाण यांनी आता मागे काय झाले ते विसरून एकत्र येण्याचे आवाहन पदाधिकारी, कार्यकर्त्यांना केले.

याची सुरुवात त्यांनी स्वतःपासून केली. होळी आणि धूलिवंदनाच्या निमित्ताने तब्बल 25 वर्षांनंतर अशोक चव्हाण आणि प्रताप पाटील चिखलीकर यांनी एकमेकांना रंग लावला. आता या दोघांची ही मैत्री येणाऱ्या लोकसभा निवडणुकीत विजयाचा रंग उधळणार का? याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष असणार आहे.

नांदेड जिल्ह्याच्या राजकारणात गेली 25 वर्षे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण व खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर (Pratap Patil Chikhalikar) यांचे वैर होते, पण सध्या हे दोन्ही नेते एकाच पक्षात असल्याने झालं गेलं गंगेला मिळालं म्हणत पक्षाच्या कामाला लागले आहेत. हे दोन्ही नेते आमच्यातील कटुता संपली आहे, असे सांगत एकत्र फिरताना दिसत आहेत. धूलिवंदनाच्या दिवशी चिखलीकरांनी चव्हाणांच्या नांदेड शहरातील निवासस्थानी भेट देऊन धूलिवंदनाच्या शुभेच्छा दिल्या.

या वेळी माजी आमदार अमरनाथ राजूरकर यांनी चिखलीकरांच्या अंगावर गुलाल टाकून त्यांचे स्वागत करत शुभेच्छा दिल्या. राज्यात लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अनेक नाट्यमय राजकीय घडामोडी घडत आहेत. गेल्या महिन्यात अशोक चव्हाणांनी भाजपत प्रवेश केला. या प्रवेशाचे स्वागत चिखलीकरांनी केले. त्यानंतर हे दोघे अनेक ठिकाणी व्यासपीठावर एकत्र दिसत आहेत.

गेल्या निवडणुकीत हे दोन्ही नेते एकमेकांना पाडण्यासाठी डावपेच आखत होते, तर या निवडणुकीत अशोक चव्हाण हे चिखलीकरांच्या विजयासाठी प्रयत्न करीत आहेत. नांदेड (Nanded) शहरातील शिवाजीनगर भागात अशोक चव्हाण यांचे निवासस्थान आहे. या निवासस्थानी जाऊन चिखलीकर, माजी आमदार अमरनाथ राजूरकर यांनी अशोक चव्हाण यांची भेट घेऊन एकमेकांना गुलाल, रंग लावला.

नांदेड जिल्ह्यात या दोन्ही नेत्यांचे समर्थक मोठ्या संख्येने आहेत. या दोन्ही नेत्यांच्या समर्थकांनी एकत्र रंगपंचमी साजरी करण्याचा योग तब्बल २५ वर्षांनी आला. त्यामुळे एक वेगळा उत्साह पाहायला मिळाला. नांदेडच्या जागेवर विजयाची पुनरावृत्ती करण्यासाठी भारतीय जनता पक्षाने गेल्या काही महिन्यांपासून निवडणुकीची तयारी केली आहे. या तयारीला आता अशोक चव्हाणांची साथ मिळणार आहे.

या मतदारसंघात चार वेळा काँग्रेस वगळता इतर पक्षांतील उमेदवार निवडून आले आहेत. यंदाच्या निवडणुकीत भाजपने चिखलीकरांना दुसऱ्यांदा उमेदवारी दिली आहे. त्यांना दुसऱ्यांदा विजय मिळविण्यासाठी चव्हाणांची साथ हवी आहे. त्यामुळे त्यांनी रंगपंचमीचे औचित्य साधून चव्हाणांना शुभेच्छा देत आता जुनं सगळं विसरा या चव्हाण यांच्या हाकेला ओ दिली आहे.

(Edited by Sunil Dhumal)

R

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT