Gadchroli Lok Sabha Election : लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली आहे. उमेदवारी न मिळाल्याने नाराज झालेले अनेक नेते आता वेगळी भूमिका घेऊ लागले आहेत. गडचिरोली लोकसभा मतदारसंघातील काँग्रेसची उमेदवारी डॉ. नामदेव किरसान यांना जाहीर झाली. त्यांच्या उमेदवारीने काँग्रेस कार्यकर्त्यांत उत्साहाचे वातावरण आहे, पण लोकसभेची उमेदवारी न मिळाल्याने काँग्रेसचे आदिवासी सेलचे प्रदेशाध्यक्ष डॉ. नामदेव उसेंडी यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे.
गडचिरोलीत आज (ता. 26) सकाळी राजीनाम्याची घोषणा केल्यानंतर सायंकाळी उसेंडी नागपुरात भाजपचा शेला बांधणार असल्याची माहिती आहे आणि तशी चर्चा राजकीय वर्तुळात जोरात सुरू आहे. दोन दिवसांपूर्वी गडचिरोली काँग्रेसचे नेते डॉ. नितीन कोडवते व त्यांच्या पत्नी चंदा कोडवते यांनी काँग्रेसला राम राम ठोकत मुंबईत भाजपमध्ये प्रवेश घेतला होता. कोडवतेंनंतर उसेंडींनी वेगळी भूमिका घेतल्याने काँग्रेसला हा मोठा धक्का मानला जात आहे.
लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात पूर्व विदर्भातील पाच मतदारसंघांच्या निवडणुका होणार आहेत. या वेळी विदर्भात काँग्रेस कमबॅक करेल, असा आशावाद विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी नागपुरात माध्यमांशी बोलताना व्यक्त केला होता. पण त्यांचे होम ग्राउंड असलेल्या गडचिरोलीत त्यांना दोन दिवसांत दोन ज्येष्ठ नेत्यांनी जोरदार धक्के दिले आहेत. नामदेव उसेंडी हे 2009 मध्ये काँग्रेसचे आमदार झाले होते. काँग्रेसने 2014 व 2019 या दोन लोकसभा निवडणुकीत त्यांना उमेदवारी दिली होती. मात्र, ते दोन्ही निवडणुकीत ते पराभूत झाले. भाजपचे अशोक नेते यांनी सलग दोनदा त्यांचा पराभव केला.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
आता तिसऱ्यांदा गडचिरोली-चिमूर लोकसभा मतदारसंघातून काँग्रेसकडून निवडणूक लढविण्याची त्यांची इच्छा होती, पण डॉ. नामदेव किरसान यांनी तिकीट मिळवण्यात बाजी मारली. गेली पंधरा वर्ष पेक्षाचे काम करूनही दोन्ही वेळा त्यांना उमेदवारी देण्यात आली नव्हती. पण त्यांनी अतिशय संयमाने पक्षाचे काम सुरू ठेवले. त्यांच्या कामाची दखल घेत काँग्रेसने त्यांच्यावर विश्वास दाखविला. किरसान यांना उमेदवारी मिळाल्यानंतर उसेंडी कमालीचे नाराज झाले होते.
नाराजीतून उसेंडी यांनी आज आपल्या पदाचा राजीनामा दिला. आज सायंकाळी ते नागपुरात भाजपमध्ये प्रवेश घेणार असल्याची माहिती राजकीय वर्तुळातून समोर येत आहे. भाजपने गडचिरोली लोकसभा मतदारसंघातून अशोक नेते यांना तिसऱ्यांदा संधी दिली आहे. आज त्यांनी नामांकन अर्ज दाखल केला. या वेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांची उपस्थिती होती.
Edited By : Atul Mehere
R
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.