Nanded News : लोकसभा निवडणुकीनंतर नांदेड जिल्ह्यातील समीकरणे पूर्णपणे बदलली आहेत. मराठवाड्यात भाजपला मोठा पराभव स्वीकारावा लागला तर दुसरीकडे काँग्रेसने तीन जागा जिंकत पुन्हा एकदा वर्चस्व निर्माण केले आहे. त्यामुळे आता चित्र बदलेले असून भाजपऐवजी काँग्रेसकडे प्रवेश करणाऱ्यांची मोठी रांग लागली आहे. अनेक महायुतीमधील नेते प्रवेश करण्यासाठी वेटींगवर असल्याचे समजते.
लोकसभा निवडणुकीत नांदेड मतदारसंघातून पराभव झाल्यानंतर राजकीय पुनर्वसन होण्याच्या प्रयत्नात असलेले माजी खासदार प्रताप पाटील चिखलीकर (Pratap Patil) सध्या त्यांच्या काँग्रेस प्रवेशाच्या चर्चेने वैतागले आहेत. लोहा- कंधार विधानसभा मतदारसंघातून पुन्हा मैदानात उतरण्याच्या तयारीत असलेल्या चिखलीकर यांचा काँग्रेसच्या (Congress) नेत्यांशी संपर्क वाढण्याची चर्चा गेल्या काही दिवसांपासून जिल्ह्याच्या राजकीय वर्तुळात सुरू आहे.
लोकसभा निवडणुकीतील पराभवानंतर चिखलीकर यांनी स्वतंत्रपणे लोहा कंधार विधानसभा मतदारसंघातून तयारी सुरू केली आहे. पक्षाकडून अद्याप उमेदवारी संदर्भात कुठलाही दुजोरा किंवा हिरवा कंदील मिळालेला नसला तरी चिखलीकरांची तयारी मात्र जोरात सुरू आहे. यावरून उलटसुलट चर्चा सुरू होत्या. यात प्रामुख्याने चिखलीकर काँग्रेस नेत्यांच्या संपर्कात असून विधानसभा निवडणुकीपूर्वी ते भाजपला रामराम करत काँग्रेसमध्ये प्रवेश करतील, असे बोलले जात होते.
या चर्चांमुळे प्रताप पाटील चिखलीकर यांची डोकेदुखी वाढली आहे. भाजपने जर लोहा-कंधारमधून उमेदवारी देण्याचा विचार केला असेल तर काँग्रेस प्रवेशाच्या चर्चेने त्यावर पाणी फिरेल, अशी भीती प्रताप चिखलीकर यांना सतावत आहे. यातूनच त्यांनी नुकतीच पत्रकार परिषद घेत आपण काँग्रेस पक्षात प्रवेश करणार नाही. आपल्याबद्दल सुरू असलेल्या चर्चा या निव्वळ अफवा असून विरोधकांकडून दिशाभूल करण्यासाठी पसरवल्या जात असल्याचे स्पष्टीकरण दिले.
मी भाजपमध्येच आहे पक्ष बदलण्याचा प्रश्नच उद्भवत नाही, असे सांगत चिखलीकर यांनी आपल्या काँग्रेस प्रवेशाच्या चर्चांना पूर्णविराम दिला. मात्र, प्रताप पाटील चिखलीकर यांचा आतापर्यंतचा राजकीय प्रवास आणि इतिहास बघितला तर त्यांच्याबद्दल सुरू असलेल्या चर्चा या निव्वळ अफवाच आहेत, असे कोणी म्हणायला तयार नाही.
त्यामुळे येत्या महिन्या दोन महिन्यात जिल्ह्यात काय राजकीय घडामोडी घडतात? चिखलीकरांना पक्षाकडून विधानसभेची उमेदवारी मिळते का? यावर चिखलीकर यांचा पुढचा निर्णय अवलंबून असणार आहे.
राज्याचे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्या जेव्हा भाजप प्रवेशाच्या चर्चा सुरू होत्या आणि तसा दावा तेव्हाचे विद्यमान खासदार प्रताप पाटील चिखलीकर स्वतः करत होते. तेव्हा काँग्रेस त्यांच्यावर त्यांनी आतापर्यंत बदललेल्या पक्षांची यादी वाचून दाखवत त्यांच्या दाव्यांवर प्रश्नचिन्ह निर्माण करायचे.
आता त्याच चिखलीकरांवर ते काँग्रेसमध्ये प्रवेश करणार नाही, याचे स्पष्टीकरण करण्याची वेळ आली आहे. लोहा कंधार विधानसभा मतदारसंघात सख्खी बहिण आशा शिंदे व भाऊजी आमदार श्यामसुंदर शिंदे यांचे तगडे आव्हान असताना आणि अजून भाजपकडून उमेदवारीचा कुठलाही शब्द मिळालेला नसताना काँग्रेस प्रवेशाच्या चर्चेने प्रताप पाटील चिखलीकर यांच्या अडचणीत वाढ होताना दिसत आहे. आता त्यांनी दिलेल्या स्पष्टीकरणानंतर पक्षाची भूमिका काय राहील हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.