Prataprao Patil Chikhlikar
Prataprao Patil Chikhlikar Sarkarnama
मराठवाडा

Prataprao Patil Chikhlikar : प्रताप पाटील चिखलीकरांचा जनता दरबार सुरू; आता 'मिशन विधानसभा'!

Jagdish Pansare

Nanded BJP Politics News : लोकसभा निवडणुकीत झालेल्या पराभवावरून आरोप-प्रत्यारोप, दावे-प्रतिदावे झाल्यावर आता माजी खासदार प्रताप पाटील चिखलीकरांनी विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीने तयारीला लागल्याचे दिसत आहे.

लोकसभा निवडणूक प्रचारामुळे खंड पडलेला जनता दरबार पराभवानंतर चिखलीकर यांनी पुन्हा सुरू केला आहे. तर लोकसभेच्या नांदेड मतदारसंघातून पराभव झाल्यानंतर पुढे काय? असा प्रश्न चिखलीकर समर्थकांपुढे आहे.

लोकसभा निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर चिखलीकरांनी जिल्ह्यात दौरा करून भाजप(BJP) पदाधिकारी, कार्यकर्त्यांच्या भेटीगाठी घेतल्या. महायुतीच्या पराभवावर यातून चिंतन-आत्मपरिक्षण आणि आरोप-प्रत्यारोप, विरोधात काम करणाऱ्यांना सोडणार नाही, असे इशारे देऊनही झाले.

चिखलीकर यांचे होमपिच असलेल्या लोहा-कंधार मतदारसंघात भाजप कार्यकर्त्यांचा संवाद मेळावा झाला आणि त्यात लोकसभेला पराभूत झालेल्या चिखलीकरांनी आता विधानसभा लढवावी, असा सूर निघाला.

मग चिखलीकरांनीही(Prataprao Patil Chikhlikar) पक्षाने मला संधी दिली तर मी विधानसभा लढवायला तयार असल्याचे सांगत पुन्हा दंड थोपटले. मन्याडचा वाघ पुन्हा विधानसभेत दिसला पाहिजे, अशी आग्रही मागणी यावेळी करण्यात आली होती. चिखलीकरांनी तातडीने विधानसभा लढवण्याची तयारी दाखवल्याने स्वतःचे पुनर्वसन करण्याची त्यांना जास्तच घाई झाल्याची चर्चाही जिल्ह्यात सुरू झाली आहे.

चिखलीकर यांनी विधानसभा लढवण्याची इच्छा व्यक्त केली असली, तरी भाजपचे वरिष्ठ नेते काय निर्णय घेतात? लोकसभेला पराभूत झालेल्यांनाच पुन्हा विधानसभेला संधी देतात की मग नवे चेहरे मैदानात उतरवतात? यावर चिखलीकरांचे पुनर्वसन अवलंबून असणार आहे.

पण लोकसभा निवडणुकीतील पराभवानंतर प्रताप पाटील चिखलीकर यांनी पुन्हा एकदा आपल्या नांदेडच्या वंसतनगर येथील "साई सुभाष " जनसंपर्क कार्यालयात जनता दरबार सुरु केला.

लोकांच्या भेटीगाठी घेऊन समस्या आणि अडचणी जाणून घेतल्या. त्यानुसार संबंधित अधिकाऱ्यांशी संपर्क साधून नागरिकांचे प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न केला. माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण(Ashok Chavan) यांनी भाजपमध्ये प्रेवश केल्यानंतर चिखलीकर यांचा लोकसभा निवडणुकीतील विजय निश्चित समजला जात होता. चव्हाण यांनीही प्रचार सभांमधून तशी गॅरंटी दिली होती.

पण मतदारांनी यावेळी केवळ नांदेडच नाही तर मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर वगळता सातही लोकसभा मतदारसंघात महायुतीला पराभवाची धूळ चारली. चिखलीकरांच्या पराभवाला सुरुवातीला अशोक चव्हाण यांना जबाबदार धरले जात होते, पण मराठवाडा आणि राज्यातील एकूणच कल समोर आल्यानंतर चव्हाण यांना टार्गेट करणे बंद झाले होते. स्वतः चिखलीकर यांनीही अशोक चव्हाण यांच्यामुळे आपला पराभव झाला नसल्याचे सांगितले होते.

(Edited by - Mayur Ratnaparkhe)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT