Raosaheb Danve News : लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात भाजप महायुतीने सपाटून मार खाल्ला. मिशन 45 घेऊन मैदानात उतरलेल्या महायुतीची गाडी राज्यात 18 जागांवरच अडकली. तर महाविकास आघाडीने 30 जागा जिंकत जोरदार मुसंडी मारली. लोकसभेत झालेल्या दारूण पराभवानंतर त्याची अनेक कारणे पुढे येत आहेत. यापैकी एका कारणाची राजकीय वर्तुळात चर्चा सुरू आहे ती म्हणजे अजित पवारांना सोबत घेतल्याचा फटका भाजपला बसला.
पुण्यातील एका बैठकीत अजित पवारांना महायुतीतून बाहेर काढा, अशी मागणी एका भाजप कार्यकर्त्याने केल्याचा व्हिडिओ समाज माध्यमावर व्हायरल झाल्याने तर यावर अधिक चर्चा होऊ लागली. परंतु अजित पवारांना सोबत घेतल्याचा आम्हाला फायदाच झाला, असा दावा करत माजी केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी त्यांची पाठराखण केली आहे.
लोकसभा निवडणुकीत स्वतःच्या आणि महायुतीच्या राज्यातील पराभवाचे विश्लेषण करतांना एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत दानवे यांनी अजित पवारांना Ajit Pawar सोबत घेतल्यामुळे भाजपचे नुकसान झाले हा आरोप खोडून काढला. कुठल्याही आघाडी किंवा युतीमध्ये सोबत आलेल्या पक्षाची सगळीच्या सगळी मते प्रमुख पक्षाकडे वळत नसतात. त्याप्रमाणे अजित पवारांना सोबत घेतल्यानंतर आम्हाला अपेक्षित मते मिळाली नसतील पण म्हणून त्यांचा आम्हाला फायदाच झाला नाही, असे म्हणता येणार नाही आणि आम्ही तसे मानत नाही, असे दानवे म्हणाले.
लोकसभा निवडणुकीनंतर आम्ही जो काही अभ्यास केला. मतदानाची आकडेवारी समोर आली त्यातून अजित पवारांची राष्ट्रवादी असो की एकनाथ शिंदे यांची शिवसेना या पक्षांमुळे महायुतीला मिळालेल्या मतांचा टक्का निश्चितच वाढला आहे, असा दावा रावसाहेब दानवे यांनी केला. निवडणुकीत आम्हाला आलेले अपयश हे विरोधकांनी केलेल्या खोट्या प्रचाराचे यश आहे, असे देखील दानवे Raosaheb Danve म्हणाले.
भाजपचे 400 खासदार निवडून आले तर ते देशाचे संविधान बदलतील असा खोटा प्रचार करत महाविकास आघाडीने मतदारांना कन्फ्यूज केले. विशेषत: दलित-मुस्लिम, आदिवासी मतदारांमध्ये यामुळे भिती निर्माण झाली. आम्ही आमच्या परीने त्यांना कनव्हेन्स करण्याचा प्रयत्न केला पण कन्फ्यूजनला मतदार बळी पडले. त्यामुळे लोकसभा निवडणुकीत आम्हाला अपेक्षित यश आले नाही, असेही दानवे म्हणाले.
महाविकास आघाडीला मिळालेल्या यशामध्ये आमच्या विरोधात केलेल्या खोट्या प्रचाराचा मोठा हात होता. पण लोक एकदाच फसतात, वारंवार खोट्या प्रचाराला ते बळी पडत नाहीत. त्यामुळे लोकसभेत जे घडले तेच विधानसभेला घडेल या भ्रमात असणाऱ्या विरोधकांच्या भ्रमाचा भोपळा यावेळी नक्की फुटेल, असा विश्वास रावसाहेब दानवे यांनी व्यक्त केला.
(Edited By Roshan More)
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.