Nanded Political News : 2024 च्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसचे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. त्यांच्या प्रवेशानंतर नांदेड लोकसभा मतदारसंघातून भाजपचे तत्कालीन खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांचा पराभव झाला. त्यामुळे नाराज चिखलीकर यांनी विधानसभा निवडणुकीच्या आधी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश करत लोहा- कंधार मतदार संघातून निवडणूक लढवली आणि जिंकली. या सगळ्या घटना क्रमाला वर्ष उलटून गेले त्यानंतरही प्रताप चिखलीकर यांची अजूनही भाजपच्या नेत्यावरील नाराजी कायम असल्याचे दिसते.
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचा नुकताच नांदेड दौरा झाला, यावर भाष्य करताना 'त्यांच्या ऍडजेस्टमेंटसाठी मला पक्ष सोडावा लागला. माझी भाजप सोडण्याची इच्छा नव्हती' असे म्हणत चिखलीकर (Pratap Patil Chikhlikar) यांनी थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावरच अप्रत्यक्षरित्या निशाणा साधला. नांदेड मधील शंखनाद सभा, त्यात अशोक चव्हाण समर्थक माजी मंत्री डी.पी सावंत यांचा झालेला प्रवेश यावरही चिखलीकर यांनी भाष्य केले. 2019 च्या विधानसभा निवडणुकीत देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर सभांमधून अशोक चव्हाण हे लीडर नाही तर 'डीलर' आहे, असे सांगत त्यांच्या एजन्सीची यादीच लोकांसमोर ठेवली होती.
प्रताप पाटील चिखलीकर यांच्या रूपाने मी तुम्हाला 'लीडर' देत आहे, असे सांगत नांदेड जिल्ह्याचे नेतृत्व माझ्याकडे सोपवल्याचे फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी सांगितले होते. मात्र 2019 च्या लोकसभा निवडणुकीच्या काही दिवस आधी अशोक चव्हाण यांचा भाजपात प्रवेश झाला. हा वरिष्ठ पातळीवर झालेला निर्णय होता, त्याबद्दल मला काहीही बोलायचे नाही. परंतु माझी भाजप सोडण्याची इच्छा नसताना त्यांच्या ऍडजेस्टमेंट साठी मला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश करावा लागला, असा आरोप प्रताप पाटील चिखलीकर यांनी माध्यमांशी बोलताना केला.
अशोक चव्हाण यांना अमित शहा यांच्यासारख्या केंद्रीय नेतृत्वाच्या उपस्थितीमध्ये प्रवेश करून घेण्यासाठी कोणी मोठा नेता किंवा आमदार न मिळाल्यामुळे त्यांनी आधीच भाजपामध्ये प्रवेश केलेल्या डी. पी. सावंत यांचा प्रवेश पुन्हा करून घेतला. त्याबद्दल मला काही बोलायचे नाही परंतु केंद्रीय नेतृत्व नांदेडमध्ये आले असताना जिल्ह्यासाठी एखादी मोठी घोषणा होईल, अशी अपेक्षा होती परंतु ती झाली नाही.
अमित शहा हे विकास पुरुष म्हणून ओळखले जातात, त्यामुळे त्यांनी घोषणा केली नसली तरी जिल्ह्यात विकासाचा एखादा मोठा प्रकल्प किंवा योजना निश्चित होईल, असा टोलाही चिखलीकर यांनी लगावला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी आपले आजही चांगले संबंध आहेत. आमदार म्हणून मी त्यांना मतदार संघ आणि जिल्ह्याची कामे घेऊन भेटतो, तेव्हा तेही मला मदत करतात असेही चिखलीकर म्हणाले. मी भाजपमध्ये नसल्यामुळे आता ज्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात आहे तो पक्ष वाढवणे हे माझे काम आहे.
चार माजी आमदार , खासदार यांना मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश दिला. अजित पवार यांचे तीन नांदेड दौरे झाले या तीनही दौऱ्यात मी त्यांना रिकाम्या हाताने जाऊ दिले नाही, असे सांगत भविष्यात आपण राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष जिल्ह्यात मजबूत करण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे चिखलीकर म्हणाले. यापूर्वी प्रताप पाटील चिखलीकर यांच्या कन्या प्रणिता चिखलीकर यांनीही भाजपच्या सांगण्यावरूनच प्रताप पाटील चिखलीकर राष्ट्रवादीत गेले, असे विधान केले होते. त्यानंतर आज स्वत: चिखलीकर यांनीही तशी कबुली दिली.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.