
Nanded Political News : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश, विधानसभेची उमेदवारी आणि आमदारकी असा वेगवान प्रवास करणारे प्रताप पाटील चिखलीकर सध्या वेगळ्याच कारणामुळ चर्चेत आले आहेत. नांदेडमध्ये आपलाच आवाज चालतो, हे दाखवण्याची घाई आणि त्यातून चक्क एका मटका किंगला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश देण्याचा 'प्रताप'त्यांच्या हातून घडला. प्रकरण अंगलट आले, विरोधकांनी संधी साधत हा प्रताप अजित पवारांपर्यंत पोचवला अन् चोवीस तासात मटका किंगला बाहेरचा रस्ता दाखवण्याची नामुष्की ओढावली. त्यानंतर आता चिखलीकर 'जरा धीरे चलो', असा सल्ला त्यांना दिला जात आहे.
विधानसभा निवडणुकीत मिळालेल्या विजयानंतर प्रताप पाटील चिखलीकर (Pratap Patil Chikhlikar) यांची गाडी नांदेड जिल्ह्यात बुलेट ट्रेनच्या वेगाने धावू लागली आहे. भाजपामध्ये अशोक चव्हाण यांची एन्ट्री झाल्यानंतर लोकसभेत झालेला पराभव आणि त्यांच्या नेतृत्वात काम करण्याची इच्छा नसल्याने चिखलीकरांनी भाजपमधून एक्झीट घेतली होती. लोहा-कंधार या हक्काच्या मतदारसंघातून उमेदवारीसाठी राष्ट्रवादीत प्रवेश केला आणि विजय मिळवला. अजित पवारांनी टाकलेला विश्वास सार्थ ठरवल्यानंतर जिल्ह्यात आपले नेतृत्व सिद्ध करण्यासाठी चिखलीकर अक्षरश: धावायला लागले.
अतिघाई संकटात नेई, असे म्हणतात, तसेच चिखलीकर यांच्या बाबतीत घडले. काँग्रेस, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातील पदाधिकारी, माजी आमदारांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात (NCP) प्रवेश देत चिखलीकरांनी अजित पवार यांच्याकडे आपले वजन वाढवले. राष्ट्रवादीत फूट पडल्यानंतर अजित पवार यांनाही नांदेडमध्ये पक्षाचा विस्तार करण्यासाठी चिखलीकरांना फ्री हॅन्ड दिला. जिल्ह्याची सुभेदारी मिळाल्यानंतर चिखलीकरांनी मागे वळून पाहिले नाही.
काँग्रेसच्या चार माजी आमदारांना पक्षात आणल्यानंतर आत्मविश्वास बळावलेल्या चिखलीकरांनी आपल्या आणि पक्षाच्या कक्षा रुंदावण्याचा नादात नको ती चूक केली. मटका किंग आणि गंभीर स्वरुपाचे गुन्हे असलेल्या अन्वर अली खान याला सोमवारी (ता.18) रोजी आपल्या संपर्क कार्यालयात छोटेखानी प्रवेश सोहळा घेत पक्षप्रवेश दिला. या प्रवेशाचे फोटो सोशल मिडियावर व्हायरल झाले आणि विरोधकांनी अन्वर अली खानची सगळी कुंडलीच माध्यमांकडे पोचवली.
भाजपाचे खासदार अशोक चव्हाण यांनी या प्रवेशावर तिखट प्रतिक्रिया व्यक्त करत चिखलीकर यांच्या अडचणीत वाढ केली. अजित पवार यांना अंधारात ठेवून गुन्हेगाराला प्रवेश देणे योग्य नाही, स्थानिक नेतृत्वाने ही चूक करायला नको होती, असे सांगत चिखलीकरांचा करेक्ट कार्यक्रम लावला. अपेक्षेप्रमाणे अजित पवारांनी चिखलीकरांना फोन केला. आपल्या भाषेत त्यांनी चिखलीकरांना समज दिली आणि सोमवारी राष्ट्रवादी काँग्रेसची 'ओपन' झालेली दारे मटका किंग अन्वर अली खान यांच्यासाठी मंगळवारी 'क्लोज' झाली.
अजित पवारांची माफी मागावी लागली, विरोधकांची सरशी झाली यामुळे संतप्त झालेल्या चिखलीकरांनी मग नाव न घेता अशोक चव्हाण यांच्यावर आगपाखड केली. भाजपमध्येही अनेक गुन्हेगारांना प्रवेश देण्यात आला आहे. ज्यांची चौकशी करा असे, मुख्यमंत्र्यांनी आदेश दिले होते, त्यांनाच पुन्हा पक्षात घेतले गेले असे सांगत गुन्हेगारांना पक्षात प्रवेश न देण्याचा नियम महायुतीतील सगळ्याच पक्षांनी पाळला पाहिजे, असा उपदेश केला. चिखलीकरांनी चूक सुधारली असली तरी ती त्यांना भविष्यात महागात पडू शकते.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.