Pravin Darekar
Pravin Darekar Sarkarnama
मराठवाडा

देगलूरमधील भाजप उमेदवार साबणेंच्या विजयाचे दरेकरांनी सांगितले हे कारण....

सरकारनामा ब्युरो़

नांदेड : बेईमानी करुन सत्तेवर आलेल्या महाविकास आघाडी सरकारमधील सत्ताधारी पक्षांचे नेते आज आरोपीच्या पिंजऱ्यात उभे आहेत, कोणाची ईडीची चौकशी सुरु, कोणावर प्राप्तीकर विभागाचा छापा पडला, तर, कोणाचा जावई एनसीबीच्या चौकशीत अटकेत आहे. त्यामुळे हे सरकार महाराष्ट्राच्या जनतेच्या मनात पूर्णपणे बदनाम झाले आहे. यामुळे सरकारच्या विरोधातील चीड, आक्रोश, नाकर्तेपणा, राग देगलूरची जनता दाखवून देईल व भाजपाचे उमेदवार सुभाष साबणे हे प्रचंड बहुमताने विजयी होतील, असा विश्वास विधानपरिषदेचे विरोधी पक्ष नेते प्रविण दरेकर यांनी आज (ता.22 ऑक्टोबर) व्यक्त केले. ते नांदेड येथे आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते.

दरेकर म्हणाले, भाजपने सुभाष साबणे यांना या मतदारसंघाचे नेतृत्व करण्याची जबाबदारी दिली आहे. राज्याचे लक्ष या लढतीकडे लागले आहे. पंढरपूर सारखाच विजय देगलूर विधानसभा मतदारसंघात सुद्धा भाजपचा झेंडा फडकेल. असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

पंढरपूर पोटनिवडणूकीसाठी भाजपाचा पराभव करण्यासाठी सर्व पक्ष एकवटले होते. सरकारी यंत्रणाही एकत्र आली होती, तरीही पंढरपूरच्या जनतेने भाजपाला कौल दिला. जनता भाजपाच्या बाजूने आहे, हे दाखवून दिले. त्यावेळी फडणवीस यांनी सांगितले होते, की आपण पंढरपूरची निवडणूक आम्हाला जिंकून द्या सरकारचा करेक्ट कार्यक्रम करेल. त्याप्रमाणे जर, देगलूर विधानसभेची पोटनिवडणूक जिंकून दिल्यास त्या करेक्ट कार्यक्रमवार शिक्कामोर्तब होईल. असेही ते म्हणाले.

दरेकर म्हणाले, भाजपा हा सर्वात मोठा पक्ष म्हणून पुढे आला आहे. आणि महाविकास आघाडी सरकारची २ वर्षांची निष्क्रिय कारकीर्द आणि सरकारचा लेखाजोखा देगलूरची जनता महाराष्ट्रातील जनतेसमोर मांडणार आहे. राज्य सरकारचा दोन वर्षाचा कालावधी आणि देवेंद्र फडणवीस यांच्या पाच वर्षाचा कालावधीची जर तुलना केली तर, दोन वर्षात कुठल्याही प्रकारचे महाराष्ट्राच्या विकासाचे काम झालेले नाही. उलटपक्षी विकासाच्या ज्या योजना होत्या त्या बंद करण्याचे काम सरकारने केले आहे.

गेल्या दोन वर्षात कोरोनाच्या नावाखाली महाराष्ट्र पूर्णपणे विकासापासून वंचित राहिला आहे. याचा सर्वाधिक फटका मराठवाडा आणि नांदेड जिल्ह्यास बसला आहे. मराठवाडा वॉटरगीडसारखा एक महत्वाकांक्षी प्रकल्प ज्याला फडणवीस यांनी अंतिम स्वरूप दिले, प्रशासकीय मान्यता दिली, तोही प्रकल्प राज्य सरकारने अर्धवट ठेवला आहे. याबरोबर समुद्रातील पाणी उचलून आणण्याचा प्रकल्पही अर्धवट ठेवला, मराठवाडा विकास महामंडळ रद्द केले. मराठवाडया बद्दल या सरकारची अनास्थाच दिसून आली असे ते म्हणाले.

पालकमंत्री शेताच्या बांधावर गेले नाहीत..

गेल्या महिन्यात अतिवृष्टी झाली, आम्ही नांदेड जिल्ह्याचाही दौरा केला. येथील शेतकरी पूर्णपणे उद्ध्वस्त झाला आहे. सुमारे आठ लाख शेतकरी बाधित झाले आहेत. मात्र, सरकारकडून एक नवी दमडी मराठवाड्याला व नांदेड येथील शेतकऱ्यांना मिळाली नाही. सोयाबीन, कापूस, तूर, ज्वारी सगळी पिके उद्ध्वस्त झाली. तरी शेतकऱ्यांची दु:खे समजून घ्यायला पालकमंत्री शेताच्या बांधावर गेले नाहीत. आम्ही त्या ठिकाणी दौरा केला. अशा या निष्क्रिय सरकार, मंत्री याची राजवट या ठिकाणी चालू असतानाही देगलूरची पोटनिवडणूक होतेय सुभाष साबणेंना भाजपाने उमेदवारी दिली आहे. त्यामुळे देगलूरची जनता निश्चितपणे त्यांच्या विजयावर शिक्कामोर्तब करेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

आज देगलूरमध्ये कोणत्याही प्रकारची इंडस्ट्री नाही जेणेकरून इथल्या तरुणांच्या हाताला काम मिळेल. तरूण तेलंगणा, कर्नाटक येथे नोकरी, रोजगारासाठी जावे लागत आहे. तुम्ही शेतकऱ्यांना समाधान देत नाही, ना बेरोजगारांच्या हाताला काम देत, तसेच, इथले, रस्ते, पाणी, सिंचन कशालाही हातभार लावत नाही. मग लोकांनी तुम्हाला मते कशासाठी द्यायची?, असा सवालही दरेकर यांनी सरकारला विचारला आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT