Bamb-Chavan News Sarkarnama
मराठवाडा

Prashant Bamb-Satish Chavan Politics : बंब यांच्या अष्टविनायक यात्रेला राष्ट्रवादीच्या चव्हाणांचे निधीतून प्रत्युत्तर...

Jagdish Pansare

Marathwada Political News : आगामी लोकसभा आणि त्यानंतर होणाऱ्या विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीने राजकीय पक्षांनी तयारी सुरू केली आहे. (NCP-BJP News) राज्यात शिवसेना-राष्ट्रवादी या दोन पक्षात पडलेल्या फुटीनंतर प्रत्येक मतदारसंघाचे राजकीय गणित बिघडले आहे. ते जुळवून आणण्यासाठी विद्यमान लोकप्रतिनिधी आणि संभाव्य उमेदवारांमध्ये चांगलीच स्पर्धा निर्माण झाली आहे.

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील गंगापूर-खुलताबाद विधानसभा मतदारसंघात विद्यमान भाजप आमदार प्रशांत बंब (Prashant Bamb) आणि त्यांच्याविरोधात निवडणूक लढवण्यास इच्छुक असलेले राष्ट्रवादीचे (NCP) मराठवाडा पदवीधरचे आमदार सतीश चव्हाण यांच्यात कुरघोडीचे राजकारण सुरू झाले आहे. सतीश चव्हाण मराठवाडा पदवीधर मतदारसंघातून तिसऱ्यांदा विजय मिळवला. हा मतदारसंघ मजबूत बांधल्यानंतर आता त्यांना जनतेतून निवडून येण्याची तीव्र इच्छा झाली आहे.

यासाठी त्यांनी गंगापूर-खुलताबाद मतदारसंघ निवडला आहे. गेल्या एक-दीड वर्षापासून सतीश चव्हाण या मतदारसंघात सक्रिय झाले आहेत. बंब यांच्या विरोधात मैदानात दंड थोपटून उतरण्याचे कारणही तसेच आहे. (BJP) प्रशांत बंब यांनी शिक्षकांच्या मुख्यालयी न राहण्याचा मुद्दा विधानसभेत उपस्थित करत पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघ आणि त्यांचे आमदार बरखास्त केले पाहिजे, अशी खळबळजनक मागणी केली होती.

एवढ्यावरच न थांबता बंब यांनी शिक्षकांच्या विरोधात आंदोलनच हाती घेतले होते. याचा फटका मराठवाडा पदवीधर व शिक्षक मतदारसंघाचे विद्यमान आमदार सतीश चव्हाण आणि विक्रम काळे यांना बसला होता. संस्थाचालकांच्या माध्यमातून आपले राजकारण करणाऱ्या या दोन्ही नेत्यांना अडचणीत आणू पाहणाऱ्या बंब यांची विधानसभेतील वाटच रोखण्याचा चंग चव्हाण-काळे या जोडीने बांधला होता.

सतीश चव्हाण यांना अजित पवार यांच्याकडूनही बळ मिळाल्यामुळे सतीश चव्हाण यांनी गंगापूर-खुलताबाद मतदारसंघावर लक्ष केंद्रित केले. या मतदारसंघात दौरे वाढवण्यासोबतच येथील समस्यांना सभागृहात वाचा फोडणे, त्यासाठी निधी मिळवणे यातही चव्हाण यांनी पुढाकार घेतला. चव्हाण यांचा मतदारसंघातील हस्तक्षेप खटकल्यानंतर बंब यांनीही त्यांना शह देण्यासाठी आतापासूनच विधानसभा निवडणुकीची तयारी सुरू केली आहे.

प्रशांत बंब या मतदारसंघातून सलग तिसऱ्यांदा निवडून आले आहेत. एकदा अपक्ष तर दोन वेळा भाजपच्या तिकिटावर त्यांनी विजय मिळवला होता. मजबूत पकड असलेल्या या मतदारसंघात सतीश चव्हाण यांना घुसखोरी करू द्यायची नाही, यासाठी बंब यांनी मतदारांना आपलेसे करून घेण्यासाठी अनेक उपक्रम हाती घेतले आहेत. गीताबनच्या माध्यमातून मतदारसंघातील नागरिकांना मोफत अष्टविनायक यात्रा घडवण्याचा उपक्रम हा त्याचाच भाग मानला जातो.

याशिवाय अनके विकासकामांची उद्घाटने, लोकार्पण सोहळेही त्यांनी सुरू केले आहेत. त्याला सतीश चव्हाण यांनीही स्थानिक आमदार निधीतून विविध कार्यक्रमांचे भूमिपूजन करत बंब यांना आव्हान दिले आहे. ग्रामीण भागातील गावांतर्गत मूलभूत सुविधा पुरविणे (लेखाशीर्ष 2515) या योजनेंतर्गत तसेच आमदार स्थानिक विकास निधीतून चव्हाण यांनी गंगापूर तालुक्यातील विविध गावांमध्ये भरीव निधी उपलब्ध करून दिला आहे. यातील दोन कोटी रुपयांच्या विविध कामांचे लोकार्पण व भूमिपूजन त्यांनी नुकतेच केले. या दोघांमधील राजकीय स्पर्धेमुळे मतदारसंघातील कामे मार्गी लागत असल्यामुळे नागरिक मात्र समाधान व्यक्त करत आहेत.

Edited By : Jagdish Pansare

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT