Parbhani ZP News: परभणी जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदासाठी महायुतीतील भाजपा-शिवसेना-राष्ट्रवादी या पक्षांमध्ये फूट पडते की काय? अशी परिस्थिती निर्माण झाली होती. आधी पालकमंत्री मेघना बोर्डीकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला सत्तेबाहेर ठेवण्याचे प्रयत्न केले. तर हा डाव राष्ट्रवादीने त्यांच्यावरच उलटवण्याच्या हालचाली सुरू केल्या. परंतू स्थानिक नेत्यांच्या या कुरघोडीच्या राजकारणाला राज्यातील वरिष्ठ नेत्यांनी लगाम घातला. भाजपाला सत्तेपासून दूर ठेवण्याचे राष्ट्रवादीचे मनसुबे उधळण्यात आले आहेत. आता परभणी झेडपीमध्ये महायुतीचाच अध्यक्ष होणार हे स्पष्ट झाले आहे.
जिल्ह्यातील नऊ पंचायत समित्यांच्या सभापती व उपसभापतींची निवड प्रक्रिया पूर्ण होताच आता सर्वांचे लक्ष जिल्हा परिषद अध्यक्षपदाच्या निवडीकडे लागले आहे. जिल्हा परिषद निवडणुकीत सर्वाधिक 25 जागा जिंकून भाजप सर्वात मोठा पक्ष ठरला तरी स्पष्ट बहुमतापासून तो चार जागांनी दूर आहे. त्यामुळे सत्ता स्थापनेसाठी भाजपला इतर पक्षांच्या सदस्यांची साथ आवश्यक ठरणार आहे. सद्यस्थितीत जिल्हा परिषदेत भाजपकडे 25 सदस्य, राष्ट्रवादी काँग्रेसकडे 15, शिवसेनेकडे 5, शिवसेना (उबाठा) 6, काँग्रेसकडे 3 आणि एक अपक्ष सदस्य आहे. त्यामुळे सत्ता स्थापनेची समीकरणे गुंतागुंतीची बनली असून विविध राजकीय हालचालींना वेग आला आहे. निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर पालकमंत्री मेघना बोर्डीकर यांनी शिवसेनेला सोबत घेऊन सत्ता स्थापन करण्याचा दावा केला होता.
मात्र, या भूमिकेमुळे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये नाराजीची भावना निर्माण झाली होती. त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसने वेगळी रणनीती आखत सत्तास्थापनेसाठी प्रयत्न सुरू केले. जिल्हा परिषद अध्यक्षपद अनुसूचित जाती प्रवर्गासाठी राखीव असल्याने या प्रवर्गातील निवडून आलेले सदस्य प्रामुख्याने भाजप आणि शिवसेनेकडेच आहेत. त्यामुळे शिवसेनेचे पाच सदस्य सोबत घेतल्यास सत्ता स्थापनेची संधी निर्माण होऊ शकते, असा अंदाज राष्ट्रवादी काँग्रेसने बांधला.
त्यानुसार राष्ट्रवादी काँग्रेसचे 15, शिवसेनेचे 5, शिवसेना (उबाठा)चे 6, काँग्रेसचे 3 आणि अपक्ष 1 अशी एकूण 30 सदस्यांची गोळाबेरीज करून सत्ता स्थापनेची तयारी करण्यात आली होती. शिवसेनेला अध्यक्षपद देण्याच्या चर्चेमुळे शिवसेनेच्या स्थानिक नेत्यांमध्येही उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष तथा आमदार राजेश विटेकर यांनी पुढाकार घेत विविध बैठका घेतल्या आणि सत्तासमीकरणे जुळवण्याचा प्रयत्न सुरू केला.
दरम्यान, भाजपच्या राज्यस्तरीय वरिष्ठ नेत्यांनी पालकमंत्री मेघना बोर्डीकर यांना राष्ट्रवादी काँग्रेसलाही सोबत घेण्याचा सल्ला दिल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगू लागली. त्यानंतर भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना अशी महायुती एकत्र येऊन सत्ता स्थापन करण्याच्या हालचालींना वेग आल्याचे दिसून येत आहे. अध्यक्षपदावरून अजूनही महायुतीत ओढाताण सुरू आहे. अध्यक्षपद शिवसेनेला मिळणार की भाजपकडेच राहणार? याबाबत अद्याप स्पष्टता नाही.
अध्यक्षपद भाजपकडे गेले तर ते जिंतूर तालुक्याला मिळणार की गंगाखेड तालुक्याला? याबाबतही राजकीय चर्चांना उधाण आले आहे. त्यामुळे जिल्हा परिषद अध्यक्षपदाची माळ नेमकी कोणाच्या गळ्यात पडणार? याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे. आगामी काही दिवसांत होणाऱ्या बैठका आणि राजकीय घडामोडींवर या सत्तासमीकरणाचा अंतिम निर्णय अवलंबून असणार आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.