नवनाथ इधाटे
Phulambri Assembly Constituency : विद्यमान आमदार हरिभाऊ बागडे यांची राजस्थानच्या राज्यपाल पदी नियुक्ती झाल्याचे वृत्त काल रात्री उशीरा येऊन धडकले. विधानसभा निवडणूक अवघ्या दोन महिन्यावर आली असताना बागडे यांना राज्यपाल पदी बढती देण्यात आल्याने एका अर्थाने पक्षाकडून त्यांना राजकारणातून निवृत्तच करण्यात आल्याची चर्चा आहे. दिल्लीतील नेतृत्वाने त्यांच्या जनसंघापासून ते आताच्या भारतीय जनता पार्टीच्या प्रदीर्घ राजकीय प्रवासात दिलेल्या योगदानाची योग्य दखल घेतली.
भाजपमध्ये निवडणूक लढवण्यासाठी एका विशिष्ट वयापर्यंतची अट आहे. हरिभाऊ बागडे यांनी ती ओलांडली होती, कदाचित त्यामुळे त्यांच्यासारख्या ज्येष्ठ अन् श्रेष्ठ नेत्याचा हाच योग्य सन्मान म्हणावा लागेल. भाजपमध्ये कुठल्याही निर्णयाची गुप्तता राखली जाते, तशी बागडे यांच्या राज्यपाल पदी नियुक्तीबद्दल कमालीची गुप्तता पाळण्यात आली होती.
हरिभाऊ बागडे यांना शनिवारी (ता. 27) सकाळीच स्वतः देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी फोन करून ` बागडेजी आपको अब राज्य के बाहर जाना होगा` असे म्हणत राज्यपाल पदी नियुक्तीचे संकेत दिले होते, अशी प्रतिक्रिया हरिभाऊ बागडे यांनी `सरकारनामा` शी बोलताना दिली. देशाचे पंतप्रधान नरेंद्रभाई मोदी यांनी शनिवारी सकाळी नऊ वाजेच्या दरम्यान स्वतः फोन करून तुम्हाला राज्याच्या बाहेर जावे लागेल, अशी कल्पना मला दिली होती.
संघ कार्यकर्ता ते राज्यपाल..
मी कुठेही शनिवारी दिवसभर याची चर्चा केली नाही. त्यामुळे रविवारी सकाळी अडीच वाजेच्या सुमारास इलेक्ट्रॉनिक मीडियावर राज्यपाल पदी नियुक्ती झाल्याची माहिती सहकाऱ्यांमार्फत मला मिळाली आहे. त्यामुळे जी जबाबदारी दिली ती चांगल्या पद्धतीने पार पाडण्याचा माझा प्रामाणिक प्रयत्न राहील, असे सांगत बागडे (Haribhau Bagde) यांनी या निर्णयाचे स्वागत केले.
राष्ट्रीय स्वंयसेवक संघाचा कार्यकर्ता ते राज्यपाल पदापर्यंतचा बागडे यांचा प्रवास प्रेरणादायी ठरला आहे. आमदार हरिभाऊ बागडे तब्बल 40 वर्षे राजकारणात सक्रिय राहून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा कार्यकर्ता, आमदार, कॅबिनेट मंत्री, विधानसभा अध्यक्ष आणि आता थेट राजस्थानच्या राज्यपाल पदापर्यंत पोहचले आहेत. सर्वसामान्य शेतकरी कुटुंबातील कार्यकर्ता पक्षाशी एकनिष्ठ राहिल्यानंतर तो सर्वोच्च पदापर्यंत जाऊ शकतो, हे बागडे यांच्या नियुक्तीने दाखवून दिले आहे.
चाळीस वर्ष राजकारणात..
फुलंब्री विधानसभा मतदारसंघातील चित्तेपिंपळगाव येथे सर्वसामान्य कुटुंबात 17 ऑगस्ट 1944 रोजी जन्मलेले हरिभाऊ बागडे यांनी राजकारणाची सुरुवात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या माध्यमातून केली. सुरुवातीला हरिभाऊ बागडे यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या माध्यमातून मतदार संघात संघटन उभारले. (BJP) राष्ट्रीय स्वयंसेवक संघामधून आपल्या राजकीय कारकिर्दीची सुरुवात 1985 मध्ये बागडे यांनी पहिल्यांदा आमदारकीची निवडणूक लढवत केली.
पहिल्याच निवडणुकीत ते विजयी झाले. त्यानंतर चार वेळा बागडे आमदार म्हणून विधानसभेत दिसले. 1995 ते 1999 या काळात युतीचे सरकार असताना मुख्यमंत्री मनोहर जोशी यांच्या नेतृत्वाखालील मंत्रीमंडळात हरिभाऊ बागडे यांची अन्न व नागरी पुरवठा मंत्रालयाच्या कॅबिनेट मंत्रीपदी निवड करण्यात आली. 1999 ते 2000 या कालावधीत फुलंब्री तालुक्याची निर्मिती करण्यात आमदार हरिभाऊ बागडे यांनी सिंहाचा वाटा उचलला.
तत्कालीन मंत्री गोपीनाथराव मुंडे यांच्या माध्यमातून फुलंब्री गावाला तालुक्याचा दर्जा त्यांनी मिळवून दिला. 2003 व 2009 या दोन विधानसभा निवडणुकीत हरिभाऊ बागडे यांना काँग्रेसचे डॉ. कल्याण काळे यांच्याकडून पराभव पत्करावा लागला. 2014 मध्ये मोदी लाटेत बागडे यांनी पुन्हा हा मतदारसंघ भाजपच्या ताब्यात घेतला. 2014 मध्ये केंद्र व राज्यात सत्तांतर झाल्याने फडणवीस सरकारच्या काळात हरिभाऊ बागडे यांची थेट विधानसभा अध्यक्षपदी वर्णी लागली.
विधानसभेचे सर्वोच्च पद बागडे यांनी पाच वर्ष सांभाळले. 2019 च्या विधानसभा निवडणुकीत डॉ.कल्याण काळे यांचा पराभव करीत हरिभाऊ बागडे यांनी मतदारसंघात वर्चस्व कायम राखले. स्वच्छ चारित्र, पक्षाशी निष्ठा आणि समर्पण वृत्ती या गुणांच्या जोरावर भाजपमध्ये हरिभाऊ बागडे यांना कायम मानाचे स्थान राहिले. 1985 ते 2024 या चाळी वर्षाच्या काळात बागडे राजकारणात सक्रिय राहिले. त्यामुळे एक सामान्य राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा कार्यकर्ता ते राज्यपाल असा त्यांचा प्रवास राहिला.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.