Parali News : आगामी काळात होत असलेल्या लोकसभा निवडणुकीची तयारी भाजपने सुरु केली आहे. दुसरीकडे बीड लोकसभा निवडणूक माजी मंत्री पंकजा मुंडे लढविणार की खासदार डॉ. प्रीतम मुंडे लढणार यावरून राजकीय विश्लेषक नथीतून बाण मारत असताना, या सर्व चर्चेला त्यांनी पूर्णविराम दिला. परळीतील मॅरेथॉनमध्ये खासदार डॉ. प्रीतम मुंडे यांनी धाव घेत बीड लोकसभा निवडणूक कोण लढणार यांचे संकेत देत, सर्वांचे लक्ष वेधून घेतले.
परळी शहरात रविवारी ‘नमो चषक' क्रीडा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेच्या माध्यमातून तरुणांना त्यांचे कौशल्य सादर करण्याची संधी देण्यात आली. या वेळी आयोजित करण्यात आलेल्या मॅरेथॉनमध्ये खासदार डॉ. प्रीतम मुंडे यांनी धावत सर्वांचे लक्ष वेधून घेत सर्व टीमचा उत्साह वाढवला.
यावेळी खासदार प्रीतम मुंडे यांनी खुल्या गटातील स्पर्धकांसोबत मॅरेथॉनमध्ये सहभागी होऊन धावण्याचा अनुभव घेतला. यावेळी घेतलेला अनुभव माझ्यासाठी ऊर्जादायी होता, असे सांगत लवकरच माजी मंत्री पंकजा मुंडे (Pankaja munde) यांच्या हस्ते या स्पर्धेतील विजेत्यांना पारितोषिक वितरण करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.
या स्पर्धेतील विजेत्यांचा खासदार प्रीतम मुंडे यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. नमो चषक स्पर्धेच्या माध्यमातून परळी शहर आणि परिसरातील खेळाडू आणि तरुणांना त्यांचे कौशल्य सादर करण्याची संधी मिळाली. या स्पर्धकांच्या प्रतिक्रियेमुळे सर्व टीमचा उत्साह वाढवणाऱ्या ठरल्या असेही त्यांनी स्पष्ट केले.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
येत्या काळात परळी शहर व परिसरातील तरुणांना दिशा देणारे, त्यांचे जीवनमान घडवणारे असे अनेक उपक्रम राबविण्याचा निर्धार केला आहे. येत्या काळात अनेक उपक्रम राबवले जाणार आहेत. त्यासाठी आम्ही सातत्यपूर्ण प्रयत्न करत राहू, असा विश्वास यावेळी प्रीतम मुंडे (Pritam munde) यांनी व्यक्त केला.
परळी येथे पार पडलेल्या क्रीडा स्पर्धेत विविध क्रीडा प्रकारचे आयोजन करण्यात आले होते. रविवारी सकाळी आयोजित करण्यात आलेली मॅरेथॉन स्पर्धेला उदंड प्रतिसाद लाभला. या स्पर्धेत महिला गट, १५ वर्षापुढील खुला गट आणि ४५ वर्षापुढील गटातील असंख्य स्पर्धकांनी सहभाग नोंदवला.
(Edited by Sachin Waghmare)