AIMIM News : छत्रपती संभाजीनगर शहरातील हमखास मैदानावर सार्वजनिक बांधकाम विभागाने अचानक तीन पोकलेन आणून खोदकाम सुरू केले. वक्फ बोर्डाच्या या जागेवर कोणाच्या आदेशाने हे काम सुरू झाले? व बोर्डाच्या अधिकाऱ्यांनी पीडब्ल्यूडीला काम करण्यासाठी एनओसी दिली आहे का? यात कोणी किती पैसे खाल्ले? असे एकापाठोपाठ एक प्रश्न उपस्थित करत एमआयएमचे माजी खासदार इम्तियाज जलील यांनी वक्फ बोर्डाच्या अधिकाऱ्यांना धारेवर धरले.
शहराच्या मध्यवस्तीत असलेल्या आमखास मैदानाची मालकी वक्फ बोर्डाकडे आहे. या मैदानावर हॉकी, फुटबॉल, क्रिकेट अशा विविध स्पर्धांचे आयोजन केले जाते. याशिवाय राजकीय पक्षांच्या जाहीर सभा, मेळाव्यांसाठी देखील या मैदानाचा वापर केला जातो. रमजान महिन्यांमध्ये ईदचा मोठा बाजारही याच मैदानावर भरवला जातो. विशेषत: या मैदानाचा वापर शहरातील तरुण खेळाडूंसाठी व्हावा या उद्देशाने इथे आंतरराष्ट्रीय दर्जाचे फुटबॉल स्टेडियम उभारण्याचा इम्तियाज जलील (Imtiaz Jaleel) यांचा मानस आहे.
खासदार असताना त्यांनी यासाठी प्रयत्न करून अल्पसंख्यांक विभागाकडून साडेतीनशे कोटी रुपयांचा निधी मंजूर करून घेतला होता. विशेष म्हणजे या मैदानावर स्टेडियम उभारण्यासाठी वक्फ बोर्डाने ना हरकत प्रमाणपत्रही दिलेले आहे. (AIMIM) असे असताना अचानक काल वक्फ बोर्डाच्या कार्यालयासाठी इमारत उभारणीचे काम या मैदानावर सुरू झाले. तीन जेसीबी लावून खोदकाम करत वेगाने सुरू असलेल्या या कामाची माहिती इम्तियाज जलील यांना मिळताच ते संतापले.
काल शहरातील फुटबॉल प्रेमी आणि एमआयएमच्या कार्यकर्त्यांसह मैदानावर धाव घेत सार्वजनिक बांधकाम विभागाकडून सुरू असलेले खोदकाम त्यांनी बंद पाडले. कोणाच्या आदेशाने हे काम सुरू आहे? याचे उत्तर कोणाकडेही नव्हते. त्यानंतर हा सगळा प्रकार काय आहे? हे इम्तियाज जलील यांच्या लक्षात आले आणि त्यांनी थेट वक्फ बोर्डाच्या कार्यालयात धाव घेत अधिकाऱ्यांना जाब विचारला. बोर्डाच्या अधिकाऱ्यांनी आमखास मैदानावर सुरू असलेले काम आमच्याकडून सुरू नसून ते पीडब्ल्यूडीने सुरू केले असल्याचे सांगितले.
यावर तुमच्या परवानगीशिवाय पीडब्ल्यूडीने तिथे काम सुरू कसे केले? वक्फ बोर्डाचे कार्यकारी अधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी झोपा काढत होते का? यामध्ये काही लेणदेण झाली आहे का? अशा प्रश्नांची सरबत्ती करत इम्तियाज जलील यांनी तातडीने वक्फ बोर्डाच्या अधिकाऱ्यांनी पीडब्ल्यूडी विरुद्ध पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल करून गुन्हा नोंदवण्यासाठी पावले उचलावीत, असा हा आग्रह धरला. वक्फ बोर्डाने त्यांचे कार्यालय शहरातील इतर जागांवर उभारावे.
पीडब्ल्यूडीवर गुन्हा दाखल करा..
आमखास मैदानाची जागा स्टेडियमसाठी एनओसी दिलेली असल्यामुळे तिथे एकही इंच जागा आम्ही वक्फ बोर्डाच्या कार्यालयासाठी देणार नाही. तुम्ही जर काम थांबवणार नसाल तर वक्फ बोर्डाच्या अधिकाऱ्यांना खुर्चीसह उचलून नेऊ आणि त्याच खड्ड्यात टाकू, असा दम इम्तियाज जलील यांनी भरला. वक्फ बोर्डाच्या कार्यालयात तासभर सुरू असलेल्या या राड्यामुळे वातावरण चांगलेच तापले होते. इम्तियाज जलील यांनी वक्फ बोर्डाच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनाही फोनवरून तातडीने हे काम थांबण्याची मागणी केली.
तसेच तुमच्या परवानगीशिवाय खोदकाम करणाऱ्या सार्वजनिक बांधकाम विभागाच्या विरोधात पोलिसात गुन्हा नोंदवा, अन्यथा गाठ आमच्याशी आहे असा इशारा संबंधितांना दिला. आता यावर वक्फ बोर्ड नेमकी काय भूमिका घेते? याकडे सगळ्यांचे लक्ष असणार आहे. राज्य सरकार वक्फ बोर्डाच्या जमिनी आपल्या ताब्यात घेण्याच्या तयारीत असताना त्याचे संरक्षण करण्याचे काम ज्या अधिकाऱ्यांवर आहे तेच जर पैसे खाऊन जमिनी खाजगी बिल्डरांच्या किंवा राजकीय नेत्यांच्या घशात घालणार असतील तर आम्ही शांत बसणार नाही, असेही इम्तियाज जलील यांनी ठणकावले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.