औरंगाबाद : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे (raj thackeray) यांची आज जाहीर सभा होत आहे. भोंग्यांवरून सरकारला अल्टिमेटम दिल्यानंतर राज ठाकरेंच्या आजच्या सभेकडे राज्यासह देशाचं लक्ष लागलं आहे. राज ठाकरेंच्या सभेपूर्वी काही नेत्यांनी टीकेची झोड उठवली आहे. एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील (Imtiaz Jalil) यांनी या सभेला गृहमंत्र्यांनी परवानगी का दिली यांचे कारण सांगितलं आहे.
इम्तियाज जलील म्हणाले,"शिवसेनेला औरंगाबादमध्ये तोटा व्हावा म्हणूनच राष्ट्रवादी कॉँग्रेसच्या गृहमंत्र्यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या सभेला परवानगी दिली आहे. राज ठाकरे यांच्या आडून राष्ट्रवादी शिवसेनेवर बाण मारत आहे," माध्यमांशी बोलताना जलील यांनी हा आरोप केला आहे.
"औरंगाबादमध्ये भाजप शिवसेनेच्या अंतर्गत जातीय दंगलींचा ट्रॅक रेकॉर्ड होता.हे मैदान देऊन राज ठाकरेंना परवानगी दिल्याबद्दल मी राष्ट्रवादीला दोषी धरतो,"असे जलील म्हणाले.
"राष्ट्रवादीने रॅलीला परवानगी दिली आहे कारण शिवसेना कमी व्हावी असे त्यांना वाटते. मनसेच्या सभेचा आम्हाला काही त्रास नाही. पण या सभेला परवानगी द्यायला नको होती. औरंगाबादमध्ये यापूवीर्ही भाजप आणि शिवसेनेच्या काळात जातीय दंगली झाल्या आहेत. राज ठाकरे ईदपूर्वी सभा घेत आहेत हे स्पष्ट संकेत आहे. राष्ट्रवादीने मनसेला मैदान दिले असून ते टाळता आले असते," असे जलील म्हणाले.
औरंगाबादमध्ये आज राज ठाकरेंची तोफ धडाडणार आहे. आज राज ठाकरे कुणाला टार्गेट करणार? आजच्या सभेत काय बोलणार, याचीच उत्सुकता मनसे कार्यकर्त्यांसह विरोधकांनाही आहे. यावेळी राज ठाकरेंच्या सभेला कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला.
राज ठाकरेंच्या सभेसाठी आज दुपारी दोन वाजल्यापासून ते रात्री 12 वाजेपर्यंत औरंगाबादमध्ये वाहतुकीत बदल करण्यात आले आहेत. बंदोबस्तासाठी 3 हजार कर्मचारी, अधिका-यांचा ताफा मागवला आहे. सभेच्या प्रत्येक हालचालींवर सीसीटीव्हीची नजर राहणार आहे.
औरंगाबादला रवाना होण्यापूर्वी राज ठाकरे यांनी शनिवारी (ता. ३० एप्रिल) सकाळी छत्रपती संभाजी महाराज यांच्या समाधिस्थळी पुष्पहार अर्पण करून दर्शन घेतले. समाधिस्थळी पूजा अभिषेक व ध्येयमंत्र झाल्यानंतर ठाकरे यांनी समाधिस्थळी प्रदक्षिणा घालून शंभूराजांच्या पुतळ्यास पुष्पहार घातला. पौरोहित्य करणारे वढू बुद्रुक येथील अविनाश मरकळे यांच्याशी संवाद साधत राज ठाकरे यांनी येथील नित्यपूजा व पुण्यतिथीच्या कार्यक्रमाची माहिती घेतली.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.