Pankaja Munde at a political event amid renewed discussions over BJP’s Rajya Sabha strategy and OBC leadership dynamics in Maharashtra. Sarkarnama
मराठवाडा

Rajyasabha Election : पंकजा मुंडेंना पर्याय तयार करण्याचा भाजपाचा डाव फसला; संधी मिळालेले भागवत कराड अन् रमेश कराड ठरले फेल!

BJP leadership strategy : भाजपाने पंकजा मुंडे यांना पर्याय उभा करण्याचा प्रयत्न केला; मात्र तो अपयशी ठरल्याची चर्चा आहे. राज्यसभा राजकारणातून मराठवाड्यातील ओबीसी नेतृत्व आणि भाजप रणनीतीत नवे समीकरण तयार होत आहे.

सरकारनामा ब्यूरो

OBC Politics : मंत्री पंकजा मुंडे यांना पर्यायी नेतृत्व उभे करण्याच्या उद्देशाने 6 वर्षांपूर्वी भाजपने रमेश कराड यांना विधान परिषद आणि भागवत कराड यांना राज्यसभेवर संधी देण्यात आली. इतकेच नाही कराड यांना केंद्रात अर्थ सारख्या अतिमहत्त्वाच्या खात्याचे राज्यमंत्री करून ताकद दिली गेली. पण हा प्रयोग पुरता फसल्याचे आता पक्षनेतृत्वाच्या लक्षात आले असल्यानेच भागवत कराड यांना पुन्हा राज्यसभेवर संधी दिली जाण्याची शक्यता मावळली आहे.

महाराष्ट्रात दिवंगत गोपीनाथ मुंडे यांच्याकडे ओबीसी नेता म्हणून पाहिले जात होते. वंजारी समाजासोबतच ओबीसींच्या मनावर अधिराज्य करणारे ते नेते होते. त्यांच्या अकाली मृत्यूनंतर त्यांचा राजकीय आणि सामाजिक वारसा पुढे नेण्याची जबाबदारी पंकजा मुंडे यांनी स्वीकारली. त्यांनी गोपीनाथ मुंडे यांचा राजकीय वारसा नेटाने पुढे नेला. परंतु राज्यातील व केंद्रातील भाजपाच्या वरिष्ठ नेत्यांशी जसा संपर्क आणि समन्वय गोपीनाथ मुंडेंचा होता, तसा तो पंकजा मुंडे यांना ठेवता आला नाही.

परिणामी गोपीनाथ मुंडे यांच्या जाण्यानंतर पंकजा मुंडे यांना पाच-सहा वर्ष राजकीय संघर्षाला तोंड द्यावे लागले. आपल्याला डावलले जात असल्याची भावना, समर्थकांच्या मनाची होणारी घालमेल आणि आपले राजकीय आयुष्य संपवले जात आहे की काय? या उद्विग्नेतून पंकजा यांनी थेट राज्याच्या व केंद्रातील प्रमुख नेतृत्वावरच केलेली टीका याचा मोठा फटका पंकजा मुंडे यांना सहन करावा लागला. परळी विधानसभा मतदारसंघातून भावाकडूनच पराभव झाल्यानंतर खऱ्या अर्थाने पकंजा मुंडे यांचा संघर्ष सुरू झाला.

गोपीनाथ मुंडे यांचे नाव आणि राजकीय वारस असूनही पंकजा मुंडे यांना पक्षाने दूर ठेवण्याचे प्रयत्न केले. वंजारी समाज, ओबीसी मतदाराला दुखवायचे तर नाही, पण त्यांचे नेतृत्वही पंकजा मुंडे यांच्याकडे राहता कामा नये, अशा पद्धतीने भाजपातील काही चाणक्यांनी डाव टाकले. परळी विधानसभेत पराभव झाल्यानंतर पंकजा मुंडे यांना विधान परिषदेवर संधी दिली जाईल, अशी अपेक्षा स्वतः पंकजा आणि त्यांच्या समर्थकांना होती. परंतु पंकजा मुंडे यांचे खच्चीकरण आणि त्यांना नवा पर्याय उभा करण्याची स्क्रीप्ट तयार होऊन त्यावर कामही सुरू झाले होते.

त्याचाच पहिला अंक विधान परिषदेवर पंकजा मुंडे यांच्याऐवजी वंजारी समाजाच्याच रमेशप कराड यांना भाजपने संधी देत त्यांना आमदार केले. या राजकीय खेळीने मुंडे समर्थकांमध्ये कमालीची चलबिचल सुरू झाली. पंकजा मुंडे यांनी संयम राखला, पण समर्थक राज्य आणि केंद्रातील भाजप नेतृत्वावर उघड टीका करू लागले. याचा फटकाही पंकजा मुंडे यांनाच अधिक बसला. विधान परिषदेवरील संधी हुकल्यानंतर 2020 मध्ये महाराष्ट्रातून राज्यसभेवर पाठवण्यात येणाऱ्या जागेची चर्चा सुरू झाली.

आता तरी पंकजा मुंडे यांना संधी दिली जाईल, अशी भाबडी आशा फोल ठरली. पुन्हा एकदा त्यांच्या नावावर फुली मारत राज्यसभेसाठी वंजारी समाजाचेच डॉ. भागवत कराड यांना संधी देण्याचा निर्णय घेतला. विशेष म्हणजे विधान परिषदेवर पाठवलेले रमेश कराड काय? किंवा नंतर राज्यसभेवर पाठवण्यात आलेले भागवत कराड काय? हे दोघेही गोपीनाथ मुंडे यांचेच चेले. त्यांच्याच नेतृत्वात आणि आशिर्वादाने या दोघाचे राजकीय आयुष्य घडले. पण पंकजा मुंडे यांचा काट्याने काटा काढण्यासाठी भाजपाच्या दिल्लीतील नेतृत्वाने रमेशअप्पा आणि भागवत कराड यांचा वापर केला.

पंकजा मुंडे यांचे नेतृत्व बाजूला सारून नवे नेतृत्व उभे करण्याचा भाजपा नेत्यांचा प्रयत्न होता. भागवत कराड हे उच्चशिक्षित, पेशाने डॉक्टर असल्याने ते पंकजा मुंडे यांना योग्य पर्याय ठरू शकतात, असा वरिष्ठ नेत्यांचा अंदाज होता. राज्यसभेवर खासदार म्हणून किंवा देशाचे अर्थ राज्यमंत्री म्हणून कराड यांचे प्रगती पुस्तक चांगले असेलही, पण पंकजा मुंडे यांना पर्याय म्हणून पुढे आणण्याच्या नेत्यांच्या प्रयत्नात मात्र ते नापास ठरले. रमेश कराड यांची ओळख लातूरच्या बाहेर नसल्याने त्याचाही फारसा फायदा झाला नाही.

मराठा आरक्षण आंदोलनाने पंकजा मुंडेंचे महत्व वाढले?

मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वात मराठवाड्यात मराठा आरक्षणाचा लढा तीव्र झाला. ओबीसीतून मराठा समाजाला आरक्षण या त्यांच्या मागणीने राज्यात विशेषतः मराठवाड्यात मराठा विरुद्ध ओबीसी असा उघड संघर्ष निर्माण झाला. ओबीसी नेते आणि नेतृत्व म्हणून छगन भुजबळ यांना मराठवाड्यातही मान्यता मिळेल असे चित्र एल्गार सभामंधून निर्माण केले गेले. पण भुजबळांचा प्रभाव फारसा दिसून आला नाही. मराठा विरुद्ध ओबीसी संघर्ष चिघळत असताना याचा फटका 2024 मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीत बसू नये यासाठी भाजपाने सावध भूमिका घेतली.

ज्या पंकजा मुंडे यांना सातत्याने डावलले गेले त्यांना अचानक बीड लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी जाहीर झाली. अर्थात पंकजा मुंडे बहिणीची उमेदवारी कापून आपल्याला दिली, यामुळे नाराज होत्याच. पण कुठे तरी संधी मिळते म्हटल्यावर त्या निवडणूक लढवण्यास तयार झाल्या. मात्र मराठा आरक्षणाच्या हवेत त्यांचा पराभव झाला. अवघ्या ७ हजार मतांच्या फरकाने त्यांची दिल्लीवारी हुकली. मराठवाडा आणि महाराष्ट्रात मराठा आरक्षणाच्या आंदोलनात सत्ताधारी भाजपाचे उमेदवार पालापाचोळ्यासारखे उडून गेले.

लोकसभेत महाराष्ट्रात जोरदार दणका बसल्यानंतर भाजपाने जिरवाजिरवीचे प्रयोग थांबवले. मराठवाड्यातील मराठा विरुद्ध ओबीसी संघर्षाच्या काळात ओबीसी आणि वंजारी समाज हा पंकजा मुंडे यांच्याच पाठीशी असल्याचे प्रकर्षाने दिसून आले. त्यांना पर्याय म्हणून पुढे करण्यात आलेले रमेश कराड, भागवत कराड यांना समाजाने कधीच स्वीकारले नाही. ही वस्तुस्थिती लक्षात आल्यानंतर भाजपाच्या राज्य आणि केंद्रातील नेतृत्वाने पुन्हा एकदा पंकजा मुंडे यांचे राजकीय पुनर्वसन करण्याचा निर्णय घेतला.

विधान परिषदेवर संधी देत देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रीमंडळात पंकजा मुंडे यांना पुन्हा मानाचे पान देण्यात आले. पंकजा मुंडे यांना मुख्य प्रवाहात आणल्याचा फायदा भाजपाला मराठवाड्यातील स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत झाला. नगरपालिका, नगरपंचयातींमध्ये भाजपाला चांगले यश मिळाले. या उलट पंकजा मुंडे यांना पर्याय म्हणून ज्या रमेश कराड आणि भागवत कराड यांना मागच्या दाराने आणण्यात आले होते, त्यांचा भाजपाच्या संघटनात्मक आणि राजकीय यशात कुठेही फारसा रोल दिसला नाही.

भाजपने विधान परिषदेत संधी दिलेले रमेश कराड 2024 मध्ये लातूर ग्रामीणमधून विधानसभेवर निवडून गेले. तर भागवत कराड यांना पुन्हा राज्यसभेवर संधीची आशा आहे. परंतु भाजपाने पंकजा मुंडे यांना पर्याय म्हणून ज्या भागवत कराड यांना केवळ राज्यसभेवरच संधी दिली नाही तर अर्थ खात्याचे राज्यमंत्रीही केले, ते फेल ठरले, अगदी महापालिका निवडणुकीतही त्यांचा शब्द फारसा चालला नाही. त्यामुळे पक्ष नेतृत्व पुन्हा त्यांना संधी देण्याची शक्यता कमीच असल्याचे चित्र आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT