

Hingoli News : नुकत्याच झालेल्या नगरपालिका, नगरपंचायत, महापालिका आणि जिल्हा परिषद अशा सर्वच स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत भाजप हा राज्यात आणि मराठवाड्यात नंबर एकचा पक्ष ठरला आहे. त्यामुळे भाजपमध्ये पुन्हा इन्कमिंग सुरू झाले आहे. हिंगोली जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे मोठे नेते तथा माजी मंत्री जयप्रकाश दांडेगावकर यांचे चिरंजीव आतिष दांडेगावकर हे गुरुवारी मुंबईत भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत.
आतिष दांडेकर यांच्या भाजप (BJP) प्रवेशाचा मुहूर्त ठरला असून गुरुवारी मुंबईतील एका कार्यक्रमात आपल्या 4000 समर्थक कार्यकर्त्यांसह आतिष दांडेगावकर हे भाजपचे कमळ हाती घेणार आहेत. हिंगोली जिल्ह्यातील वसमत विधानसभा मतदारसंघात गेल्या काही दिवसांपासून राजकीय घडामोडींना वेग आला होता. अतिष दांडेगावकर यांनी भाजप प्रवेशाच्या हालचाली सुरू करत कार्यकर्त्यांची संवाद आणि बैठकांचे सत्र सुरू केले होते.
त्यानंतर आता त्यांचा भाजप प्रवेश निश्चित झाला आहे. अतिष दांडेगावकर हे माजी मंत्री जयप्रकाश दांडेगावकर यांचे चिरंजीव असून सहकार आणि शेती क्षेत्रात त्यांचे भरीव काम असल्याचे बोलले जाते. राज्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात (NCP) फूट पडल्यानंतर मराठवाड्यात कार्यकर्ते विभागले गेले होते. काहींनी अजित पवारांसोबत जाणे पसंत केले तर काहींनी शरद पवार यांची साथ न सोडण्याचा निर्णय घेतला होता. यामध्ये माजी मंत्री जयप्रकाश दांडेगावकर यांनी शरद पवार यांच्यासोबत राहणे पसंत केले होते.
तर वसमतचे आमदार चंद्रकांत उर्फ राजू नवघरे यांनी अजित पवार यांची साथ देण्याचा निर्णय घेतला होता. या घडामोडीनंतर तालुक्यातील राजकारण चांगलेच तापले होते. अतिष दांडेगावकर यांच्या भाजप (BJP) प्रवेशानंतर पुन्हा एकदा वसमत विधानसभा मतदारसंघातील राजकीय गणिते बदलणार आहेत. अतिष दांडेगावकर यांनी गेल्या काही दिवसांपासून पक्षाची कमान सांभाळली होती. राजकारणात ते सक्रिय झाल्यामुळे वसमत विधानसभा मतदार संघासह जिल्ह्याच्या राजकारणावर त्याचा परिणाम दिसू लागला होता.
आगामी जिल्हा परिषद निवडणुकीची तयारीही त्यांनी चालवली होती. मात्र राष्ट्रवादी ऐवजी भाजपमध्ये प्रवेश करून जिल्ह्याच्या विकासासाठी प्रयत्न करावेत असा सूर त्यांच्या कार्यकर्त्यांमधून व्यक्त केला जाऊ लागला होता. त्यामुळे अतिष दांडेगावकर यांनीही कार्यकर्त्यांच्या आग्रहास्तव भाजपमध्ये प्रवेश करण्याच्या निर्णय घेतल्याचे बोलले जाते. या प्रवेश सोहळ्यासाठी वसमतसह जिल्हाभरातून चार हजार पेक्षा अधिक कार्यकर्ते मुंबईकडे रवाना झाले आहेत
त्यांच्या भाजप प्रवेशामुळे हिंगोली जिल्ह्यात भाजपाला आणखी बळ मिळणार असल्याचे बोलले जात आहे. कार्यकर्त्यांचा आग्रह व विकासाचा दृष्टीकोन समोर ठेऊन आपण भाजपमध्ये प्रवेश करीत आहोत. मतदार संघाचा विकास करायचा आहे, त्यामुळे सत्तेत राहणे आवश्यक असल्याचे अतिष दांडेगावकर यांनी म्हटले आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.