Dharashiv News: रामदास आठवले हे अधून-मधून वंचित बहुजन आघाडीचे सर्वेसर्वा यांना ऐक्याची साद घालत असतात. यासाठी मंत्रीपदाचा त्याग करण्याची तयारी आणि आंबेडकरांचे नेतृत्व स्वीकारण्याची तयारीही आठवले यांनी दाखवली आहे. परंतु प्रकाश आंबेडकर यांनी मात्र आठवले यांच्या आवाहनाला कधीच प्रतिसाद दिला नाही, किंवा त्यावर भाष्य देखील केले नाही. आता पुन्हा आठवले यांनी प्रकाश आंबेडकरांपुढे मैत्रीचा हात केला आहे. समाजासाठी एकत्र येऊ, मी आरपीआयचे अध्यक्ष पद सोडतो, तुम्ही अध्यक्ष व्हा, तुमच्या नेतृत्वात काम करतो, अशी भूमिका त्यांनी मांडली.
धाराशिव जिल्हा दौऱ्यावर असताना मंगळवारी (ता.२४ नोव्हेंबर) माध्यमांशी संवाद साधताना केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी प्रकाश आंबेडकर यांना थेट आपल्या पक्षाचे अध्यक्षपद स्वीकारण्याचीच ऑफर दिली. एवढेच नाही तर रिपब्लिकन पक्षातील सर्व लहान-मोठे गट एकत्र करून एकच रिपब्लिकन पक्ष निर्माण करण्याची आपली तयारी असल्याचे ते म्हणाले. २०२९ च्या लोकसभा निवडणुकीच्या तीन वर्ष आधीच मांडलेल्या या प्रस्तावामुळे आठवले यांच्या मनात नेमकं काय चाललंय? यावर चर्चा सुरू झाली आहे.
प्रकाश आंबेडकर यांचा वंचित बहुजन आघाडी आणि आठवले यांची रिपब्लिकन पार्टी आॅफ इंडिया दोन्ही पक्ष एकत्र येण्यास आपली कोणतीही हरकत नाही. मात्र, त्यासाठी प्रकाश आंबेडकर यांनी ऐक्याची भूमिका स्वीकारणे आवश्यक आहे. आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्त्यांना राजकीय सत्तेत योग्य सहभाग आणि न्याय मिळवून द्यायचा असेल, तर आपण एकत्र येणे गरजेचे आहे, असे आठवले यांनी सांगितले.
प्रकाश आंबेडकर यांनी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे अध्यक्षपद स्वीकारावे. पक्षातील छोटे-मोठे सर्व गट या पक्षात विलीन करून एकच रिपब्लिकन पक्ष उभा करावा, अशी आपली इच्छा असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. राजकीय सत्तेतील पदांपेक्षा आंबेडकरी समाजाचे एकत्रीकरण आपल्यासाठी अधिक महत्त्वाचे असल्याचे आठवले म्हणाले.
रिपब्लिकन चळवळीत अनेक गट निर्माण झाल्यामुळे समाजाच्या राजकीय ताकदीचे विभाजन झाले आहे. त्यामुळे सर्व गटांनी एकत्र येऊन एकाच झेंड्याखाली काम करण्याची गरज असल्याचे आठवले यांनी सांगितले.
मात्र, प्रकाश आंबेडकर यांच्याकडून ऐक्याच्या प्रस्तावाला अपेक्षित प्रतिसाद मिळत नसल्याची खंतही त्यांनी व्यक्त केली. आपण एकत्र येण्यासाठी तयार आहोत; परंतु प्रकाश आंबेडकर तयार नसल्यामुळे हे ऐक्य प्रत्यक्षात येत नसल्याचे आठवले म्हणाले.
महाराष्ट्रात रिपब्लिकन पक्षाचे विविध गट आणि वंचित बहुजन आघाडी स्वतंत्रपणे राजकीय भूमिका घेत असतात. या सर्व शक्ती एकत्र आल्यास आंबेडकरी चळवळीला एकसंध राजकीय व्यासपीठ मिळू शकते, असा आठवले यांचा दावा आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.